केपे: कुडचडे मतदारसंघात विकासकामे सुरू असल्याने रस्त्यांची स्थिती बिकट झाली असून ही कामे पूर्ण झाल्यानंतर पूर्ववत या रस्त्यांचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असून सध्या १८ सप्टेंबरपासून रस्त्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात येणार असल्याचे कुडचडे भाजप मंडळाचे अध्यक्ष विश्वास सावंत देसाई यांनी कुडचडे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी जिल्हा पंचायत सदस्य सिद्धार्थ देसाई, नगराध्यक्ष प्रसन्ना भेंडे, सरपंच कविता गावस देसाई व राजेंद्र वस्त उपस्थित होते. काल १५ रोजी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अमित पाटकर यांनी कुडचडे येथे त्यांच्या कार्यालयासमोरील रस्त्यावर पडलेल्या खड्यात माती घालून शेण सारवून त्याची गँरंटी दिली होती, पण रात्री पाऊस पडून सदर माती खड्ड्यात अस्ताव्यस्त झाल्याने कित्येक वाहनचालक त्याठिकाणी पडता पडता वाचले आहेत, असे सावंत देसाई यांनी सांगितले.
कुडचडे मतदारसंघातील लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी आमदार प्रयत्नशील असून आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू होणार असल्याने परत एकदा रस्ते खोदले जाणार असल्याने लोकांनी थोडा त्रास सोसावा, असे सावंत देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी चतुर्थीपूर्वी खड्डे बुजविणार असे सांगितले होते, पण जोरदार पाऊस पडत असल्याने हे काम होऊ शकले नाही. कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी कुडचडे मतदारसंघात विकासकामांना गती दिली असून मलनिस्सारण वाहिनी व भूमिगत वीजवाहिन्या घालण्याचे काम सुरू आहे. पाटकर यांनी काब्राल यांच्यावर जो भ्रष्टाचाराचा आरोप केला आहे तो त्यांनी सिद्ध करून दाखवावा, असे आव्हान सावंत देसाई यांनी दिले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.