Attacked on Tourist in North Goa: उत्तर गोव्यातील किनारी भागात गुंडागर्दी सुरू असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. दिल्लीतील पर्यटक कुटुंबीयांवर हणजूण येथील एका रिसॉर्टच्या बाहेर चार स्थानिक युवकांनी सुरीने प्राणघातक हल्ला केला.
यात तिघेजण गंभीर जखमी होऊनही हणजूण (Anjuna) पोलिसांनी किरकोळ हल्ल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. पीडितांनी घटनेचा व्हिडिओ व्हायरल केल्यानंतर पोलिसांनी सहा दिवसांनी कलम 307 नुसार गुन्हा दाखल करून तिघांना अटक केली. या प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे.
रॉयस्टन रेजिनाल्डो डायस, त्याचा भाऊ नायरॉन रेजिनाल्डो डायस (दोघे रा. डिमेलो वाडा, हणजुण) व काशिनाथ विश्वोर आगरवाडेकर (सोरांतो वाडा, हणजुण) अशी अटकेत असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. चौथा संशयित सलीम काशीम फरारी आहे.
गैरवर्तन, कामावरून काढल्याचे कारण
शर्मा कुटुंब हणजुणेतील स्पाझिओ लेझर रिसॉर्टमध्ये 5 मार्चला उतरले होते. तेव्हा तेथील कामगार रॉयस्टनने त्यांच्याशी गैरवर्तन केले. व्यवस्थापकाकडे तक्रार दाखल केल्यावर त्याला घरी पाठवण्यात आले होते. यामुळे शर्मा कुटुंबियाला धडा शिकवण्यासाठी रॉयस्टनने इतर तिघांसोबत हल्ला केला.
व्हायरल व्हिडिओमुळे उलगडा; मुख्यमंत्र्यांकडून दखल
हल्लेखोरांवर कारवाई कारवाई न झाल्याने दिल्लीस्थित शर्मा कुटुंब व्यथित झाले. त्यांनी प्राणघातक हल्ल्याचा व्हिडिओ व्हायरल केला.
गोवा राज्य पर्यटकांसाठी असुरक्षित आहे, असा संदेश या व्हिडिओद्वारे दिला गेला.
रिसॉर्टच्या आवारात प्राणघातक हल्ला होऊनही पोलिस गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याऐवजी त्यांना मदत करत असल्याने पर्यटकांना गोव्यात जाणे धोकादायक बनले आहे, असे त्यांचे मत आहे.
सोशल मीडियावर ‘आपबिती’ कथन केल्यानंतर पोलिसांची निष्क्रियता उघड झाली. राज्याची देश-विदेशात नाचक्की झाली आहे.
या प्रकरणी हलगर्जीपणा केल्यामुळे तपास अधिकारी उपनिरीक्षक फ्रान्सिस्को झेव्हियर यांची रवानगी उत्तर गोवा राखीव पोलिस पथकात करण्यात आली.
असा केला हल्ला
शर्मा कुटुंबीय रिसॉर्टमधील जलतरण तलावात आंघोळ करत होते. आश्विनी कुमार हे संध्याकाळी रिसॉर्टबाहेर आल्यावर रॉयस्टन व इतरांनी शिवीगाळ करत धमकी दिली. आश्विनी यांनी मोबाईलने व्हिडिओ काढण्यास सुरवात केल्याने रॉयस्टन व इतरांनी त्यांच्यावर सुरीहल्ला केला.
आरडाओरडा केला असता शर्मा कुटुंबीय धावत रिसॉर्टबाहेर आले. यावेळी त्यांच्यावरही सुरीने हल्ला करण्यात आला. मारेकऱ्यांना रोखताना जतीन शर्मा याच्यावर देखील सुरीने प्राणघातक हल्ला करण्यात आला.
हणजूण (Anjuna) येथील घडलेली हिंसक घटना धक्कादायक आणि असह्य आहे. मी पोलिसांना दोषींवर कठोरात कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. असे समाजकंटक हे राज्यातील लोकांच्या शांतता आणि सुरक्षिततेला धोका निर्माण करणारे असून त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.