कळंगुट: बार्देशातील किनारी भागात पर्यावरणाची हानी तसेच कायदा धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात अवैध बांधकामे उभी रहात आहेत. कांदोळीतील एका रिसॉर्टला सीआरझेड क्षेत्रात बेकायदा बांधकाम करून पर्यावरणाची हानी केल्याचा ठपका ठेवून किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकारणाने दोन कोटींचा दंड ठोठावल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने श्रेम रिसॉर्टस् प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनाला याबाबतीत बजावलेल्या नोटिशीत येत्या 27 मेपूर्वी दंडाची दोन कोटी चार लाख रुपयांची रक्कम कार्यालयात भरणा करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, श्रेम रिसॉर्टस् हॉटेल व्यवस्थापनाने किनारी क्षेत्र नियमांचे खुलेआम उल्लंघन करून टॉय- बीच क्लब या नावाने अवैध बांधकाम केले आहे. याबाबत सदरचे बांधकाम पाडण्याच्या आदेशाची नोटीस हाती पडताच उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांना सदर बांधकाम पाडण्यासाठी येणाऱ्या खर्चाचा अहवाल सादर करण्याचे संबंधित प्राधिकरणाने कळवले आहे.
दरम्यान, श्रेम रिसॉर्टस् विरोधात सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून मुरूडवाडा-कांदोळी येथील सर्वे क्र: 146/6 या जागेत पर्यावरणाचा नाश करीत बेकायदा बांधकाम उभारण्यात येत असल्याची रितसर तक्रार सामाजिक कार्यकर्ते रोशन माथाईश तसेच गोवा फाऊंडेशन या संस्थेकडून दाखल करण्यात आली होती. त्यानुसार प्राधिकरणाकडून या प्रकरणी सखोल चौकशी केल्यानंतर श्रेम रिसॉर्टस् या आस्थापनाकडून मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचा नाश, तसेच स्थानिक जैव संवर्धनास धोका पोहोचविण्यात आल्याचे दिसून आले. तथापी, व्यावसायिक टॉय -बीच चे बेकायदा बांधकाम करताना तेथील नैसर्गिक जलस्त्रोतांचा मार्गही बदलण्यात आल्याचे प्राधिकरणाच्या निदर्शनात आले आहे.
‘त्या’धेंडांचे धाबे दणाणले
सीआरझेड प्राधिकरणाने बेकायदा बांधकाम तसेच केलेल्या पर्यावरण हानीची दखल घेत श्रेम रिसॉर्टस् ला ठोठावण्यात आलेल्या दंडाच्या पार्श्वभूमीवर किनारी भागात अवैध बांधकामे करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अनेकांनी स्वतःच अवैध कामे आवरती घेतल्याची माहिती आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.