भजन कलाकारांचा पोशाख व पेहराव 
गोवा

गोव्याची सांस्कृतिक परंपरा: भजन कलाकारांचा पोशाख व पेहराव

सुदेश आर्लेकर

गोमंतकीय मराठी भजन परंपरेची सेवा करणाऱ्या भजन पथकातील कलाकारांचा पोशाख नेहमीच वारकरी परंपरेला अनुसरून असावा. एकाच पद्धतीचा पारंपरिक पोशाख परिधान करणे अर्थात गणवेश परिधान करणे म्हणजे परंपरा जपणे, असा गोड गैरसमज मनात बाळगू नये.

बंडीवर अथवा कुर्त्यावर जॅकेट अथवा कोट परिधान करणे हे आपल्या वारकरी परंपरेत बसत नाही. संत तुकाराम महाराज ज्या पद्धतीचा पोशाख वापरत होते, याची कल्पना आम्हाला पुस्तकांतील छायाचित्रांमुळे येते. शक्यतो त्या छायाचित्रांनुसार भजन कलाकारांचा पोषाख असावा. संत तुकारामांच्या डोक्यावर मुंडासे असायचे, एवढाच काय तो फरक, पण त्याऐवजी आपण वारकरी संप्रदायातील साधीसुधी सफेद/पांढरी टोपी वापरायला हरकत नाही.

भजन कलाकारांनी वारकरी परंपरेनुसार अंगावर थोडासा आखूड आकाराचा कुर्ता व पायजमा घालावा. मुस्लिमबांधव जसे मोठ्या आकाराचा कुर्ता वापरतात तशा प्रकारचा कुर्ता भजन कलाकारांनी परिधान करू नये. थोडक्यात, मुस्लीम संस्कृतीतील पोशाख कोणता आणि वारकरी संप्रदायाचा/ पंथाचा पोशाख कोणता, याचे भान भजन कलाकारांनी ठेवावे.

वारकरी संप्रदायात काही जण धोतराचाही वापर करतात; तथापि, त्याऐवजी भजन कलाकारांनी शक्यतो पायजमा/लेंगा वापरावा. भजन कलाकार डोक्यावर परिधान करीत असलेली टोपी (गांधी टोपीप्रमाणे दिसणारी) वारकरी संप्रदायातील असावी. अन्य प्रकारची भारतीय संस्कृतीतील टोपी परिधान करणे टाळावे. वारकरी संप्रदायातील पोशाखाचा रंग सफेद/पांढरा असल्याने त्याच रंगाची वस्त्रे परिधान करावी. अन्य रंगांतील पोशाख परिधान करू नये. भगव्या रंगातील पोशाख परिधान करणे ही वारकरी संप्रदायाची परंपरा नव्हे, याची जाणीव ठेवावी.

पुरुषवर्गातील भजन कलाकारांचे सर्व कपडे एकाच शैलीतील असणे बंधनकारक नाही. त्यात किंचित फरक/वैविध्य असण्यास काहीच हरकत नाही. ते कपडे परंपरेला अनुसरून असावेत, एवढेच फक्त बंधन आहे. गणवेश परिधान करणे हे बंधन नाही. काही वेळा पुरुष कलाकार शर्ट-पॅण्ट परिधान करून भजनात सहभागी होत असतात. दैनंदिन कार्यक्रमांबाबत त्यांना तसे करण्यास मुभा अथवा मोकळीक देण्यास हरकत नाही. शर्ट-पॅण्ट हा वास्तविक पाश्चात्त्य पोशाख असून, भारतीय वारकरी संप्रदायाच्या पोशाखाशी त्याचे थोडेफार साम्य असले तरी त्या पोशाखाची एकंदर रचना भारतीय पोशाखापेक्षा फार मोठे भिन्नत्व दर्शवणारी नाही. गावातील नेहमीच्या भजन कार्यक्रमांत पोषाखाबाबत थोडीशी मुभा असायला हरकत नाही; परंतु, जाहीर कार्यक्रमात पोशाख कोणता वापरावा याचे भान अवश्य ठेवावे.

महिला कलाकारांनी पारंपरिक पोषाख म्हणून सात-वारी अथवा नऊ-वारी लुगडे नेसणे उचित ठरेल. त्यामुळे, त्यांनी साड्या अथवा सलवार/चुडिदार व ओढणी अर्थांत पंजाबी शैलीचा वेश परिधान करणे हे वास्तविक वारकरी परंपरेत बसत नाही; पण, पोशाख उपलब्ध होण्याबाबत अगदीच नाइलाज असला तरच लुगड्यांऐवजी तसा पोशाख करायला हरकत नाही. एखाद्या पथकातील विविध महिलांनी विविध रंगांची वस्त्रे नेसणे हे कदाचित परंपरेला अनुसरूनच असू शकते. त्या लुगड्यांचा रंग वेगळा असला तरी त्यातून पारंपरिक वेशभूषा दिसली पाहिजे, एवढेच बंधन आहे. अर्थांत, महिलांचाही पोशाख शक्यतो गणवेशासारखा एकसारखा असू नये.

महिला भजन कलाकारांनी डोक्यावर टोप्या परिधान करण्याबाबत विविध परस्परविरोधी मतप्रवाह आहेत. वास्तविक, वारकरी संप्रदायातील महिला टोप्या वापरत नाहीत व त्यामुळे महिला भजन कलाकारांनी टोप्या वापरू नयेत, असा एक मतप्रवाह आहे. अन्य एका मतप्रवाहानुसार, वारकरी महिला पूर्वी भजन करीत नव्हत्या. त्या केवळ भजन दिंडीत सामील व्हायच्या. आता महिलावर्ग भजन करीत  

आहेत. त्यामुळे, महिलांनी वारकरी परंपरेतील टोप्या पुरुषांप्रमाणे परिधान करायला कुणाचीही हरकत असू नये. यासंदर्भातील दोन्ही मतप्रवाह आपापल्या परीने योग्यच असल्याने त्याबाबत कलाकारांनी स्वेच्छेने निर्णय घेता येईल.

महिला कलाकारांचा पोशाख व साजशृंगार नेहमीच शिष्टसंमत अशा एखाद्या कुलीन/घरंदाज स्त्रीप्रमाणे असावा. एखाद्या ‘अशिष्ट’ स्त्रीप्रमाणे तिचा पेहराव असूच नये. जणू काही पुराणकालीन वनमालाच समोर आहे असे पाहताक्षणी कुणालाही वाटेल, असा पोशाख अथवा त्या पद्धतीने केशरचना करणे व त्याच प्रकारे केसांत फुले माळणे वगैरे महिला भजन कलाकारांनी प्रकर्षाने टाळावे. नाचगाण्याचे कार्यक्रम सादर करणाऱ्या स्त्रीप्रमाणे महिला भजन कलाकाराचा पेहराव मुळीच असता कामा नये.

वयाने लहान असलेल्या सुमारे पंधरा-सोळा वयापर्यंतच्या बालकलाकार मुलींनीदेखील शक्यतो लुगड्यांचाच वापर करावा. परंतु, सोयीच्या दृष्टिकोनातून लुगड्यांऐवजी वारकरी संप्रदायाशी थोडेफार नाते सांगणारा ‘पंजाबी’ पद्धतीचा अथवा अन्य भारतीय पद्धतीचा पोशाख केवळ तडजोड म्हणून वापरायला हरकत नाही. अखेर पंजाबी पोशाखसुद्धा भारतीयच आहे; तो पाश्चात्त्य शैलीचा मुळीच नाही. तो पोशाख वारकरी पद्धतीचा नसला तरी निदान तो पोषाख भारतीय संस्कृतीचा वाहक आहे, याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा. कारण, सर्वच बाबतींत अगदीच टोकाची भूमिका घेतली तर कदाचित ते संस्कृतिरक्षणाच्या दृष्टीने हानिकारकही ठरू शकते, याचे भान ठेवायलाच हवे. पोशाखाबाबत काही पारंपरिक दंडक असले तरी त्याबाबत थोडीफार लवचिकता ठेवणे हितकारक आहे. अन्यथा, अगदीच काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची सक्ती केल्यास काही लोक या भजनकलेपासून दूर जाण्याचीच अधिक शक्यता आहे. असे असले तरी भारतीय तसेच हिंदू संस्कृतीच्या विरोधात असलेला पाश्चात्त्य धाटणीचा पोशाख वारकरी पद्धतीत वापरणे पूर्णत: निषिद्ध समजावे. आज काही महिला भजन कलाकार दैनंदिन जीवनात अथवा नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणी एक गरज म्हणून शर्ट/टी-शर्ट आणि पॅण्ट/जीन पॅण्ट परिधान करीत असतात. असे असले तरी भजन सादर करताना त्यांनी आवर्जून वारकरी पद्धतीनुसारच पोशाख करणे गरजेचे आहे.

स्त्रियांच्या कपाळावर कुंकू असावा. कुंकू हे विवाहित असल्याचे/ सौभाग्याचे प्रतीक/खूण आहे. टिकली वेगळी व कुंकू वेगळा. स्त्रीचा भांग भरला जातो तो कुंकूने; टिकलीने नव्हे. टिकली हा साजशृंगाराचा एक भाग, तर कुंकू सौभाग्याचे प्रतीक. स्त्रीचे कपाळ कदापि रिकामी असू नये. ते दारिद्र्याचे अथवा वैधव्याचे लक्षण असल्याचे मानले जाते. आता विधवा स्त्रीसुद्धा टिकली वापरतात व सामाजिक स्थित्यंतराच्या अनुषंगाने त्याबाबत कुणी विरोधही करू नये; पण, असे असले तरी टिकली अथवा कुंकू लावण्याबाबत कुणावरही सक्तीही करता येत नाही. कारण, दैनंदिन जीवनात आता विधवा महिलाही सररासपणे स्वत:च्या कपाळाला टिकली अथवा कुंकू लावत असतात.

भजन पथकातील विवाहित स्त्रियांनी अर्थांत सौभाग्यवतींनी स्वत:च्या गळ्यांत मंगळसूत्र वापरावे. ते मंगळसूत्रसुद्धा पुरेशा आकाराचे असावे. ते नावापुरते एखादे छोटेसे असू नये. कुणाला ते दिसूच नये अशा पद्धतीने ते परिधान करून नये. अविवाहित महिलांच्या गळ्यात तसेच अविवाहित तरुणींच्या/मुलींच्या गळ्यांत एखादी माळ/ सुवर्णालंकार असावा. कारण, दरिद्री असल्याचे वाटू नये. आर्थिकदृष्ट्या आपण गरीब असलो तरी आपली सांस्कृतिक वैभवसंपन्नता त्याद्वारे दिसली पाहिजे. त्यामुळे निदान साधी माळ तरी गळ्यात घालणे गरजेचे आहे. किमती सुवर्णालंकार पाहिजेच असे नाही. आपण भरपूर दागिन्यांनी नटलो तर ते विद्रूपही वाटू शकते, याचेही सजग भान ठेवावे. तसेच नाकात, कानांत पुरेशी आभूषणे असावीत. त्यासाठी सुवर्णालंकारच हवेत असे मात्र बंधन नाही.

डोळ्यांवर गॉगल परिधान करून भजन सादर करणे कितपत योग्य आहे, याचा संबंधितांनी स्वत:हून विचार करावा. अशी कृती कुणी केली तर सहकारी कलाकारांनी त्याची त्याबाबत कानउघाडणी करणे गरजेचे आहे. असे असले तरी चष्मा, घड्याळ इत्यादींचा वापर करायला हरकत नाही. परंतु, सध्या पोशाखाबाबत भजनाच्या क्षेत्रात कित्येक अपप्रवृत्ती शिरत आहेत, हे आपणांस प्रकर्षाने जाणवते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: सरकारी नोकरी घोटाळ्यात भाजपचे नेते गुंतलेत; अमित पालेकरांचा हल्लाबोल!

Goa Post Office: गोव्यात पोस्टाची सेवा ठप्प! देशभरातील इंटरनेट सेवेत बिघाड; बॅंकिंग सेवेला मोठा फटका

Bhutani Project: ‘त्‍या’ तिघांना अटक करा! सांकवाळच्या तीस महिलांसोबत कुतिन्हो यांची मागणी

Goa News: गोव्यात भूरूपांतरासाठी अनेक प्रस्ताव! 1 लाख 18 हजार 756 चौरस मीटर जमीनीवर लक्ष; 'नगर नियोजन'ने मागवले आक्षेप

Sattari Crime: वाळपईतील व्यावसायिकाला 'स्टॉक एक्स्चेंज'च्या व्याजाचे आमिष दाखवून एक कोटींचा गंडा! बंगळूरू येथील संशयितास अटक

SCROLL FOR NEXT