खरी कुजबुज: डोंगर पोखरून!

Khari Kujbuj Political Satire: मंत्री सिक्वेरांच्या अंमलीपदार्थांच्या विधानावरूनही मुख्यमंत्र्यांना सारवासारव करावी लागली होती
Khari Kujbuj Political Satire
Khari Kujbuj Political SatireDainik Gomantak
Published on
Updated on

डोंगर पोखरून!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष तानावडे गेले तीन चार दिवस, पक्षशिस्तीचा राग आळवत होते. भाजपमध्ये सारे काही आलबेल नाही, असा शेरा कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी मारला होता, त्यानंतर लोबोंना समज दिली जाणार असे वातावण तानावडे यांनी निर्माण केले होते. मात्र, ते फुसके निघाल्याचे आता दिसून आल्यानंतर लोबो सारख्यांना तानावडे वगैरेंचा आशीर्वाद आहे,की काय, अशी शंका घेतली जाऊ लागली आहे. तानावडे यांनी लोबो यांना भेटून समज देणार, असे जाहीरपणे सांगितले होते. मात्र लोबोंची भेट घेतल्यानंतर लोबोंचीच पाठराखण करताना तानावडे यांनी लोबोंच्या विधानाचा विपर्यास केला गेला ,असे प्रमाणपत्र देऊन टाकले आहे. यामुळे अलिकडे मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणणारी विधाने करणाऱ्यांचा बोलवता धनी कुणी वेगळाच असावा, आणि तानावडे यांचा त्यांना आशीर्वाद असावा, असा संशय घेतला जात आहे. तानावडे यांनी लोबो प्रकरणात डोंगर पोखरून उंदीर काढला की, आणखी काय, अशी चर्चा आता भाजप वर्तुळात सुरू झाली आहे. ∙∙∙

सिक्वेरांचे बोल..अन् सारवासारव

गेल्या काही दिवसांपासून सरकारात राहून सरकारला अडचणीत आणू शकणाऱ्या बाता किंवा विधाने काही मंत्री, आमदारांकडून सातत्याने होत आहेत. त्यामुळे भाजप प्रदेश नेतृत्वाला सारवासारव करण्यासाठी पुढं यावं लागत आहे. मायकल लोबोंनी तर सरकारला घरचा आहेर दिला होता.त्यावर प्रदेशाध्यक्ष तानावडेंनी समज देण्याच्या गप्पा केल्या अन् लोबोंच्या भेटीनंतर त्यांची भूमिकाच बदलली. याशिवाय मंत्री आलेक्स सिक्वेरांच्या अंमलीपदार्थ सर्वत्र मिळतात, या विधानावरूनही मुख्यमंत्र्यांना त्यांना तसं नव्हे, असं म्हणायचं होतं, अशी सारवासारव मुख्यमंत्री सावंत यांना करावी लागली होती. पण एरव्ही अगदी मितभाषी म्हणून ओळख असलेले आलेक्स बाब बोलू लागल्यामुळे अन् तेही सरकारलाच अचडणीत आणत आहेत. अशी विधाने होण्यामागे मंत्रिमंडळातील फेरबदलाची धास्ती किंवा पद डळमळीत असल्याचे तर कारण नसावे ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगतेय..∙∙∙

फातोर्डा पोलिस स्थानकाची स्थिती केपेसारखी होणार का?

चंद्रकांत उर्फ बाबू कवळेकर जेव्हा उपमुख्यमंत्री होते, तेव्हा त्यांनी केपेत पोलिस स्थानकाच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू केले होते. गत विधानसभा निवडणुकीत बाबू पराभूत झाले व इमारतीचे बांधकाम बंद पडले. आम्ही फातोर्ड्याच्या पोलिस स्थानक इमारतीच्या बांधकामावर तशी स्थिती आणू देणार नाही, असे विजयबाब यांनी बजावले. विजय यांच्या या वक्तव्याने मात्र उपस्थितांत शांतता पसरली. विजयबाबनी पुढे पुस्ती जोडली. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलिस स्थानक इमारत व पोलिस क्वॉटर्सच्या इमारती पूर्ण केल्या जातील. म्हणजे फातोर्ड्यात यदा कदाचित काहीही बदल झाले, तर पोलिस स्थानक इमारतीचे काम रखडणार नाही, अशी चर्चा लगेच तिथे सुरू झाली. ∙∙∙

पोलिसांना न्यायालयाची धास्ती?

शुक्रवारी बार्देश उपजिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, पोलिस व इतर मुख्य शासकीय अधिकाऱ्यांसोबत गणेशोत्सवानिमित्त पूर्वतयारी बैठक घेतली. यावेळी मंडळांना आवाहन केले की, संबंधितांनी ध्वनी प्रदूषण नियंत्रणाचे काटेकोरपणे पालन करावे व रात्री दहानंतर मोठ्या आवाजात डीजे किंवा इतर संगीत वाजवू नये. कारण, कुणी उल्लंघन केल्यानंतर पहिला फोन पोलिस स्थानकात जातो किंवा मोबाईलद्वारे तक्रार केली जाते. आणि लोकांना वाटते की, आम्ही ध्वनी प्रदूषण करण्यास परवानगी देतो. मुळात आमचा यात सहभागच नसतो, असे काही पोलिस अधिकाऱ्यांनी बैठकीत बोलून दाखवले. त्यामुळे मंडळांनी उल्लंघन होणार नाही, याची काळजी घ्यावी अशी विनंती या पोलिस अधिकाऱ्यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना केले. सध्या ध्वनी प्रदूषणाचा विषय राज्यभर गाजत आहे. आणि असे प्रकार जेव्हा घडतात, तेव्हा जनहित याचिका दाखल केली जाते व अधिकाऱ्यांना न्यायालयात उभे केले जाते. त्यामुळे सध्या पोलिस अधिकारी म्हणे प्रचंड धास्तीत आहेत, हे आजच्या बैठकीतून पुन्हा एकदा स्पष्ट झाले.

विकासकामे विजयला ‘इम्प्रेस’ करण्यासाठी नव्हे!

फातोर्ड्यातील गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई हे सरकारवर सर्वाधिक टीका करणारे असूनही फातोर्ड्यात अशी भराभर विकासकामे कशी होतात, हा प्रश्र्न सर्वासाधारण लोकांना पडणे स्वाभाविक आहे. पण याचे उत्तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यानी फातोर्डा पोलिस स्थानक इमारतीच्या पायाभरणी सोहळ्यात दिले. ते म्हणाले विजय सरकारवर जास्तीत जास्त टीका करीत असतो. म्हणून त्यांना इम्प्रेस करण्यासाठी सरकार फातोर्ड्यात विकासकामे करीत नाही. तर लोकांची सुरक्षा, त्यांचे हित लक्षात ठेवून ही विकास कामे केली जातात. विजय यांनी केवळ सरकारवर टीकाच करू नये तर सरकार जी चांगली कामे करतो, त्याची प्रशंसाही करावी, असा सूचनावजा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी दिला व उपस्थितांत एकच हशा पिकला. ∙∙∙

माविन बाबांचे ‘गोंयकारपण’

स्वातंत्र्य दिनानिमित भाषण करताना वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो यांनी सामाजिक कार्यकर्त्यांवर निशाणा साधला. विकासकामांमध्ये अडथळे आणून राज्याचा विकास रोखणे हे गोंयकारपण नव्हे, असे माविनबाब म्हणाले. या विधानावरून लोकांनी माविनबाबांची सोशल मीडियावर खिल्ली उडवली. रस्त्यावरचे खड्डे आणि झालेली दुर्दशा हे खरे गोंयकारपण, अशी एक प्रतिक्रिया आली. राज्यातील मोठ्या फॅक्टरी, कॅसिनो, हॉटेल येथे बहुतांश परप्रांतीय काम करणे, हे गोंयकारपण असे काही म्हणाले. प्रत्येक मंत्री - आमदार आपल्या सोयीनुसार गोंयकारपण निश्चित करत असून आम्ही खपवून घेणार नसल्याच्या प्रतिक्रिया देखील लोकांनी दिल्या. ∙∙∙

बांबोळीतील चोऱ्या

बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे इस्पितळ आपल्या रुग्णसेवेसाठी प्रसिद्ध आहे. दिवसासाठी शेकडो रुग्णांची येजा या इस्पितळात असते तसेच शेकडो रुग्ण तेथे उपचारही घेत असतात. या रुग्णांसोबत येणारे नातेवाईक इस्पितळाच्या कक्षाबाहेर असतात. त्यांच्या वस्तूही तेथेच असतात. सुरक्षारक्षक असतानाही या वस्तूंची चोरी होण्याचे प्रकार अलीकडे वाढले आहेत. गोवा वैद्यकीय महाविद्यालय संकुलात असलेल्या पोलिस चौकीत नातेवाईक अशा चोऱ्यांच्या तक्रारी देऊ लागले आहेत. यामुळे गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक जातात असे नव्हे ते चोरही जातात असा नवा शोध समोर आला आहे. ∙∙∙

Khari Kujbuj Political Satire
खरी कुजबूज; दोस्त, दोस्त ना रहा!

तो अधिकारी कोण?

मोपा पोलीस ठाण्यावरील तो पोलीस उपनिरीक्षक कोण ,अशी चर्चा आता पेडण्यात सुरू झाली आहे. टॅक्सीवाल्यांनी केलेल्या आंदोलनानंतर तुम्हाला काय ते दाखवतो, अशी जाहीर धमकी त्या उपनरीक्षकाने दिलेला व्हीडिओ सध्या व्हायरल झाला आहे. यापूर्वीच पोलिस खात्याची सूत्रे पेडण्यातून हलतात,असा आरोप होत असताना जाहीरपणे धमकी देणारा हा अधिकारी कोण आणि त्याला कोणाचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता पेडण्यात ऐकू येऊ लागली आहे. दादारी गोटातील उच्चपदस्थाचा वरदहस्त त्याच्या डोक्यावर आहे,असेही सांगण्यात येऊ लागले आहे. व्हीडिओ व्हायरल झाला असतानाही पोलिस दलाकडून काहीच कारवाई त्या अधिकाऱ्यावर होत नाही, याचा अर्थ त्याला कोणाचा मोठ्याचा पाठिंबा आहे असा काढला जात आहे. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com