म्हापसा: भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी पुन्हा एकदा आपल्याच सरकारला घरचा आहेर देत; मंत्रिमंडळ तसेच सरकार हे आमदारांना विधेयके विधानसभेत मांडण्यापूर्वी विश्वासात घेत नाही, असे म्हणत नाराजी व्यक्त केली. सध्या आमच्याकडे ४० पैकी अपक्षांसह ३३ आमदारांचे संख्याबळ आहे.
तरीही नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर काही विधेयके मागे घेण्याची नामुष्की ओढवली, अशा शब्दांत त्यांनी सरकारला कानपिचक्या दिल्या.
या पावसाळी अधिवेशनात अनेक विधेयके मांडली. परंतु विरोधानंतर ती मागे घेण्याची नामुष्की ओढवली. याचाच अर्थ, आमदारांचे संख्याबळ आहे म्हणून काहीही करायचे नसते. संख्याबळ असताना विधेयक मागे घ्यावे लागते म्हणजे ‘ऑल इज नॉट वेल’ हेच दिसते. कुठेतरी पाणी मुरते याचा हा प्रत्यय आहे,असे म्हणत लोबोंनी सरकारसह कॅबिनेटला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला.
विधेयके ही गावे, शहर व लोकहितार्थ असावीत. अन्यथा विधेयके ही मांडून परत घ्यावी लागतात. राज्य व लोकशाहीच्या हितार्थ विधेयके मांडली पाहिजेत. याविषयी आम्ही भाजप प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहोत.आता प्रत्येकजण शिक्षित आहे व सर्वांना सर्व काही समजते. आम्ही लोकप्रतिनिधी असल्याने लोक आम्हाला जाब विचारतात, याकडे लोबोंनी लक्ष वेधले.
विधानसभेत कुठलेही विधेयके मांडण्यापूर्वी त्याचा कॅबिनेट व सरकारने सारासार विचार करावा. मुळात जी विधेयके मांडली गेली, त्याची आमदारांना कल्पना नव्हती. अशा विधेयकांबाबत आमदारांना विश्वासात घेऊन आगाऊ माहिती पुरविली पाहिजे. यासंदर्भात लवकरच मुख्यमंत्र्यांसह भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहे, असे मायकल लोबो म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.