Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: शिकाऊ नव्हे, शिकवणाऱ्या आमदार

Khari Kujbuj Political Satire: एका बाजूला गोव्याच्या पोलिस प्रमुखांनी खास पत्रकार परिषद बोलावून नोकरभरती गौडबंगाल प्रकरणात राजकीय नेत्यांना क्लीन चीट दिल्याच्या आठवडाभरात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीला सुरुवात केल्याच्या वृत्ताने भाजपा नेत्यांच्या अडचणीत भर टाकली आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

शिकाऊ नव्हे, शिकवणाऱ्या आमदार

मोर्ले येथे विविध प्रकल्पांचे सोमवारी उद्‌घाटन झाले. या कार्यक्रमात मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे विश्‍वजीत राणेंविषयी काय बोलतात, याची उत्सुकता अनेकांना लागली होती. विश्‍वजीत यांचे त्यांनी कौतुक केलेच; त्‍यासोबत आमदार दिव्या राणे यांच्या कार्यपद्धतीची त्‍यांनी मुक्‍तकंठाने स्‍तुती केली. दिव्या राणेंनी ज्यापद्धतीने कामाचा धडाका लावला तो अभिनंदनास पात्र आहे. या भागातील विकास व्हावा, यासाठी त्या सतत प्रयत्नरत असतात. उरलेली कामे कशी करून घ्यावीत, याचेही कौशल्‍य व हातोटी त्यांच्‍याकडे आहे. म्हणूनच त्या विधानसभेत सर्वोत्कृष्ट आमदार ठरल्या आहेत. दिव्या राणे या स्वत:ला आपण शिकाऊ आमदार असल्याचे सांगत असल्या तरी त्या आता शिकाऊ राहिल्या नसून इतरांनाही शिकवणाऱ्या आमदार बनल्या आहेत, असेही मुख्यमंत्री म्हणाले. सत्तरी हा राणेंचा बालेकिल्ला. तिथे जाऊन राणे दाम्पत्याचे मुख्यमंत्र्यांनी केलेले तोंडभरून कौतुक म्हणजे ‘सुपर षटकारच’.∙∙∙

ईडीचा उपद्‍व्याप

एका बाजूला गोव्याच्या पोलिस प्रमुखांनी खास पत्रकार परिषद बोलावून नोकरभरती गौडबंगाल प्रकरणात राजकीय नेत्यांना क्लीन चीट दिल्याच्या आठवडाभरात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) चौकशीला सुरुवात केल्याच्या वृत्ताने भाजपा नेत्यांच्या अडचणीत भर टाकली आहे. वास्तविक ईडीची प्रतिमा आहे ती, विरोधकांना सतावण्याची. फातोर्डामधील कथित गुंतवणूक गैरव्यवहाराचा नुसता सुगावा लागल्यावर वर्षभरापूर्वी ईडीने चौकशी आरंभली होती, परंतु जेथे उच्चपदस्थांवर आरोप होताहेत. त्या नोकरभरती प्रकरणावरही ईडी खणण्यास सुरुवात करील, याचा भाजपातही कोणाला संशय आलेला नसेल! पक्षश्रेष्ठींच्या मनात दुसरेच काहीतरी नसावे ना? की क्लीन चीट देण्यासाठीच ईडीचा हा खटाटोप आहे, असे काही प्रश्‍न या प्रकरणात उपस्थित झाले आहेत. एक गोष्ट खरी आहे की क्लीन चीट देतानाही ईडी काही लोकांना जरूर उठाबशा काढायला लावते म्हणे! ∙∙∙

हिंदुत्व आणि संघटन शक्तीचे ‘संकेत’

दोन दिवसांपूर्वी गोव्यात बजरंग दलाच्या शौर्य यात्रेचे जोरदार संचलन झाले. तेलंगणाचे भाजप आमदार आणि प्रखर हिंदुत्ववादी टायगर राजा सिंग यांचे जहाल भाषणही यावेळी झाले. मात्र, ह्या सगळ्या आयोजना मागे महत्वाची व्यक्ती होती ती म्हणजे संकेत आर्सेकर. पूर्ण गोव्यातून बजरंगी युवकांना एकत्र करत हजारोंच्या संख्येने युवकांचे संचलन म्हणजे हे हिंदूत्व आणि संघटन शक्तीचेच संकेत नाहीत का?आर्सेकर हे मुख्यमंत्र्यांचे एक वजनदार ‘ओएसडी’ मानले जातात.२०२७ मध्ये सावर्डेत आर्सेकरांच्या संकेतांची चर्चा आतापासूनच रंगू लागलीय. ∙∙∙

केवळ घोषणा नकोय!

राज्यात कचऱ्याची मोठी समस्या आहे. अनेक पंचायतींना न्यायालयाने कचऱ्यावरून दणके दिले आहेत. राज्य सरकारच्या किंवा केंद्र सरकारच्या कचऱ्याविषयी आलेल्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्याचे काम अजूनही काही पंचायतींकडून होत आहे की केले जात आहे, हे सांगता येत नाही. परंतु पंचायत क्षेत्रात अनेक उद्योग व हॉटेल्सवाले कचरा नेऊन टाकतात, हे निदर्शनास आले आहे. अशा पंचायतींच्या तक्रारी आल्या आहेत, तर त्यांच्यावर खरोखरच कारवाई होणे गरजेचे आहे. आता मुख्यमंत्र्यांनी अशा कचरा टाकणाऱ्या उद्योग व हॉटेल्सवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले आहे, अशी कडक पावले उचलण्याची गरज आहे. परंतु अशा सूचनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कटाक्षाने असे प्रकार थोपविले तरच पंचायत क्षेत्रात येणारा कचरा दिसणार नाही. अन्यथा कुंपणच शेत खात असेल तर काही बोलायचाच नको. ∙∙∙

‘सनबर्न’ विरोधक थंडावले?

राज्यात नववर्ष स्वागताच्या पूर्वसंध्येपर्यंत इडीएम अर्थात सनबर्न महोत्सव रंगतो. सनबर्नमध्ये अंमली पदार्थांचा व्यवहार होत असल्याच्या चर्चेने हा महोत्सव सांगितीक नसून वादाचाच आहे, की काय असा प्रश्‍न पडावा, अशा आवेशात त्याला आयोजन स्थळीच्या स्थानिकांचा विरोध होतो अन् नंतर मावळतोही, असे इतिहास सांगतो. आयोजकही नेहमीप्रमाणे जाणून असल्याप्रमाणेच हा विरोध मावळणार, याची खात्री बाळगत असतात, हे धारगळ ठिकाण निश्‍चित होण्यापूर्वीच त्यांच्या आगाऊ तिकीट विक्रीला लाभणाऱ्या प्रतिसादावरून स्पष्ट होते. मांद्रेत एका माजी लोकप्रतिनिधीला झालेल्या मारहाणीमुळे इतर विरोधकांनीही धसका घेतला, की काय, अशी चर्चा आहे. ‘शेवटी माकडीणही जशी जीवावर बेतल्यावर पिलाला पायाखाली घेते’, तशी स्थिती असल्याने एकंदर ‘सनबर्न’ला होणारा विरोध थंडावल्याचेच दिसत आहे. ∙∙∙

मग ठोका टाळे, या औद्योगिक वसाहतीला !

‘बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी’, अशी एक म्हण आहे. औद्योगिक व हॉटेलचा कचरा रस्त्यावर टाकला तर अशा आस्थापनांना टाळे ठोकण्यास सरकार मागे पुढे बघणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे. औद्योगिक कचऱ्यावर प्रक्रियेसाठी सरकारने म्हणे प्रकल्प उभारला आहे. डॉकटर साहेब कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत सुमार पंचवीस हजार टन औद्योगिक कचरा गेल्या तीस वर्षा पासून पडून आहे.हजारो टन लोह कचरा पडून आहे.आपण आपला शब्द खरा ठरविण्याचे ठरविले तर एका झटक्यात कुंकळ्ळीतील कारखान्यांना टाळे लागणार. मग चला तर करू, श्री गणेशा. आपल्या दिलेल्या वचनाचा शुभारंभ करण्यास योग्य स्थळ व योग्य योग जुळून आलाय. येतात ना कुंकळ्ळीला , असे स्थानिक विचारीत आहेत. ∙∙∙

विरोधकांकडे बळ कोठे?

नोकरभरती प्रकरणावरून जनतेचे लक्ष भरकट्‍यासाठी भाजपाने सध्या काँग्रेस आमदार कार्लुस फेरेरा यांचे प्रकरण लावून धरले आहे, असा आरोप विरोधक करीत आहेत. काल काँग्रेस कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. कोणी काँग्रेसचा नेताही भाजपाला प्रत्युत्तर देताना दिसत नाही. कार्लुस यांनी ब्लॅकमेल करणाऱ्याला खंडणीची रक्कम दिली यावरून तेच दोषी आहेत, असा भाजपाचा दावा आहे. उलट, पोलिसांच्या सांगण्यावरून ब्लॅकमेलरला ट्रॅप करण्यासाठी आपण पैसे दिले असा कार्लुस समर्थकांचा दावा आहे. एक गोष्ट विरोधकांना मान्यच करावी लागेल की भाजपाकडे ‘आवाज’ मोठ्ठा आहे व त्या तुलनेने काँग्रेस-'आप’ला कार्यकर्त्यांचे बळ नाही. विरोधकांनी नोकरभरती प्रकरण आणखी लावून धरले तर भाजपा आणखीही सांगाडे कपाटातून बाहेर काढेल, अशीच सध्याची भाजपाची तयारी आहे.∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT