पणजी: गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर होणारे बहुप्रतिक्षित खाते वाटप पुन्हा एकदा रखडले. हे खाते वाटप सोमवारी होणार असल्याची माहिती भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने दिली आहे. दरम्यान, खाते वाटपावरून मंत्र्यांमध्ये कमालीची नाराजी आहे. काही मंत्र्यांना महत्त्वाची आणि वजनदार खाती आपल्याला मिळावीत त्यासाठी पक्ष श्रेष्ठींकडे प्रयत्न चालविले आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या शपथविधीसारखे खाते वाटपही आता लांबणीवर पडत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गृह, अर्थ ही महत्त्वपूर्ण खाती मुख्यमंत्री स्वतःकडेच ठेवणार आहेत. तर काही बदल वगळता मंत्र्यांना पूर्वीप्रमाणेच जुनी खाती मिळण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी सोमवारपर्यंत खातेवाटप पूर्ण करण्यात येईल असे सांगितले आहे. त्याप्रमाणे आज शनिवारी रात्री उशिरापर्यंत खातेवाटपाच्या संदर्भातील अधिसूचना निघण्याची शक्यता होती. मात्र, खाते वाटपाबाबतच्या नाराजीमुळे ती रखडल्याची माहिती आहे. दुसरीकडे मात्र खाते वाटपामध्ये फार मोठे बदल होणार नसून मंत्र्यांना जुनीच खाती मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, मंत्र्यांमध्ये खात्यांसाठी मोठी चढाओढ सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम खाते, नगरनियोजन, पर्यटन, उद्योग आदी खात्यांसाठी अनेक मंत्री मुख्यमंत्र्यांकडे तगादा लावत आहेत.
खातेवाटपासंदर्भात घाई नाही मुख्यमंत्र्यांनी नवीन पद्धतीनुसार केंद्राशी सल्लामसलत करून खाती निश्चित करावीत, अशा सूचना आल्यामुळे खात्यांची यादी नड्डा यांना पाठवली आहे. खातेवाटपासंदर्भात कसलीही घाई नाही. मुख्यमंत्री सावंत यांनी कामही सुरू केले आहे. खातेवाटपाचा सोमवारपर्यंत निर्णय होईल’, अशी माहिती भाजपच्या संघटनविषयक नेत्याने दिली.
खातेवाटप असे होण्याची शक्यता
विश्वजित राणे यांना महिला आणि बाल कल्याण, आरोग्य खाते तर रोहन खंवटे यांना महसूल, माविन गुदिन्हो यांना पंचायत आणि वाहतूक, निलेश काब्राल यांना वीज आणि पर्यटन, गोविंद गावडे यांना कला आणि संस्कृती बाबूश, मोन्सेरात यांना महसूल, सुभाष शिरोडकर यांना शिक्षण, रवी नाईक यांना सार्वजनिक बांधकाम किंवा नवे खाते मिळण्याची शक्यता आहे.
दिल्लीला विचारण्याचे धाडस होईना: एका ज्येष्ठ मंत्र्याने ‘गोमन्तक’शी बोलताना मंत्र्यांच्या खात्यांसंदर्भात संपूर्ण अनभिज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘मुख्यमंत्री केंद्राकडे बोट दाखवतात. परंतु केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना कोण काय विचारणार? पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांनाही विचारले जाऊ शकत नाही. विचारले तरी त्यांचा प्रतिप्रश्न असेल, तुम्हाला एवढी घाई का? त्यामुळे दिल्लीला विचारण्याच्या मन:स्थितीत कोणीही नाही.’
मंत्रिमंडळात सुदिन यांचा समावेश!
सूत्रांच्या मते, मंत्रिमंडळात रिकाम्या असलेल्या तीन जागा भरल्यानंतरच खातेवाटप निश्चित केले जावे, असा एक मतप्रवाह आहे. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या वाढीत मगोपचे नेते सुदिन ढवळीकर यांचा समावेश करण्याचा निर्णय पक्का झाला आहे. त्यांना सार्वजनिक बांधकाम खाते देऊन दुसऱ्या किंवा तिसऱ्या क्रमांकावर स्थानापन्न केले जाण्याची शक्यता आहे. शिवाय अन्य पक्षांबरोबरही पक्षश्रेष्ठींची चर्चा सुरू आहे.
दिल्लीचे गोव्यावर लक्ष
मंत्रिमंडळाबद्दल एवढा सस्पेन्स गोव्यात कधीही नव्हता. भाजपच्या राज्यात तर मंत्रिमंडळ व खातेवाटप खूपच आधी निश्चित होत असे. मनोहर पर्रीकर यांच्याकडे तर मंत्रिमंडळाचा आकार व खातेवाटप यासंदर्भात संपूर्ण अधिकार असत. ते केवळ यादी दिल्लीला पाठवून देत. परंतु सध्या दिल्ली पूर्णपणे गोव्यावर लक्ष ठेवून आहे. मुख्यमंत्र्यांना प्रत्येक बाबतीत दिल्लीचा सल्ला घ्यावा लागतो. मुख्यमंत्री कार्यालयाकडे या प्रकारामुळे बैचेनी व अस्वस्थता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.