दिल्लीतील वरिष्ठ कधी येतील आणि प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांच्याशी त्यांची कधी भेट होते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. सध्या मंडळ अध्यक्ष, जिल्हाध्यक्ष व प्रदेशाध्यक्ष हीच पदे संघटनात्मक पातळीवर भरली गेली आहेत. त्यामुळे प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदांवर कोणाला संधी मिळणार याची अनेकांना उत्सुकता आहे. प्रदेश कार्यकारिणी जाहीर होण्याआधी पक्षाचे वरिष्ठ नेते गोव्यात येतील, असे सांगण्यात येत होते. त्यांचा दौरा आता लांबल्यात जमा झाल्याने पदाधिकारी निवडीही लांबतील, अशी चर्चा सुरू झाली आहे. ∙∙∙
‘काळाप्रमाणे माथ्याक कुरपणे’ अशी कोकणीत एक म्हण आहे. भाजपा हा शिस्तबद्ध पक्ष, असे या पक्ष कार्यकर्ते गर्वाने कालपर्यंत सांगत होते.मात्र, आता वाजपेयी, अडवाणींचा भाजप राहिला नाही. धाकणकरसारखे निष्ठावान राहिले नाहीत, असे आता काही निष्ठावानच म्हणू लागलेत.पक्ष शिस्तबद्ध असता तर कळंगुट भाजप महिला अध्यक्ष व कळंगुटच्या उपसरपंच गीता परबविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे धाडस सिक्वेरा व लोबो यांना झाले असते का? म्हापसा व डिचोलीतही तेच घडले. सांकवाळ पंचायतीत जुन्या व नव भाजप कार्यकर्त्यांत जोरदार लढाई झाली. आता कुंकळ्ळी पालिका पोटनिवडणुकीत भाजप समर्थक उमेदवारास पाडण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते तयारी करताहेत म्हणे, हीच स्थिती काणकोण व केपेत आहे.कार्यकर्ते आता म्हणताहेत, आम्हीही प्रदूषित झालोय! ∙∙∙
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची एका खासगी राष्ट्रीय वृत्तवाहिनीने गुरुवारी मुलाखत घेतली. त्या मुलाखतीत त्यांनी आपण दिल्लीला जाणार नसल्याचे सांगितले. मुख्यमंत्री सावंत यांनी केलेल्या वक्तव्यानंतर ते ज्यांना आपला आदर्श मानतात त्या मनोहर पर्रीकर यांची आठवण झटकन झाली. मे २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांच्या कॅम्पचा एक भाग राहिलेल्या मनोहर पर्रीकर यांनीही अशीच शक्यता नाकारली होती. पत्रकारांनी पर्रीकर यांना भाजप लोकसभा निवडणुकीत जिंकल्यास केंद्रीय मंत्रिपदाची शक्यता आहे काय, असे विचारले असता त्यांनी ती शक्यता नाकारली होती. परंतु त्यानंतर त्यांना केंद्रात संरक्षणमंत्री म्हणून काम करावे लागले, हा इतिहास बोलका आहे. त्यामुळे दिल्लीला जाणार नसल्याचे मुख्यमंत्री सावंत यांनी सांगितले तरी केंद्रातील वरिष्ठांनी सांगितल्यावर त्यांना जावेच लागेल. यापूर्वीचा त्यांच्या राजकीय गुरुच्या अनुभवाकडे पाहिल्यास त्यांना ते नक्कीच उमगलेही असू शकते. ∙∙∙
नोव्हेंबर २०२४ मध्ये आलेल्या ‘साबरमती एक्स्प्रेस’ हा चित्रपट आपल्या मतदारसंघातील लोकांना दाखवण्याचा सपाटा आमदार व मंत्र्यांनी लावला होता. काहींनी मल्टिप्लेक्समध्ये मतदारसंघातील मतदारांना आणून चित्रपट दाखवला. छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा‘ हा चित्रपट गोवा सरकारने करमुक्त केला. आमदार जीत आरोलकरांनी मतदारसंघातील मतदारांना ‘छावा’ चित्रपट दाखविला. त्याशिवाय भाजपच्यावतीने शुक्रवारच्या रात्रीच्या ८.५० च्या खेळाची तिकिटे प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींसाठी उपलब्ध करून ठेवली होती. गाजत असलेल्या चित्रपटांची तिकिटे असल्याने काहीजणांनी कुटुंब, मित्रपरिवारासाठी तिकिटे नेल्याची माहिती समोर आली आहे. अर्ध्या तासात तिकिटांचा सुपडासाफ झाला. महत्त्वाची बाब म्हणजे ती तिकिटे ज्यांना मिळाली नाहीत, त्यांनी भाजपच्या कार्यालयात विचारणाही केली, परंतु त्यांना अर्ध्या तासात ती संपल्याची माहिती मिळाली. त्यामुळे प्रसारमाध्यमांतील प्रतिनिधींची संख्या पाहिली तर तिकिटे शिल्लक राहायला हवी होती, अशी चर्चा सुरू झाली. ∙∙∙
दरवर्षी पणजीतील कार्निव्हल मिरवणुकीच्या काळात गार्सिया गार्डनजवळ सांबा स्क्वेअरची निर्मिती होती. या ठिकाणी तीन दिवसांचा महोत्सव आयोजित केला जातो. खा-प्या, मजा करा या संदेशाचे तंतोतंत पालन या ठिकाणी केले जाते. या ठिकाणी मद्य तसेच विविध खाद्यपदार्थांची रेलचेल असते. त्यामुळे महापालिकेची कार्निव्हल समिती मिरवणूक झाल्यानंतर या स्क्वेरमधील कार्यक्रमात अधिक पूर्णपणे न्हाऊन जाते. या तीन दिवसांच्या काळात लाखोंची उलाढाल होते. विशेष म्हणजे या ठिकाणी जाण्यासाठी महापालिका प्रत्येक दिवशी तिकिटाचा वेगवेगळा दर आकारते. त्यातून महापालिकेला लाखोंचा महसूल मिळतो. परंतु या कार्यक्रमासाठी ना कोणती निविदा काढली जाते ना, या कार्यक्रमाचा हिशोब ठेवला जात असेल तर त्या समितीलाच माहीत. त्यामुळे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यामध्ये असलेल्या नगरसेवकांची चंगळ होत असल्याने अलीकडे या समितीतून कोणीही बाहेर पडू इच्छित नाही. ∙∙∙
म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाताला गुरुवारी हळदोणेचे आमदार अॅड. कार्लुस फेरेरा यांनी भेट दिली. इस्पितळातील काही त्रुटी व कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबाबत त्यांनी लक्ष वेधले होते. हा विषय आपण सरकार दरबारी मांडणार, असेही ते म्हणाले होते. विशेष म्हणजे, हाच विषय व मुद्दे घेऊन काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके हे आपल्या काही कार्यकर्ते व स्थानिक रहिवाशांना घेऊन वैद्यकीय अधीक्षकांना भेटले. मुळात एकच विषय व तोच मुद्दा असताना, भिकेसाहेब आमदारांसोबत का गेले नाहीत? हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. कारण एकाच दिवशी व एकच विषय सोबत घेऊन मांडला असता तर त्याचा ‘इम्पॅक्ट’ जास्त पडतो. आणि कदाचित अशाप्रकारामुळेच काँग्रेसच्या गाडीचे एक चाक एकीकडे व दुसरे इतरत्र धावते, असे बोलले जाते... ∙∙∙
प्रयागराज येथे सरकारी फुकट रेल्वेने गेलेल्या कुडचड्यातील एका भाविकाला हृदयविकाराच्या धक्क्याने मरण आल्यानंतर आता सारेच धास्तावले आहेत. आमदार आणि भाजपच्या पातळीवर ६० वर्षांवरील कोणीही या रेल्वेतून जाणार नाही, याची काळजी घेण्यात येत होती. जीव महत्त्वाचा की श्रद्धा यात श्रद्धेचा विजय झाला. अनेकांनी वय जास्ती असूनही शुक्रवारी गोव्यातून प्रयागराजला रवाना झालेल्या रेल्वेत प्रवेश मिळवणे पसंत केले. ते सारे प्रयागराजला गेल्याने तेथे काही अनुचित प्रकार घडू शकेल, असे वाटते त्यांनी तेथे जाऊ नये यासाठी प्रयत्न करणाऱ्यांच्या हाती सूचित करणे एवढेच राहिले आहे. ∙∙∙
सध्या काँग्रेसला काय झाले आहे हेच कळत नाही. महाराष्ट्र, दिल्ली सारख्या राज्यात नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत धुव्वा उडाला असूनही काँग्रेस काही लाईनवर येताना दिसत नाही. आता गोव्यात म्हणे काँग्रेस आगामी निवडणुकीत स्वबळावर लढणार. आहे की नाही, ‘कशात नाही काय आणि फाटक्यात पाय’चा प्रकार.... कोणत्याही मतदारसंघात बांधणी नाही, निवडणुकीची तयारी नाही आणि चालले स्वबळावर निवडणूक लढायला. तिथे भाजपचे पहा. सत्तेवर असूनही त्यांनी आगामी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. स्वतः मुख्यमंत्री आपल्या मतदारसंघात तयारीला लागल्याचे दिसत आहे. आणि इथे काँग्रेस ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’ रंगवण्यात मग्न आहे. यालाच ‘विनाशे काले विपरीत बुद्धी’ असं म्हणतात. हे आम्ही नाही हो,काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्तेच आता बोलू लागलेत. आता बोला.. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.