Goa ZP Election Dainik Gomantak
गोवा

Curti ZP Election: कुर्टीत तिरंगी लढत अटळ! ‘भाजप’पुढे ‘मगो’चे आव्हान, काँग्रेसचीही तयारी; आप, आरजीपीची भूमिका अस्पष्ट

Goa ZP Election: फोंडा मतदारसंघात येणाऱ्या कुर्टी ‘झेडपी’त भाजपला काँग्रेसबरोबर ‘मगो’शी सामना करावा लागत असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

गोमन्तक डिजिटल टीम

फोंडा: फोंडा मतदारसंघात येणाऱ्या कुर्टी ‘झेडपी’त भाजपला काँग्रेसबरोबर ‘मगो’शी सामना करावा लागत असल्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत अटळ असल्याचे संकेत मिळत आहेत.

गेल्यावेळी या मतदारसंघातून ‘मगो’च्या प्रिया च्यारी या भाजपच्या संजना नाईक यांच्यावर सहाशेहून अधिक मतांची आघाडी घेऊन विजयी झाल्या होत्या. पण यावेळी हा मतदारसंघ अनुसूचित जातीकरता आरक्षित झाल्यामुळे त्यांचा पत्ता कट झाला आहे. मात्र, या निवडणुकीत भाजप-मगो युती असल्याचे हाकाटे पिटले जात असले तरी येथे युतीचे ‘नामोनिशान’ दिसत नाही. येथे ‘मगो’ कार्यकर्त्यांनी वेगळी चूल थाटल्याचे स्पष्टपणे प्रतीत होत आहे.

‘मगो’ने जरी अधिकृतरित्या आपला उमेदवार रिंगणात उतरविला नसला तरी फोंडा मतदारसंघाचे नेते डॉ. केतन भाटीकर यांनी खांडेपार पंचायतीचे पंच भिका केरकर यांना उमेदवारी देऊन बंडाचे निशाण फडकविले आहे.

आणि फोंड्यातील बहुतेक ‘मगो’ कार्यकर्त्यांबरोबर या मतदारसंघाच्या विद्यमान झेडपी प्रिया च्यारीही प्रचाराकरता भाटीकर-केरकरांबरोबर फिरताना दिसत असल्यामुळे युतीला सुरुंग लागल्यातच जमा आहे.

दुसऱ्या बाजूला ‘मगो’ने रचलेला सापळा लक्षात घेऊन ‘भाजप’नेही ‘धडाकेबाज’ प्रचार सुरू केला असून उमेदवार प्रितेश गावकरांबरोबर दक्षिण गोवा भाजपचे सचिव तथा फोंड्याचे नगरसेवक विश्वनाथ दळवी, रवी नाईकांचे पुत्र रितेश व रॉय, फोंड्याचे नगराध्यक्ष वीरेंद्र ढवळीकर इतर नगरसेवक, कुर्टी-खांडेपार पंचायतीचे पंच हे मतदारसंघातील कानाकोपरा पिंजून काढताना दिसत आहेत.

कुर्टी ‘झेडपी’त खांडेपार पंचायतीबरोबर प्रियोळ मतदारसंघातील वेरे-वाघुर्मे पंचायतीचाही समावेश असल्यामुळे या मतदारसंघाचे आमदार गोविंद गावडे यांनीही प्रचारात लक्ष घातल्याचे बघायला मिळत आहे.

काँग्रेसनेही रामदास तिमयेकर यांना उमेदवारी जाहीर केली असून प्रचाराचा नारळही फोडला आहे. सध्या तिमयेकरांबरोबर फोंड्याचे काँग्रेस नेते राजेश वेरेकर, खांडेपार पंचायतीचे माजी सरपंच जॉन परेरा आणि अन्य काँग्रेस कार्यकर्ते फिरताना दिसत आहेत.

आम आदमी पक्ष आणि ‘आरजी’ यांची भूमिका अजूनही स्पष्ट झाली नसल्यामुळे सध्या तरी या मतदारसंघात अटीतटीच्या तिरंगी लढतीचे संकेत मिळत आहेत. आता या लढतीतून कोणाची नाव किनाऱ्याला लागते याचे उत्तर २२ डिसेंबरला मिळणार आहे, एवढे निश्चित.

दळवी-भाटीकर संघर्ष

‘मगो’ची भाजपशी युती असूनही फोंड्याचे मगो नेते डॉ. केतन भाटीकर यांनी आपला उमेदवार रिंगणात उतरविल्यामुळे त्यांना ‘मगो’ पक्षातून त्वरित निलंबित करावे, अशी मागणी दक्षिण गोवा भाजपचे सचिव विश्वनाथ दळवी यांनी केली आहे. त्याला भाटीकरांनी उत्तर दिल्यामुळे हा संघर्ष पुढे वाढत जाणार, असे दिसते आहे. या संघर्षाला आणखी काही दिवसांत होणाऱ्या फोंडा पोटनिवडणुकीची किनार आहे, हेही तेवढेच खरे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ind Vs SA: भारत आफ्रिका सामन्यापूर्वी मोठी बातमी! 2 खेळाडू दुखापतग्रस्त; 'वॉशिंग्टन'लाही डच्चू? पंत, तिलकवरती नजर

Supermoon: वर्षाच्या शेवटच्या 'सुपरमून'च्या दर्शनासाठी गर्दी, अवकाशाबद्दल कुतूहल वाढते आहे..

Dhurandhar Review: क्षणोक्षणी थरार, अभिनयात जोश, क्रूरतेत धार; रणवीर सिंग-अक्षय खन्नासमोर आदित्य धर का ठरतोय 'धुरंधर?'

Vasco police: सजग पोलिसांमुळे गोवा सुरक्षित! कृष्णा साळकरांची स्तुतीसुमने; वास्को स्थानकात कामगिरीचे कौतुक

Sattari: सत्तरीला मॉडर्न बनवायचे असेल तर भाजपशिवाय पर्याय नाही! विश्वजीत राणे यांचे प्रतिपादन; नगरगावात प्रचाराला प्रारंभ

SCROLL FOR NEXT