Goa News : कुडचडे, चंदेरी महोत्सवासाठी मैदान वापरण्यासाठी तीन महिने अगोदर दिलेला अर्ज रेंगाळत ठेवून योग्यवेळी परवानगी योग्यवेळी देण्यात कुडचडे-काकोडा पालिकेने बेपर्वाई व दिरंगाई केल्याने संस्थेचे मोठे नुकसान झाले आहे.
पालिकेचा हा गैरकारभार पालिका प्रशासन तसेच संबंधितांच्या निदर्शनास आणून देण्याचा निर्णय चंदेरी समितीच्या कार्यकारी मंडळाने जन उत्कर्ष शिक्षण संस्थेच्या सभागृहात दयानंद कला केंद्राचे अध्यक्ष मोर्तू नाईक यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत घेण्यात आला.
हा महोत्सव कदंब महामंडळाच्या नवीन बसस्थानक मैदानावर गेली पाच वर्षे होत आहे. या मैदानावर अन्य कुठलाही कार्यक्रम होत नाही. वर्षभर हे मैदान ओसाड असते. एरवी ते अपघाती वाहनांचे भंगार, झाडा-झुडपांनी भरलेले असते. अशा वेळी समिती स्वखर्चाने मैदान स्वच्छ करून हा उत्सव घडवून आणते.
महोत्सवाची तारीख जवळ आली आणि जादा पैसे देऊन कामे पूर्ण करावी लागली. त्यामुळे समितीच्या सदस्यांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला, असे खजिनदार खांडेकर म्हणाले. या प्रकाराला जबाबदार कोण, अशी विचारणा सभासदांनी केली आणि या प्रकरणाची चौकशी व्हावी, असे सांगितले.
वर्ष २०२३ हे स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचे ५० वे पुण्यतिथी वर्ष. पुढील वर्षी भाऊसाहेबांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सांस्कृतिक समारंभ आयोजित करण्याचे संस्थेने निश्चित केले आहे. त्यानिमित्त विविध ठराव घेण्यात आले.
या बैठकीत उपाध्यक्ष अशोक नाईक, सुभाष नाईक, मोहनदास गावस देसाई, माजी नगरसेवक मनोहर नाईक, सुधाकर नाईक, खजिनदार नवीन खांडेकर, ज्येष्ठ कलाकार ज्ञानेश्वर नाईक, जयकुमार खांडेकर, वनिता वस्त, राया देसाई, भिकू नाईक यांनी विचार मांडले. सचिव बंटी उडेलकर यांनी स्वागत आणि आभार मानले.
बैठकीतील महत्त्वपूर्ण ठराव
भाऊसाहेबांचा अर्धपुतळा उभारण्याच्या पालिकेकडील प्रस्तावाला चालना देणे
चंदेरी महोत्सवाला राज्यमान्यतेसाठी प्रयत्न करणे
भारत सरकारच्या महान पुरुषांच्या शताब्दी जयंती, पुण्यतिथी वर्ष साजरे करणे योजनेअंतर्गत वर्षभर कार्यक्रम आयोजित करणे
गोठमरड काकोडा-कुडचडे येथील नंदा तलावाचा आंतरराष्ट्रीय रामसर यादीत समावेश केल्याने केपे - सांगे तालुक्यातील जलसागरस्थळी एक सप्ताह जलमहोत्सव साजरा करणे
भाडे भरूनही भुर्दंड
यावर्षी केंद्राने पालिकेचे ३.४० लाख रुपये भाडे भरले. तरीही पालिकेने महोत्सवाला अवघेच दिवस उरले असताना मैदान वापरण्यास ना हरकत दाखला दिला. त्यामुळे यंदाचा महोत्सव होणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली.
अनेक कलाकार, कंत्राटदारांनी माघार घेतली. मनोरंजन पार्क साहित्याचे ट्रक तेवढे मैदानावर पोहोचले; पण पालिका अधिकाऱ्यांनी त्यांना साहित्य उतरवण्यास विरोध केला. भरलेले ट्रक सुमारे सहा दिवस मैदानावरच राहिले. त्यामुळे संस्थेला विलंब भुर्दंड द्यावा लागला, असे या बैठकीत सांगण्यात आले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.