फोंडा: ऐन दसऱ्याचा उत्सव त्यात सगळीकडे उत्साहाचे वातावरण, अशावेळेला अचानक सकाळी वीजपुरवठा खंडित झाला, पण वीज खात्याच्या तत्परतेमुळे हा वीजपुरवठा एका तासात सुरळीत करण्यात आला. त्यामुळे ग्राहकांनी समाधान व्यक्त केले. कुर्टीतील वीज खात्याच्या उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरमध्ये अचानक स्फोट झाल्याने हा वीजपुरवठा खंडित झाला होता.
गुरुवारी दसऱ्याच्या दिवशी ही घटना घडली. सगळीकडे विजेची आवश्यकता लागते, त्यामुळे अचानक विजेचा दाब वाढल्याने ट्रान्स्फॉर्मरमध्ये स्फोट झाला. या स्फोटात ट्रान्स्फॉर्मरला आग लागल्यामुळे प्रसंगावधान राखून खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आग्निरोधक उपकरणांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणली आणि पूर्णपणे विझवली.
ट्रान्स्फॉर्मरमध्ये स्फोट झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित वीज यंत्रणेत बिघाड झाला. कुंडई, मडकई, बेतोडा औद्योगिक वसाहती तसेच फोंडा आणि धारबांदोड्यातील काही भागांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यानंतर खात्याच्या अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती केली. त्यामुळे बरोबर एका तासाने वीजपुरवठा सुरळीत झाला.
दरम्यान, वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी वीज खात्याचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवून गंभीर प्रसंग टाळल्याबद्दल तसेच एका तासात वीजपुरवठा सुरळीत करून वीज ग्राहकांना दिलासा दिल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.