मडगाव : गोव्यात बेकारी नाही, पण युवकांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे नोकऱ्या मिळत नाहीत. गोव्यात आयटी क्षेत्रामध्ये काम करण्यास उत्सुक युवक आहेत. पण आयटी उद्योग येथे सुरू होत नाहीत. तेव्हा गोमंतकीय युवकांनी नोकऱ्यांमागे न जाता रोजगार देणारे उद्योग व्यवसाय सुरू करावेत, असा सल्ला दैनिक ‘गोमन्तक’चे संपादक संचालक राजू नायक यांनी युवकांना दिला.
हाऊसिंग बोर्ड, घोगळ, मडगाव येथील श्री सिद्धिविनायक सार्वजनिक ट्रस्टने सीआयआय व एमसीसी यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या जॉब फेअरचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ट्रस्टचे अध्यक्ष रमेश देसाई, सचिव अभिजीत सावंत, माजी अध्यक्ष पांडुरंग नाईक व ट्रस्टचे इतर पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.
नायक पुढे म्हणाले, उद्योग सुरू करणाऱ्याला पहिल्या तीन वर्षांत थोडासा त्रास सोसावा लागतो, पण त्यांनी जिद्द व प्रयत्न सोडू नयेत. गोवा मुक्त झाला, तेव्हा लोकसंख्या 7 लाख होती. आता ती 18 लाख आहे, तर दहा वर्षांनी 20 ते 22 लाख होईल. मात्र यात मूळ गोमंतकीयांची संख्या कमी असेल. त्यामुळे गोमंतकीय युवकांनी स्वतः उद्योगधंदा सुरू करावा.
मंदिराच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू केला आहे, यातून मंदिराची समाजाप्रती बांधिलकी आहे, याची जाणीव होते. हा उपक्रम युवकांनी युवकांसाठी आयोजित केला आहे. हे पाहून आनंद होत आहे. मंदिरामार्फत सामाजिक कार्य करणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे मंदिराच्या संकल्पनेला वेगळा अर्थ येतो. मंदिरे ही केवळ देवाच्या मूर्तीची पूजा करण्यापुरती मर्यादित नसावीत. गोव्यातील काही मंदिरांच्या तिजोरीत शेकडो कोटी रुपये आहेत. मात्र त्यांच्यामध्ये सुवर्ण कळस बांधण्यावरून स्पर्धा आहे. ही स्पर्धा समाजोपयोगी उपक्रम सुरू करण्यासाठी असावी, असेही राजू नायक यांनी सांगितले.
या उपक्रमाचे प्रमुख अभिजित सावंत म्हणाले, या जॉब फेअरध्ये 13 कंपन्यांतर्फे कमीत कमी 85 नोकऱ्या देण्यात येणार आहेत. ऑनलाईन पद्धतीने 150 उमेदवारांनी नोंदणी केली. 250 पेक्षा जास्त युवक-युवतींची अपेक्षा होती, ती पण पूर्ण झाली आहे. यातील जास्तीत जास्त युवकांची नोकरीसाठी निवड झाली, तर ट्रस्टची मोहीम यशस्वी झाली, असेच म्हणता येईल, असे सावंत यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.