Digambar Kamat  Dainik Gomantak
गोवा

Goa News: दिगंबर कामतांची केंद्रीय समितीवर निवड

कित्येक माजी मुख्यमंत्र्यांची वर्णी राज्यपालपदी निवड केली जाते.

दैनिक गोमन्तक

गोवा: राजकारणात एक न्याय लागू होतो, तो म्हणजे कुठल्याही ज्येष्ठ नेत्याची कार्यक्षमता कमी झाली, की तिला वरचा हुद्दा देऊन नित्याच्या राजकारणातून तिला बाहेर काढले जाते. त्यामुळे कित्येक माजी मुख्यमंत्र्यांची वर्णी राज्यपालपदी केली जाते. सध्या काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार यांनाही असेच विरोधी पक्षनेते या पदावरून हटवून केंद्रीय काँग्रेस समितीवर घेण्यात आले आहे. यापूर्वी लुईझीन फालेरो यांना नावेलीत चर्चिल आलेमाव यांनी अस्मान दाखविल्यानंतर त्यांना केंद्रीय समितीत सरचिटणीसपद देऊन टाकले होते. आता या नेत्यांना जी वरची जागा दिली गेली, हे त्यांना मिळालेले प्रमोशन म्हणावे का ?

खातीगेली चुलीत..!

मंत्रिमंडळाच्या खातेवाटपाला विलंब लागला आहे. त्यामुळे अनेक मंत्री सचिवालयात फिरकत नसल्याचे वातावरण गोव्यात तयार झाले आहे. खातेच मिळालेले नाही, त्यामुळे उगाच मंत्रालयात जाऊन खुर्ची कशाला उबवा, असा सुज्ञ विचार त्यांनी केला असण्याची शक्यता आहे. परंतु जनतेचा कानोसा घेतला तर काय दिसते? लोकांना कोणालाही खात्यांचे पडून गेलेले नाही. मंत्र्यांना खातेवाटप हा कोणाच्याही जीवनमरणाचा प्रश्‍न नाही.

कोणाला गृहखाते मिळणार किंवा आणखी कोणाला वन, याची फिकीर करण्याचे लोकांनी सध्या सोडून दिले आहे. त्यांच्या दृष्टीने पाणी आणि वीज (विजेचा लपंडाव सध्याच्या तप्त वातावरणात लोकांची ल्हाई ल्हाई करतो) हे महत्त्वाचे प्रश्‍न आहेत आणि ज्या पद्धतीने पाण्याची भरमसाठ बिले पाठवली जातात त्यामुळे लोकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. अनेकांना सध्या 5 ते 10 हजार रुपये बिले आली आहेत. सरकार 16 हजार लीटर पाणी मोफत देण्याची घोषणा करते. परंतु बिलेच एवढी कशी येतात, असा संतप्त सवाल जनता करते आहे. हा मीटरचा प्रश्‍न आहे की बिलिंग व्यवस्थेचा, असा प्रश्‍न जनतेला पडतो. परंतु ज्या संस्थेला हे आऊटसोर्सिंगचे काम दिले आहे, त्यांच्याकडून काहीच उत्तर मिळत नाही. पीडब्ल्यूडी कार्यालयात एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर उत्तरे द्यायला उपस्थित नसतात. कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या बेताल वर्तनानेही लोकांच्या नाराजीत भर पडली आहे. ∙∙∙

हेच फळ काय...

गोव्यातील मंत्र्यांना आता शनिवारपर्यंततरी आपापली खाती मिळतील, अशी अपेक्षा आहे. याच स्तंभामध्ये गेल्या आठवड्यात खातेवाटपाचे सर्वाधिकार मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्याचे भाकीत आम्ही वर्तवले होते. परंतु मंत्रिमंडळाचा शपथविधी होऊन सात दिवस लोटले आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळात 80 सदस्य घेण्यात आले होते. परंतु त्याच संध्याकाळी त्या सर्वांना खाती देण्यात आली. गोव्यात असे काय घडले, ज्यामुळे खात्यांना विलंब लागला, अशा प्रश्‍न कोणालाही पडू शकतो. या विलंबामुळे केंद्रीय नेत्यांनीच खातेवाटपाचा निर्णय अडवून ठेवला आहे, असे वातावरण तयार झाले आहे. दुर्दैवाने त्याचा परिणाम मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर होत आहे. सावंत यांनी मोठ्या हिकमतीने 2022 ची निवडणूक लढवून सर्वाधिक सदस्य जिंकून आणले. आता हेच फळ काय मम तपाला, असे म्हणण्याची पाळी त्यांच्यावर आली तर नवल ते काय? ∙∙∙

आम्ही लाचार, तुम्हीही बना ना!

मये आणि पिसुर्ले येथे खनिज वाहतुकीमुळे लोक संतप्त झाल्याचे एक चित्र निर्माण झाले आहे. गोवा फाऊंडेशनचे क्लॉड अल्वारिस यांनी गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर मोठा हल्ला चढवला. परंतु अद्याप सरकार असो किंवा खाणकंपन्या, कोणीही त्यांची दखल घेतलेली नाही. पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना चोप दिला, अपमानास्पद वर्तणूक करून त्यांना उचलून बाहेर फेकले; तरीही या भागामध्ये कसलाही असंतोष निर्माण झालेला नाही. खाणचालकांना विचारा, ते खाजगीत सांगतील, लोकांचे हे दबावतंत्रच आहे. लोकांना रस्ते तांबडे झालेले हवेच आहेत. लोकांना धूळ हवीच असते. जेवढे जास्त प्रदूषण तेवढी त्यांची ब्लॅकमेलची शक्ती वाढते. सरकारही समज करून बसले आहे, लोकांच्या दबावतंत्रातूनच अशी आंदोलने उभी राहतात आणि कोणाला प्रश्‍न सुटलेला नको आहे. खरोखरच खाणपट्ट्यातील जनता एवढी लाचार आहे का? त्यांची आंदोलने ही खाणकंपन्यांकडून पैसे उकळण्यासाठीच असतात का? ∙∙∙

सुदीपचे म्हणणे खरे ठरले...

निवडणुकीपूर्वी अखिल गोवा खासगी बसमालक संघटनेचे सरसचिव सुदीप ताम्हणकर आझाद मैदानावर पत्रकार परिषद घेत असत. त्यात संघटनेचे प्रश्‍न कमी आणि राजकारणच अधिक असायचे. मात्र, एक विषय ते परत परत सांगायचे. तो म्हणजे, निवडणुकीनंतर लगेच सुधारित मोटार वाहन कायद्याची अंमलबजावणी केली जाईल. आणि खरोखरच एक तारखेपासून हा कायदा लागू होत आहे. त्यामुळे लोक आता म्हणत आहेत, ‘सुदीपबाब तुमचे म्हणणे खरे ठरले.’ ∙∙∙ ∙∙∙

मायकल लोबोच का?

काँग्रेस पक्षाने ज्या पद्धतीने नवीन नेत्यांची निवड केली ती भल्याभल्यांना आश्‍चर्याचा धक्का देऊन गेली आहे. स्वत: दिगंबर कामत यांना आपल्याला डच्चू दिला जाईल, याची कल्पना नव्हती. मायकल लोबोही दोन दिवसांपर्यंत हे पद दिगंबर कामत यांनाच मिळणार असल्याचे खासगीत बोलत होते. मग असे काय झाले की या महत्त्वाच्या पदांवर मायकल लोबो व अमित पाटकर यांची वर्णी लागली? पक्षश्रेष्ठींना गोव्यात तरुण नेते हवे आहेत. दिगंबर कामत सोडले तर पक्षाचा सध्याचा चेहरा तरुणच आहे.

पुढची पाच वर्षे वातावरण तापवायचे असेल तर तरुण नेतेच हवे असतील आणि त्यासाठी पैसा आणि ऊर्जा या दोन्हींची आवश्‍यकता लागणार आहे. मनोहर पर्रीकरांनी 2007 ते 2012 या काळात सरकारविरोधात असंतोष निर्माण केला. त्यासाठी ते अत्यंत तडफेने गोवाभर भ्रमंती करत होते. दिगंबर कामत यांना ही दगदग या वयात सोसणार नाही, असा पक्षश्रेष्ठींचा होरा आहे. स्वत: मायकल लोबो यांनीही सहा महिन्यांत आपण सरकार पाडून दाखवतो, अशी छातीठोक गर्जना केली आहे, जी प्रत्यक्षात येवो अथवा न येवो दिगंबर कामतना शक्य झाली नसती.

पैसा ओतावा, जंग छेडावे, सरकारविरुद्ध वातावरण तापवावे यासाठी कल्पकता आणि शक्ती याची शिदोरी बाळगावी लागेल आणि ती मायकल लोबो आणि पाटकर यांच्याकडे पुरेपूर आहे, असा विचार पक्षश्रेष्ठींनी केला आहे, असे आजतरी वाटते आहे. (परंतु मायकल लोबो यांच्या नियुक्तीवर प्रसिद्ध स्थापत्यकार डीन डिक्रुझ यांनी केलेली मल्लीनाथी विचारात घेण्यासारखी आहे. ते म्हणतात, काँग्रेस पक्षाची यापुढे वाच्याच धरली तर आश्‍चर्य वाटायला नको. ∙∙∙

काय तानावडे साहेब झुकले?

‘दुनिया झुकती है। झुकाने वाला चाहीए’ असे म्हणतात ते खरे. जगातील सगळ्यात मोठा राजकीय पक्ष असा दावा करणाऱ्या आणि केंद्रात व राज्यात सत्तेवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने एका मंत्र्यापुढे झुकणे योग्य आहे का? असा प्रश्न आम्ही नव्हे, काही भाजप समर्थकच विचारायला लागले आहेत. याला कारण म्हणजे भाजपा आमदार व मंत्र्याच्या सत्कार सोहळ्यावेळी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षानी शिष्टाचार म्हणून जेष्ठ मंत्री रवी नाईक यांच्या पुढे झुकून त्याच्या पायाला हात लावला. प्रदेशाध्यक्षाचे हे वागणे काही जणांच्या पचनी पडले नाही, म्हणून आता तानावडे ट्रोल होत आहेत.

साहेब तुम्ही वाकू नका, ताठ रहा व आमदार मत्र्यांना वाकवा, असा संदेश काही भाजपावाले द्यायला लागले आहेत. सदानंद यांचे हल्लीच पक्षात सामील झालेल्या रवी नाईकांपुढे झुकणे त्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या पचनी पडले नाही असे दिसते. मात्र काही कार्यकर्ते याचे समर्थनही करतात, देशाच्या पंतप्रधानांना एका सामान्य कार्यकर्त्यांपुढे झुकण्यास कमीपणा वाटत नाही, तर तानावडे झुकले म्हणून लहान झाले का? तानावडेच्या वाकण्याने पक्षाची हानी नव्हे, फायदाच झाला, असेही काहीजण म्हणायला लागले आहेत. एक मात्र खरे ‘सामोसा खाया, च्याय पिया’ यांनी भाजपाच्या प्रदेशाध्यक्षला झुकवलेच मान गये रवी साहेब! ∙∙∙

सिक्वेरा यांच्या हातीही नारळ?

मायकल लोबो यांना विरोधी पक्षनेते पदाच्या बोहल्यावर चढविण्यासाठी काँग्रेसने दिगंबर कामत यांचा अलगद काटा काढताना दुसऱ्या बाजूला माजी मंत्री असलेले आलेक्स सिक्वेरा यांनाही प्रदेश समितीत कुठलेही स्थान न देता त्यांच्याही हाती जणू निरोपाचा नारळच दिला. सिक्वेरा यांना यापूर्वीच्या समितीत कार्याध्यक्षांचे पद दिले होते. दिगंबर असो किंवा सिक्वेरा, या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी इतरांना मदत करण्याऐवजी निवडणुकीच्यावेळी आपल्या मतदारसंघातच अधिक वेळ राहणे पसंत केले होते. त्यामुळे असे नेते संघटनेत काय कामाचे असे काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला वाटले तर नाही ना! ∙∙∙

नगरसेवक नसलेला प्रभाग!

‘असून नाथ आम्ही अनाथ’ अशी अवस्था कुंकळ्ळी नगरपालिका क्षेत्रातील सावरकटा प्रभागातील नागरिकांची झाली आहे. या प्रभागातील मतदारांनी एका वर्षांपूर्वी आपल्या प्रभागाची सेवा करण्यासाठी व जनतेला मदत करण्यासाठी ज्याला नगरसेवक म्हणून निवडून दिले होते, तो नगरसेवक गेल्या साडेचार महिन्यांपासून गायब झाला आहे. आपला निवडलेला नगरसेवक भेटत नाही, म्हणून काही स्थानिक नागरिकांनी सोशल मीडियावर आपण यांना पाहिले आहे का? असा संदेश पोस्ट केला..पालिका अधिकारी सांगतात नगरसेवक रजेवर गेले आहेत, जनता विचारते नगरसेवकाला किती दिवसाची रजा मिळते? नगराध्यक्ष व अधिकारी मात्र तोंड उघडायला तयार नाहीत. जनता म्हणते नगरसेवक आणा अन्यथा नवा नगरसेवक निवडा. युरीबाब ऐकतात ना! ∙∙∙

उल्हासच्या वाट्याला काय?

राजकारणात मागितल्या शिवाय मिळत नाही आणि दबाव टाकल्या शिवाय झुकत नाही, हे तत्व सगळ्याच राजकारण्यांना समजते असे नाही. काही राजकारणी शिष्टाचाराचे पालन करून पक्ष नेतृत्वावर विश्वास यहेवून पडेल ते काम करतात व हाय कमांड सांगतात तिथे मान झुकवतात, अशा राजकारण्यापैकी एक आहेत, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर. उल्हासने सासष्टीचा गड राखला. भाजपाची सासष्टीत पाटी कोरी राहिली असती, पण उल्हासमुळे सात एक असा स्कोर झाला. साष्टीला उल्हासच्या रूपाने मंत्रीपद मिळणार असा विश्वास साष्टीकारांना होता, मात्र हायकमांडने साष्टीत भाजपाला मागे ठेवून भाजप विरोधी रेजिनाल्ड याला मंत्रिपद देण्याचे कबूल केले आहे, आता उल्हासच्या वाट्याला काय? असा प्रश्न उल्हास समर्थक विचारतात उल्हास म्हणतो थांबा व पहा. ∙∙∙

कुर्टीत गोलमाल...

कुर्टी - खांडेपार पंचायत नेहमीच वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सर्वाधिक सरपंच निवडीचा ‘बहुमान'' याच पंचायतीला जातो. आता तर बेकायदा कृत्यांना नोटिसा पाठवल्यामुळे आपल्यावर अविश्‍वास ठराव आणल्याचा दावा विद्यमान सरपंचाने केला आहे. कदाचित खरेही असेल ते, पण कुर्टी - खांडेपार पंचायतीत नेहमीच बारा गावच्या सतरा भानगडी असतात. कुणाला कसे पकडायचे आणि कायदेशीर करवून घ्यायचे हे आता लपून राहिलेले नाही, त्यामुळे या पंचायतीच्या ग्रामसभाही वादळी होतात. या पंचायतीत भूमिपुत्रांपेक्षा बिगर गोमंतकीयांचीच कामे जास्त असतात, त्यामुळेच हे प्रकार होत असतात, अशी चर्चा सुरू असते, आणि ग्रामसभेत त्याचे पडसादही उमटतात. ∙∙∙

आदर-सन्मान खटकला!

विद्यार्थ्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा स्नेहसंवाद साधण्याच्या हेतूने आयोजित केलेल्या ‘परीक्षा पे चर्चा’ या उपक्रमाचे प्रक्षेपण म्हापशात आयोजित केले होते. तो शासकीय कार्यक्रम होता. त्यामुळे शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीही म्हापशात होती. यावेळी सदानंद तानावडे यांचा आयोजकांनी केलेला आदर-सन्मान मात्र खटकलाही. तो पक्षीय कार्यक्रम असता तर शासकीय अधिकारी तिथे कसे काय होते, असा सवालही उपस्थितांकडून केला जात होता. अशा शैक्षणिक कार्यक्रमात पक्षीय नेत्यांचे नेमके काय काम, असा सवाल तिथे उपस्थित असलेले शिक्षणप्रेमी करीत होते. ∙∙∙

रामदास कामत‌ यांचा विसर

विशेष सन्मान प्राप्त नागरिकांचा राज्य विधानसभेने गौरव करायचा तसेच दोन अधिवेशन सत्रांच्या दरम्यान दिवंगत‌ झालेल्या कर्तृत्ववान सुकन्या- सुपुत्रांना आदरांजली वाहायचा प्रघात आहे. तो पार पाडताना मंगळवारी अनेक गौरवांकितांचा व निरोप घेतलेल्यांचा नामनिर्देश करण्यात‌ आला. अगदी ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू शेन वॉर्न याचेही नाव घेतले गेले. पण चार दशके संगीत नाट्यभूमीची सेवा करणारे सुपुत्र नटवर्य रामदास‌ कामत यांचा मात्र विधानसभेला विसर पडला. कामत साखळीचे रहिवासी, म्हणजे मुख्यमंत्री डॉक्टर सावंत यांच्याच मतदारसंघातले. परदेशी दिवंगतांचे आवर्जून स्मरण करताना आपल्याच सुपुत्राचा विसर पडणे तसे खटकणारेच. आता, या विस्मृतीची भरपाई‌ विधानसभा कशी करते ते पाहूया. ∙∙∙

फोंड्याचे मार्केट...

फोंड्याचे मार्केट संकूल हे खरे म्हणजे गृहमंत्री असताना रवी नाईक यांनी उभारले. पण नंतरच्या निवडणुकीत रवी पराभूत झाले आणि मार्केट संकुलाचे उर्वरित काम थंडावले. नंतरच्या निवडणुकीत रवी निवडून आले खरे पण विरोधात बसावे लागले. पण आता रवी नाईक पुन्हा एकदा सत्तेत आले असल्याने या मार्केट संकुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा मार्केटवाल्यांना लागून राहिली आहे. कारण फोंडा पालिकेने या कारकिर्दीत तर काही मोठे काम केलेले नाही. आताही मार्केट संकुलाचे काम सुरू आहे, ते सुद्धा कूर्मगतीने त्यामुळे रवी पुन्हा सत्तेत आल्याने मार्केट संकुलाचे भिजत घोंगडे मार्गी लागेल, अशी ही अपेक्षा आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT