पणजी : म्हापसा–पणजी दरम्यानच्या गिरी येथील महामार्गावर वाहन चालविणे हे वाहनचालकांसाठी अक्षरशः जिवावरचे झाले आहे. महामार्गाच्या कडेला टोकदार लोखंडी सळ्या आणि सर्वत्र खड्डेमय रस्ता या दुहेरी संकटामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेषतः दुचाकीस्वारांना या मार्गावरून प्रवास करताना रोज कसरत करावी लागते. येथे वाहन चालविण्याची टेस्ट दिली तर कोणालाही सहज परवाना मिळेल, अशी तिखट प्रतिक्रिया उमटत आहे.
मागील आठवड्यात सुकुरजवळ एका अपघातात युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. रस्त्यावरील खड्ड्यात तोल जाऊन हा अपघात घडल्याचे स्थानिकांनी सांगितले. या घटनेनंतरही प्रशासनाने दुरुस्तीची कोणतीही पावले उचलली नाहीत.
अपघात होतो, लोक मरतात, पण प्रशासन डोळ्यावर झापडे घालून बसते, असा नागरिकांचा रोष आहे. गिरी येथील महामार्गावरील खड्ड्यांमुळे वाहनाचा तोल सांभाळणे कठीण जाते. काही महिन्यांपूर्वी ओ कोकेरो ते मॉल द गोवा या मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम केले गेले होते, मात्र ते फक्त वरवरचे ठरल्याचे दिसून आले आहे. आजही तेच खड्डे पुन्हा उघडे पडले असून, वाहनचालकांची जीवितहानी होण्याची शक्यता कायम आहे.
थेट अपघातालाच आमंत्रण
रस्त्यालगत उघड्या व टोकदार लोखंडी सळ्या दिसून येतात. एखादा चालक घसरला, तोल गेला किंवा अचानक अपघात झाला, तर या सळ्या थेट शरीरात घुसण्याची भीषण शक्यता नाकारता येत नाही. या लोखंडी सळ्यांमुळे आम्ही रोज भीतीने गाडी चालवतो. अपघात घडला तर मृत्यू निश्चित आहे, असे वाहनचालक सांगतात.
जनहिताचा प्रश्न
या रस्त्यावरून दररोज हजारो वाहने प्रवास करतात. शाळकरी मुले, कामगार, नोकरदार तसेच पर्यटक या सर्वांच्या सुरक्षिततेचा प्रश्न या खराब रस्त्यांमुळे निर्माण झाला आहे. अपघाताचे प्रमाण वाढत असल्याने तातडीने खड्डे बुजवणे, लोखंडी सळ्या काढून टाकणे व कायमस्वरूपी दुरुस्ती करणे आवश्यक आहे. अन्यथा आणखी जीवितहानी अटळ असल्याची भीती व्यक्त होत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.