Dhangar Reservation : पणजी,: राजकीय बांधिलकी कोणत्याही पक्षाकडे असली तरी आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांनी बेळगाव येथे आयोजित धनगर समाजाच्या महामेळाव्यात केले.
धनगर समाजाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल संघटनेने या मेळाव्याचे आयोजन केले होते. हरियाणाचे राज्यपाल बंगारू दत्तात्रय, कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा या मेळाव्यात सत्कार करण्यात आला. धनगर समाजाचे देशभरातील नेते या मेळाव्यात उपस्थित होते.
दरम्यान, धनगर समाजाच्या उत्कर्षासाठी शेफर्ड इंडिया इंटरनॅशनल उत्तमरीत्या वावरत आहे, असे कवळेकर यांनी सांगितले. धनगर समाजातील व्यक्ती कोणत्याही पक्षाचा आमदार, खासदार व मंत्री बनला
तरी आपल्या समाजाच्या विकासासाठी त्यांनी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल बंगारू दत्तात्रय यांनी केले. कर्नाटकातील धनगर समाजाला एसटीचा दर्जा मिळावा, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन सिद्धरामय्या यांनी केले.
धनगर समाजाचे सुमारे ४ लाख प्रतिनिधी या मेळाव्यात सहभागी झाले होते. या समाजाचे देशभरात २० कोटी मतदार आहेत.
ही संख्या लक्षणीय आहे. समाजाच्या आमदार, खासदार व मंत्र्यांची बऱ्यापैकी संख्या आहे. तथापि, समाजाच्या आमदार, मंत्री व खासदारांच्या संख्येत आणखी वाढ झाली पाहिजे.
- बाबू कवळेकर, माजी उपमुख्यमंत्री
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.