Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

खरी कुजबुज: मॅडम, तुम्हाला ध्वनिप्रदूषणाचा त्रास नाही का?

गोमन्तक डिजिटल टीम

मॅडम, तुम्हाला ध्वनिप्रदूषणाचा त्रास नाही का?

‘दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण’ अशी एक म्हण आहे. आपले काही राजकारणी इतरांना ज्ञानाचे डोस पाजातात आपण मात्र आपल्याला हवे तेच करतात. शिवोलीच्या आमदार व मायकल लोबो यांच्या धर्मपत्नी दिलायला लोबो यांनी आपल्या मतदारसंघात रात्रीच्या वेळी कान फोडणारे संगीत स्थानिक पोलिसांच्या मदतीने बिनधास्तपणे सुरू असल्याचा आरोप केला होता. आपण असे गैरकारभार सहन करणार नाही, असा इशारा लोबो मॅडमनी दिला ते बरे झाले. मात्र, मॅडम व मॅडमच्या आमदार पतीच्या हॉटेलात जे चालते ते कोण थांबविणार, असा प्रश्न केला असता मॅडम निरुत्तर झाल्या. मॅडम, नियमांचे उल्लंघन करताना ते नियम सर्वांना सारखेच असतात, याचा विचारही व्हायला नको का? ∙∙∙

तानावडेंची मराठीची इच्छा

राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे हे संसदेत कोकणीतून बोलले. त्यांनी एका विषयाची मांडणी कोकणीतून केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते मराठीतही बोलणार होते. त्यासाठी त्यांना १२ ऑगस्टची तारीख देण्यात आली होती. हिंदी, इंग्रजी वगळता प्रादेशिक भाषेतून विषयाची मांडणी करायची झाल्यास त्याची आधी नोटीस द्यावी लागते. तशी नोटीस त्यांनी दिली होती. मात्र, राज्यसभा १२ ऑगस्टपूर्वीच बेमुदत काळासाठी तहकूब करण्यात आल्याने तानावडे यांची मराठी ऐकण्याचे भाग्य अनेकांना लाभले नाही. आता राज्यसभेच्या हिवाळी अधिवेशनात आपण मराठीतून विषयाची मांडणी करणार आहोत, असे तानावडे यांनी म्हटले आहे. तानावडे यांना अचानकपणे मराठीचा पुळका का आला, हा आता चर्चेचा विषय मात्र झाला आहे. ∙∙∙

जणू वीज खात्याचा मालकच!

अनेक वर्षे काही ठिकाणी काम करणाऱ्या व्यक्ती स्वतःला जणू तेथील मालक किंवा साहेब समजतात. असाच प्रकार सध्या वीज खात्यात सुरू आहे. कंत्राटी कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी बरीच वर्षे सेवा देणाऱ्याची ही कथा आहे. जणू वीज खातेच आपल्या सूचनेनुसार चालते, असे वाटावे असा त्याचा रुबाब आहे. कर्मचाऱ्यांना तो धमकावतो. त्यामुळे कंत्राटी कामगार या व्यक्तीला जरा दचकूनच आहेत. परंतु वारंवार त्या व्यक्तीचा रुबाब वाढत चालला आहे, त्यामुळे त्याचा त्रास कंत्राटी कर्मचाऱ्यांना होत असल्याच्या तक्रारी आहेत. कंत्राटी कामगार असल्याने त्यांच्या तक्रारींकडे फारसे गांभीर्याने कोणी पाहत नाही, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळेच त्या व्यक्तीची दादागिरी वाढत असल्याचे दिसून येत आहे. ∙∙∙

पुन्‍हा कोर्टाची पायरी चढावी का?

हणजूण-वागातोर येथील ध्वनिप्रदूषणाच्या विरोधात स्थानिकांनी एल्गार पुकारला आहे. याच पार्श्वभूमीवर, गेले दोन दिवस हणजूणवासीय व इतर समविचारी लोकांनी एकत्रितपणे हणजूण पोलिस स्थानकावर मेणबत्ती मोर्चा काढला. पहिल्या दिवशी दक्षिण गोव्याचे खासदार कॅ. विरियातो यांनीही सहभाग घेतला होता. विरियातो यांनी या ध्वनिप्रदूषणास सरकार जबाबदार आहे, अशा शब्दांत सडकून टीका केली होती. मात्र सरकार पक्षाकडून त्‍या संदर्भात दखल घेतली गेली नाही. न्‍यायमूर्ती महेश सोनक यांनी वेळोवेळी ध्‍वनि प्रदूषणाची स्‍वेच्‍छा दखल घेऊन संबंधितांना वटणीवर आणले होते. पुन्‍हा कुणीतरी कोर्टाची पायरी चढावी, अशी अशी सरकारची अपेक्षा आहे का?∙∙∙

बळीचा बकरा?

राज्य सरकारमधील एका शासकीय अधिकाऱ्याच्या खासगी कामावेळी पोलिस एस्कॉर्ट सेवा पुरविण्यात हलगर्जीपणा ठेवल्याने एका पोलिस कॉन्स्टेबलला (ड्युटी मास्तर) निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे हा विषय आज पोलिस खात्यात चर्चेत राहिला. मात्र, ज्या ड्युटी मास्तरला निलंबित केले आहे, त्याला हणजूणमधील ध्वनिप्रदूषणाच्या प्रकरणात कथित बळीचा बकरा केल्याचे समजते. या कॉन्स्टेबलचे क्लब व रेस्टॉरंटवाल्यांशी संगनमत असल्याने त्याच्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा पोलिस अधिकाऱ्यांनी दावा केला आहे. परंतु निलंबनाची खरी कारवाई ही संबंधित आयएएस अधिकाऱ्याला योग्यरीत्या एस्कॉर्ट सेवा दिली नाही, याचा राग मनात धरून केल्याची चर्चा मात्र पोलिस खात्यात सुरू होती. ∙∙∙

स्मार्ट सिटीतील ‘ते’ बीएसएनएलचे बॉक्स

पणजी स्मार्ट सिटी होत आहे... त्यासाठी इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेड (आयपीएससीडीएल) ही सरकारी कंपनी २०१६ पासून झटत आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत वीज खात्याचे ट्रॉन्स्फॉर्मर बदलण्यात आले आणि नवी यंत्रणा त्याठिकाणी बसविण्यात आली. त्यामुळे ठिकठिकाणी दिसणारे ट्रान्स्फॉर्मर आता नजरेस पडत नाहीत. परंतु काळाच्या ओघात बीएसएनएल ही दूरध्वनी सेवा देणारी सरकारी यंत्रणा काही बदलली नाही. या सेवेत काळाच्या मागे राहून बदल होताना दिसतात. अजूनही शहरातील जीर्ण झालेले दूरध्वनी यंत्रणेचे किंवा इंटरनेट सेवेचे असणारे बॉक्स तसेच आहेत. काही ठिकाणी तर जीर्ण झालेल्या बॉक्सची अवस्था बिकट झाली आहे. सध्या या बॉक्सचा एक व्हिडिओ समाजमाध्यमांत व्हायरल झाला आहे. त्याठिकाणी कर्मचारी काम करतानाचा व्हायरल झालेला व्हिडिओ ‘बीएसएनएल’ची स्थितीच दर्शवीत आहे. ∙∙∙

‘कोकणी’ आंदोलनाला पाठिंबा मिळत नाही?

सध्या काही लोकांनी रोमी कोकणीला राजभाषेचा दर्जा मिळवून देण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. दाल्गाद कोकणी अकादमी ही संस्था रोमी कोकणीच्या संवर्धनासाठी सुरू केलेली संस्था आहे. अकादमीचा ग्लोबल कोकणी फोरमला आशीर्वाद असला तरी आम्ही आंदोलनात सहभागी होणार नाही, असे तोमाझीन कार्दोज सांगतात. आता कोकणी आंदोलनाला लोकांचा पाठिंबा मिळत नाही. त्यामुळे कोकणीसाठी आंदोलने करणे शक्य होत नाही. असे कार्दोज सांगतात. असे असेल तर मग रोमी कोकणीला राजभाषा दर्जा मिळवून देण्यासाठी अट्टहास का? असा प्रश्र्न लोकांना पडणे स्वाभाविकच आहे.∙∙∙

खाजन जमिनीची कथा

केंद्र सरकार खाजन जमिनी फेरवापरात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची मदत देऊ शकते. हा आशावाद आहे राज्यसभेचे खासदार सदानंद शेट तानावडे यांचा. अलीकडे ते भलतेच सक्रिय झाले आहेत. दिल्ली दरबारी मंत्र्यांसोबत असलेल्या संपर्काचा फायदा राज्याला करून देण्यासाठी ते दुवा म्हणून वावरू लागले आहेत. त्यांनी परस्पर केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांची भेट घेऊन खाजन जमिनी लागवडीखाली आणण्यासाठी निधीची मागणी केली आहे. आता राज्य सरकारने त्यासाठी औपचारिक प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. तानावडे हे याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी याप्रश्नी तज्ज्ञांचे म्हणणे जाणून घेण्याचे ठरवले आहे. खाजन मंडळ स्थापन करण्याच्या हालचाली त्यांनी सुरू केल्या आहेत. एकीकडे तानावडे हे केंद्राकडे डोळे लावून बसले असतानाच मुख्यमंत्र्यांनी स्थानिक पातळीवरच हातपाय हलवणे सुरू केले आहे. याला काय म्हणावे? ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

St Estevam Accident: 'सांतइस्तेव प्रकरण' पोहोचणार मंत्रालयात? नातेवाईकांचे देवालाही साकडे

Bhutani Infra: ‘मेगा प्रोजेक्ट’ चे अधिकार आता मुख्यमंत्र्यांकडे; 'भूतानी’ला भाजप सरकारचीच परवानगी असा काँग्रेसचा दावा

बॉलीवूड, टॉलीवूडचा प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक जानी मास्टरला गोव्यात अटक, सहकारी महिलेचा 6 वर्षापासून लैंगिक छळ केल्याचा आरोप

Ratnagiri Crime News: स्वप्नात दिसला मृतदेह, सिंधुदुर्गातील तरुण पोहोचला पोलीस ठाण्यात; तपासात उघड झाली धक्कादायक माहिती

तम्नार प्रकल्प रखडणार! कर्नाटकचे शेपूट वाकडेच, सिद्धरामय्यांनी कळसा-भांडुराचा मुद्दा केला उपस्थित

SCROLL FOR NEXT