Bori accident 
गोवा

वीज कर्मचाऱ्यांवर मृत्‍यूचा घाला

Ramesh Vaskar

रमेश वसकर

बोरी :

मडगावहून बोरीमार्गे फोंड्याला परतणाऱ्या वीज खात्याचा खांबवाहू ट्रक तारीभाट - बोरी सर्कलजवळील संरक्षक बेटावर उलटल्याने ट्रकच्या हौद्यात उभे असलेले तीन कामगार विजेचे खांब अंगावर पडल्याने चिरडून जागीच ठार झाले. या ट्रकमध्ये एकूण नऊ कामगार होते, त्यातील जखमी पाचजणांना बांबोळी इस्पितळात उपचारासाठी दाखल केले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. थरकाप उडवणारा हा अपघात आज (गुरुवारी) दुपारी पावणे दोनच्या सुमारास बोरीत घडला. मृत कामगारांत दोन आमोणेचे तसेच एक खांडोळ्याचा रहिवासी आहे.

मडगाव येथून वीज खांब घेऊन जी. ए. ०१ जी. ७५२७ या क्रमांकाचा अवजड ट्रक दुपारी बोरीमार्गे माशेल भागात जाताना हा अपघात घडला. या अपघातात माशेल वीज खात्याचे कर्मचारी पुंडलिक फोंडू जल्मी (वय ४५) जल्मीवाडा - खांडोळा, तर आंबेशीवाडा - आमोणे येथील समीर राजाराम परब (वय ४२), सगुण लक्ष्मण गावस (वय ३०) हे तिघेजण जागीच ठार झाले.

ट्रकचालकाचे नियंत्रण गेले आणि...

बोरी सर्कलजवळ ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा गेल्याने उतरणीवरील वळणावरच ट्रक उलटला. ट्रकच्या हौद्यात विजेचे दहा मोठे सिमेंट काँक्रिटचे खांब होते. हे खांब ट्रक कलंडल्यावर रस्त्यावर विखुरले गेले. हे खांब अंगावर कोसळल्याने तिघेजण ठार तर अन्य सहाजण जखमी झाले. जखमींपैकी ट्रकच्या केबिनमधील एकाला किरकोळ दुखापत झाली. अन्य सर्व जखमींना इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमी झालेल्यांत प्रणव नाईक (कुंभारजुवे), घनश्‍याम नाईक (तिवरे), लाडू काणकोणकर (खोर्ली), विनायक गावडे (भोमा), ट्रकचालक प्रदोष नाईक (शिरोडा) कामगार समीमुल्ला खान (बेतोडा) यांचा समावेश आहे.

मोठा आवाज झाला आणि सर्वत्र रक्ताचा सडा

ट्रक रस्त्यावर कोसळल्यावर मोठा आवाज झाला व आजूबाजूचे लोक जमा झाले. रस्त्याच्या दोन्ही बाजूने वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलिस निरीक्षक प्रदीप वेळीप यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक सुरळीत करण्यात आली. वाहनाखाली आणि विजेच्या खांबाखाली पडून मृत झालेल्या व्यक्तींच्या रक्ताचा सडा पडला होता. रस्त्यावर भयावह चित्र निर्माण झाले होते. फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक हरीष मडकईकर हे पोलिस ताफ्यासह घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी मृतदेह बाहेर काढले आणि क्रेनच्या साहाय्‍याने रस्त्यावर आडवा झालेला ट्रक आणि रस्त्यावर पडलेले विजेचे खांब संरक्षक बेटावर ठेवले.

जखमींना इस्‍पितळात हलविले

अपघाताची माहिती मिळताच वीज खात्याचे अधिकारीही घटनास्थळी धावले. मृतदेह रुग्णवाहिकेतून फोंडा आयडी उपजिल्हा इस्पितळात व त्यानंतर बांबोळी वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले. तसेच जखमी व्यक्तींनाही उपचारासाठी बांबोळीला पाठविण्यात आले. बोरीत ट्रकला अपघात होऊन तीन व्यक्ती ठार झाल्याचे वृत्त पसरताच बोरीच्या या रस्त्यावर विविध भागातील लोकांची गर्दी झाली. बचावकार्यात स्थानिकांनी तसेच रस्त्यावर थांबलेल्या वाहनचालकांनी सहभाग घेतला. फोंडा पोलिसांनी अपघाताचा पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे.

गंभीर जखमींपैकी प्रणव नाईक, विनायक गावडे, घनश्याम नाईक यांना बांबोळी इस्पितळात दाखल करण्यात आले असून, प्रणव नाईक याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. तर इतर तिघा जखमींवर फोंडा उपजिल्हा इस्पितळात उपचार करण्यात आले आहेत.

या अपघाताने मनाला तीव्र यातना झाल्या. या घटनेचा सविस्तर अहवाल मागवला आहे. जखमींना उत्तमोत्तम उपचार मिळावेत यासाठी तातडीने गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाला भेट दिली. या घटनेत जीव गमावलेल्या वीज कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सरकार सहभागी आहे.

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

जनतेला सुरळीत वीज प्रवाह देण्याच्या प्रयत्नात वीज कर्मचाऱ्यांनी आपला जीव धोक्यात घातला. मृतांच्या वारसांना आणि जखमींना सरकार भरपाई देईल. पण, त्यांच्या कुटुबांचे झालेले नुकसान न भरून येणारे आहे, याची जाणीव सरकारला आहे. जखमींना उत्तम उपचार मिळण्याची सरकार व्यवस्था करत आहे. मृतांच्या कुटुंबियांच्या दुःखात वीज खाते सहभागी आहे.

- नीलेश काब्राल, वीजमंत्री

हा अपघात का झाला याची चौकशी झाली पाहिजे. वाहनाच्या मागच्या भागात या कर्मचाऱ्यांना उभे कोणी ठेवले, याचे उत्तर वीज खात्याने आणि सरकारने दिले पाहिजे. त्यांच्या मृत्यूस कारणीभूत कोण? हे सरकारने सांगावे. सरकार आपल्या कर्मचाऱ्यांच्या जीवाची काळजी घेऊ शकत नाही, तर ते जनतेचे संरक्षण कसे करणार.

- दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष

अपघातप्रवण बेटासंबंधी वृत्त प्रसिद्ध पण..!

फोंडा - मडगाव महामार्गावर असलेल्या अपघातप्रवण बेटांसंबंधी ‘दैनिक गोमन्तक’ने वेळोवेळी सचित्र वृत्त प्रसिद्ध केले आहे. पुलानंतर बोरी सर्कलकडे येणारा रस्ता उतरणीचा असल्याने वाहनचालकांचा वाहनावरील ताबा जात असल्याने जास्त अपघात होत आहेत. वाहतूक बेटाच्या ठिकाणी रस्ता रुंद करून वाहतूक योग्य करण्याची सूचनाही यापूर्वी करण्यात आली होती. मात्र, त्याची अजून कार्यवाही झालेली नाही. या रस्त्यावर कायम अपघातांचे सत्र सुरूच असून अनेकांचे बळी गेले आहेत. मात्र, हा अपघात फारच भयानक होता, अशा प्रतिक्रिया स्थानिक नागरिक तसेच रस्त्याच्या लगत असलेल्या दुकानदारांनी व्यक्त केल्या. अपघाताचे वृत्त समजताच बोरीच्या सरपंच भावना नाईक, उपसरपंच सुनील सावकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. बोरी पुलाचा जोड रस्त्यावरील या अपघातप्रवण रस्त्यावर पाच संरक्षक बेटे असून या ठिकाणी अनेक अपघात झालेले आहेत. अपघातांचे हे सत्र सुरूच असून पंचायतीनेही यासंबंधीची सूचना संबंधित खात्याला केली होती, मात्र अजून कार्यवाही झालेली नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने या संरक्षक बेटाकडचा भाग पंधरा दिवसांच्या आत वाहतूकयोग्य करावा, अन्यथा बोरीवासीय आंदोलन छेडतील, असा इशारा उपसरपंच सुनील सावकर व इतरांनी दिला आहे.

संपादन : महेश तांडेल

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: GMC मध्ये फिजिओथेरपीच्या जागांमध्ये वाढ

Goa Recruitment: निवड आयोगाची 'भरती प्रक्रिया' कशी असणार? 2023 मध्येच नियमावली तयार; संगणक आधारित 11 परीक्षा यशस्वी

Santa Cruz: 'सांताक्रूझ' ग्रामसभा अर्ध्या तासात आटोपली! माफीनाम्यावरुन गोंधळ; घरपट्टीच्या प्रश्नाचे भिजत घोंगडे

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

SCROLL FOR NEXT