पणजी: निवडणुकीच्या तोंडावर भाजपचे एक महत्त्वाचे नेते व भंडारी समाजातील एक प्रमुख नाव असलेले दयानंद मांद्रेकर यांनी पक्षाची चौकट ओलांडण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे भंडारी समाजाची अस्वस्थता घालवण्याचे राजकीय आव्हान सत्ताधारी पक्षापुढे उभे ठाकले आहे. भंडारी समाजाच्या रुद्रेश्वर देवस्थानात अद्याप प्रशासक नेमलेला आहे.
प्रदेशाध्यक्ष दामू नाईक हे स्वतः भंडारी समाजाचे असून नजीकच्या काळात भंडारी समाजाचा असंतोष घालवण्याचे काम त्यांना स्वतःकडे घ्यावे लागणार आहे. दयानंद मांद्रेकर यांच्यासह मूळ भाजपमधील काही नेते व कार्यकर्ते, ज्या पद्धतीने पक्षात काँग्रेसमधून आयात केलेल्या नेत्यांना महत्त्वाची पदे व प्रतिष्ठा मिळते व मूळ नेत्यांना डावलले जाते, यामुळे अस्वस्थ आहेत. मांद्रेकर यांना २०२७ मध्ये उमेदवारी मिळणे कठीण वाटते व त्यांना ही निवडणूक लढविण्याची इच्छा आहे.
मांद्रेकर व पक्षाचे काही माजी आमदार इतर पक्षांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. मगोबरोबरची भाजपची युती तुटल्यास हे असंतुष्ट नेते त्या पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतील. मांद्रेकर यांना जर स्थानिक पक्षाची उमेदवारी मिळाली तर ते मतदारसंघात सत्ताधारी पक्षाचा डाव उलटवू शकतात, असे संकेत मिळतात.
मांद्रेकर यांच्यासह दिलीप परुळेकर, दयानंद सोपटे असे नेतेही पक्षात असंतुष्ट आहेत. सोपटे यांनी काल लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या कार्यक्रमात बोलताना काही रोखठोक मते व्यक्त केली. त्यात जीत आरोलकर यांना सर्वशक्तिनिशी विरोध करू असे वक्तव्य केले. भाजपमध्ये अशी निवेदने यापूर्वी केली जात नसत. जयेश साळगावकरही सध्या भाजपच्या परिघाबाहेर असून त्यांनाही निवडणूक लढवण्याची इच्छा आहे.
भाजपही सध्या काही भंडारी समाजाच्या नेत्यांच्या संपर्कात आहे. त्यात एक किरण कांदोळकर आहेत. कांदोळकर यांच्या संपर्कात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर हेसुद्धा आहेत. थिवी मतदारसंघात कांदोळकर यांनी चांगलीच हवा निर्माण केली आहे. भंडारी समाजाला सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न सध्या काँग्रेस नेत्यांनीही जोरात चालविला आहे. गिरीश चोडणकर यांनी २०२७च्या निवडणुकीत भंडारी समाजाला जास्तीत जास्त उमेदवाऱ्या देण्याचे निश्चित केले आहे.
भंडारी समाजाची अस्वस्थता घालवण्यास अपयश आल्यास भाजपला मगोपबरोबर युती करण्याचे प्रयत्न अधिक जोरकसपणे चालवावे लागतील व मगोपपुढे काहीसे नमते घ्यावे लागेल. तेच भाजपला करायचे नाही; दुसऱ्या बाजूला काँग्रेसचे प्रादेशिक पक्षांबरोबर सुरू असलेले युतीचे प्रयत्नही सत्ताधारी पक्ष सावधपणे पाहत आहे. दुसऱ्या बाजूला सर्व मतदारसंघात भाजपने सर्वेक्षण सुरू केले असून राज्याबाहेरचे भाजपचे कार्यकर्ते त्या कामात जुंपण्यात आले आहेत. राज्यात सध्या काय राजकीय परिस्थिती आहे, याचे अवलोकन भाजपने सुरू केले असून हा अहवाल हे कार्यकर्ते पक्षश्रेष्ठींना सादर करणार आहेत.
महामंडळ अध्यक्षपदाचा राजीनामा
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी शनिवारी गोवा राज्य अनुसूचित जाती (एससी), इतर मागासवर्गीय (ओबीसी) वित्त व विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. ३० ऑक्टोबर २०२५ रोजी सरकारने त्यांची या पदावर नियुक्ती केली होती. ३ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांनी पदाचा ताबा स्वीकारला होता. गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडणूक लढवलेल्या दिलायला लोबो यांनी शिवोली मतदारसंघात मांद्रेकर यांचा पराभव केला होता. यावेळीही विधानसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. दरम्यान, यासंदर्भात दयानंद मांद्रेकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण तो होऊ शकला नाही.
माजी मंत्री दयानंद मांद्रेकर यांनी एससी, ओबीसी वित्त आणि व्यवस्थापन महामंडळाचा राजीनामा देणार असल्याचे मला सांगितले होते, परंतु त्यामागचे कारण किंवा पुढील राजकीय वाटचालीबाबत त्यांनी मला काहीही सांगितले नाही.
- दामू नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष
साळगाव मतदारसंघातून मी निवडणूक लढवणार आहे. भाजपच्या नेत्यांना तशी कल्पनाही दिलेली आहे. पक्ष माझ्या नावाचा विचार जरूर करेल. आधीच नकारात्मक विचार का करू? योग्य वेळी योग्य निर्णय घेत पुढे जायचे हा राजकारणाचा मंत्र असतो. सध्या म्हापशातील कार्यक्रमात असल्याने सविस्तर काही सांगत नाही.
- दिलीप परुळेकर, माजी आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.