काँग्रेसच्या आठ आमदारांनी भाजपात प्रवेश केल्यास काल दोन वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त काँग्रेसने विविध ठिकाणी निषेध सभा आयोजित केल्या. याच निमित्ताने दिगंबर कामत यांचा मागच्या निवडणुकीच्यावेळी बांबोळीच्या फुलांच्या खुरसाजवळ घेतलेल्या शपथेचा तो जुना व्हिडिओ पुन्हा व्हायरल झाला. या व्हिडिओत कामत म्हणतात, ‘जे कोण पक्ष सोडून गेले आहेत त्यांना देव शिक्षा करेल. पीडीएफ सरकार करताना त्यावेळी मडगावच्या दामबाबाच्या सालात शपथ घेतली होती, पण ती पाळली नाही. त्यांचे काय झाले हे सर्वांनाच माहिती आहे’. मागच्या दोन वर्षात एक आलेक्स सिक्वेरा सोडल्यास भाजपात गेलेल्या अन्य सात आमदारांच्या हाती फारसे काही लागलेले नाही. दिगंबरांच्या म्हणण्याकडे जर लक्ष दिले, तर या सात आमदारांना देवानेच शिकविलेला हा धडा असे म्हणायचे का? ∙∙∙
काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून येऊन काही महिन्यांतच विकासाचे कारण सांगत भाजपमध्ये उडी घेणाऱ्या आठ आमदारांवरील अपात्रतेचे प्रकरण अद्याप सभापतींकडे प्रलंबित आहे. २४ सप्टेंबर २०२२ रोजी आठ आमदार फुटले आणि भाजपात गेले. त्या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्याने हे आंदोलन, परंतु काँग्रेसने या घटनेचा निषेध म्हणून राज्यातील कळंगुट, जुने गोवे, मडगाव व वास्को (मुरगाव) या चार मतदारसंघात कार्यक्रम केले. आमदार मायकल लोबो, आमदार राजेश फळदेसाई, आमदार दिगंबर कामत आणि आमदार संकल्प आमोणकर यांचे मतदारसंघ व हे कार्यक्रम झाले, परंतु चार आमदारांच्या मतदारसंघात काँग्रेसने का निषेध कार्यक्रम केला नाही हे काँग्रेसजनांनाच माहीत. शिवोली, साळगाव, सांताक्रूझ व नुवे या मतदारसंघात काँग्रेसने निदर्शने का केली नाहीत. राज्यात प्रत्येक मतदारसंघात काँग्रेसचा जनाधार आहे. परंतु त्या ठिकाणी काँग्रेसची बांधणी झाली नसल्याचेच स्पष्ट दिसते. काँग्रेसच्या तेथील कार्यकर्त्यांनी तरी हा कार्यक्रम राबवायला हवा होता. काँग्रेसने विशेष करून तेथील गट समित्यांना असा कार्यक्रम द्यायला हवा होता, तो दिला होता की नाही माहीत नाही. याच ठिकाणी भाजप असते तर पंधरा दिवस अगोदर गट समित्यांना कार्यक्रम दिला गेला असता आणि राज्यभर राळ उडवून दिली असती. ∙∙∙
राज्यात दर दिवशी जीवघेणे अपघात होण्याच्या घटना थांबण्याचे चिन्ह दिसत नाही. सर्रासपणे वाहतूक नियमांची पायमल्ली केली जात असून आता वाहतूक कायद्यात दुरुस्ती करून कठोर कारवाई करण्याची गरज आली आहे. सरकारकडून ठोस पावले उचलल्याशिवाय काही अपघातांची मालिका थांबणार नाही. त्यात वरून रेंट – ए – बाईक आणि कार यांचा उद्रेक होत असल्याने अपघात हे अपवाद असण्याऐवजी नित्याचे झाले आहेत. वाहतूक आणि आरटीओ हे आपले महिन्याचे टार्गेट गाठण्यासाठी एका ठिकाणी उभे राहून काही जणांना दंड ठोठावतात. मात्र, हे केवळ तेव्हढ्यापुरते मर्यादित न राहता, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होऊन त्यांचे वाहतूक परवाने निलंबित करावे, अशी चर्चा सध्या होत आहे. ∙∙∙
सांगोड उत्सवात शुक्रवारी बोट नदीत उलटली. या घटनेत कोणी बुडाला नसल्याने उत्सवाला गालबोट लागले नाही. कुंभारजुवेची खाडी या उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. कालची घटना अनंत काळ या उत्सवावेळी आठवण करून देणार आहे. पोहता येणाऱ्यांनी तत्काळ जी दक्षता दाखवत इतरांना वाचवण्याचे काम केले ते कौतुकास्पद आहे. आमदार राजेश फळदेसाई यांनी ज्यांच्या होडीचे नुकसान झाले त्यांना भरपाई देण्याचे जाहीर केले. फळदेसाई यांचा या मतदारसंघात विशेष दबदबा असला तरी लोकांशी त्यांनी भावनिक नाळ जोडली आहे. आता या घटनेला विसरून पुढील उत्सवात आवश्यक त्या खबरदारी लोक घेतील अशी अपेक्षा. ∙∙∙
मडगावातील युवा समाज कार्यकर्ते प्रभव नायक यांनी काही दिवसांपूर्वी आरोग्य शिबिर आयोजित केले होते. या आरोग्य शिबिराला सहकार्य केले म्हणून आरोग्य खात्यातील एका कर्मचाऱ्याची बदली करण्यात आली. हा कर्मचारी तसा अक्षम आहे. आम्ही नंतर खात्याच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून त्याची परत मडगावात बदली करून घेतली. ही माहिती स्वतः नायक यांनी दिली. लोकांची कामे घेऊन खात्यामध्ये गेल्यास आमदार फोनवरून या अधिकाऱ्यांवर काम न करण्यास दबाव आणतात, पण प्रश्र्न असा आहे की आमदारसुद्धा खात्यातील अधिकाऱ्यांवर लोकांची कामे न करण्यास दबाव आणू शकतात. एरव्ही लोकांची कामे करण्याचे आमदाराचे कर्तव्य असते, पण नकारात्मक कामेसुद्धा आमदार करतात यावर लोकांमध्ये आश्र्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ∙∙∙
राज्यात चोरींचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. डिचोली तालुक्यात तर चोरट्यांनी ठाणच मांडले की काय अशी स्थिती निर्माण झालेली आहे. दर महिन्याला कुठले तरी मंदिर लक्ष्य केले जात आहे. मंदिरातील फंडपेट्या फोडल्या जात आहेत. शनिवारीसुद्धा घटना घडली. या चोरट्याला काही तासांत पकडले असले तरी चोरट्यांचे मंदिरांना लक्ष्य चुकीचे आहे. मोठ्या भक्तिभावाने भाविक देवाच्या पेटीत पैसे टाकतात आणि त्या पैशावर हे चोरटे डल्ला मारतात. मंदिरे सुरक्षित राहिली नाहीत, तर लोकांमध्ये प्रचंड असुरक्षितता निर्माण होईल आणि भाविकांची श्रद्धाही कमी होईल. त्यामुळे ‘काही कर देवा या फंडपेट्या वाचव’ अशी आर्त हाक आता हे भाविक करू लागले आहेत. ∙∙∙
काही गैरव्यवहार झाल्याचे आढळल्यास भू-रूपांतराविषयी आपला अर्ज मागे घेणे हे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांचे विधान हा मोठा विनोदच आहे असे हळदोण्याचे आमदार ॲड. कार्लुस फेरेरा यांनी म्हटले आहे. भू-रूपांतरावरून टीका होऊ लागल्यावर आधी हा भूखंड आपल्या दिवंगत पत्नीला तिच्या कुटुंबीयांकडून मिळाला होता आता तो सामाजिक कार्यासाठी देणार आहे असे भावनिक वक्तव्य नाईक यांनी केले. नगरनियोजन कायद्याच्या कलम १७ (२) नुसार भूखंडाचा विभाग बदल झाल्यात काही गैर आढळल्यास अर्ज मागे घेतो असे नाईक यांनी म्हटले आहे. मुळात भूखंड पूर्ववत करण्यासाठी त्यांना भू-रूपांतरासाठी पुन्हा अर्ज करावा लागणार आहे. कारण कायद्यात अर्जदाराने अर्ज मागे घेण्यासाठी तरतूदच नाही. पेशाने वकील असलेल्या फेरेरा यांनी त्याचमुळे नाईक यांच्या विधानातील विसंगती हेरली आणि त्याला मोठा विनोद संबोधले आहे. नाईक यांचे उदाहरण इतरांनी डोळ्यासमोर ठेवावे असे आवाहन करणाऱ्यांची त्यामुळे आता गोची होणार हे ठरून गेलेले आहे.∙∙∙
प्लास्टर ऑफ पॅरीस म्हणजे पीओपीच्या गणेश मूर्ती विक्रीस बंदी असतानाही मोठ्या संख्येने मूर्ती विक्री झाल्या. राजधानी पणजीत सरकारच्या जवळ असलेल्या व्यक्तींनी उघडरीत्या मूर्ती विक्री केल्या. तेव्हा कारवाई करण्याची धमक गोवा राज्य प्रदूषण मंडळाने दाखवली नाही, केवळ कागदोपत्री घोषणा केल्या गेल्या. आत्ता पर्यावरणमंत्र्यांनी विसर्जनानंतर वाहून आलेल्या पीओपी गणेश मूर्तींचे अवशेष गोळा करण्याचे निर्देश पंचायत जैवविविधता समितींना दिले आहे. परंतु पंचायत क्षेत्रात डोंगारकापणी, खाजन शेती, वृक्षतोडीसारख्या विषयांवर अयशस्वी सिद्ध होत असलेल्या समित्यांवर जबाबदारी देऊन सरकार केवळ आपले हात धुऊन घेत असल्याची चर्चा समाज माध्यमांवर रंगली आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.