पणजी: येथील आझाद मैदानावर शारीरिक कंत्राटी शिक्षकांनी (Goa Teachers) त्यांना सेवेत कायम करून घेण्यासाठी सुरू केलेल्या आंदोलनाला आज सात दिवस उलटून गेले तरी कोणताही तोडगा सरकारने काढला नाही. उद्यापर्यंत सरकारने (Goa Government) निर्णय न घेतल्यास या आंदोलकांनी यावर्षीची दिपावली (Diwali 2021) आझाद मैदानावर करण्याचा ठरविले असल्याची माहिती या आंदोलनातील एक शिक्षक गंगाराम लांबोर यांनी दिली.
गेल्या 27 ऑक्टोबरपासून 54 कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेडले आहे. आंदोलनाच्या दुसऱ्याच दिवशी एकाची प्रकृती खालावली होती मात्र त्यानंतर त्यात सुधारणा झाल्याने पुन्हा तो या आंदोलनात सामील झाला आहे. या आंदोलनामध्ये काही महिला कर्मचारीही आहेत.
या आंदोलनाला विरोधी राजकीय पक्षाच्या नेत्यांनी भेट देऊन पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्र्यांनी काही दिवसांपूर्वी आंदोलनकर्त्यांशी बोलणी करून त्यांना पुन्हा एक वर्षाच्या कंत्राटी पद्धतीवर मुदत वाढवून देण्याची तसेच मानधनात वाढ करण्याचे आश्वासन दिले मात्र ते या कर्मचाऱ्यांनी धुडकावून लावले. गेली अनेक वर्षे कंत्राटी पद्धतीवर शारीरिक शिक्षक म्हणून काम करत असल्याने सेवेत कायम करा या मागणीबाबत ठाम असल्याचे लांबोर यांनी सांगितले.
राज्यात सर्वत्र दीपावलीनिमित्त उत्सव साजरा करण्यासाठी लोक व्यस्त असताना हे कंत्राटी कर्मचाऱ्यांवर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी ते आझाद मैदानावर बसले आहेत. सरकारकडून या शिक्षकांवर झालेल्या अन्यायप्रकरणी विरोधकांनी सरकार टीका केली आहे. भाजपकडून या कर्मचाऱ्यांची होत असलेली सतावणुकीबाबत विरोधकांनी नाराजी व्यक्त केली आहे. विद्यार्जन करणाऱ्या शिक्षकांना न्याय मागण्यासाठी आंदोलन करण्याची पाळी येत आहे ही लज्जास्पद बाब असल्याची प्रतिक्रिया राजकीय नेत्यांनी भेट दिली तेव्हा व्यक्त केली आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.