Bodgeshwar Jatra 2024: सर्व जाती-धर्मांतील भाविकांचे श्रद्धास्थान तसेच गोमंतकीयांचा राखणदार श्री देव बोडगेश्वराच्या 89 व्या महान जत्रोत्सवास बुधवारपासून (ता.२४) सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी देवदर्शनासाठी भाविकांचा महासागर लोटला होता. हा जत्रोत्सव 4 फेब्रुवारीपर्यंत विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनिशी चालणार आहे.
जत्रोत्सवाच्या पूजेचे यजमानपद देवस्थान समितीचे मुखत्यार राजेंद्र पेडणेकर यांनी सपत्नीक भूषविले. दुपारी १२ वाजता श्रीचरणी श्रीफळ ठेवून पुरोहितांनी गाऱ्हाणे घातल्यानंतर या जत्रोत्सवाला सुरवात झाली.
यावेळी म्हापसा परिसरातील विविध देवस्थाने, संस्था, पोलिस, अग्निशमन दल व पालिकेतर्फे श्रींच्या चरणी फळांचा प्रसाद अर्पण करण्यात आला. आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, दिव्या राणे यांनी श्रींचे दर्शन घेतले.
दुपारी मुख्य पूजा झाल्यानंतर भाविकांनी देवदर्शन घेण्यास सुरुवात केली. यावेळी महाप्रसाद झाला. संध्याकाळी ४ वा. नवदुर्गा दिंडी पथक बोरीतर्फे दिंडीचा कार्यक्रम झाला, तर ६ वा. नवदुर्गा भजन मंडळ बोरी या पथकातर्फे भजनांचा कार्यक्रम झाला. रात्री १२ वा. कालचक्र हा दशावतारी नाट्यप्रयोग प्रवीण कळंगुटकर यांच्या पथकाने सादर केला.
२५ ते ३० जानेवारीदरम्यान सकाळी १० वा. देवस्थानात विविध संस्था व संघटनांतर्फे श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसाद होईल. संध्याकाळी चांदणे स्वरांचे, नक्षत्रांचे देणे, स्वर अक्षर, मोहक, स्वरांचे सार्थक, मुद्रा, दिंडी, डान्स वाईब्स, स्वर अभिषेकी असे गायन, नृत्य, दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात येतील.
३१ रोजी सायंकाळी ५.३० वा. ‘स्वरांजली’ हा किशोरी मुर्के (पुणे) आणि गणेश मेस्त्री (मुंबई) यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.
१ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ५.३० वा. ‘नृत्यमार्ग’ हा स्वेता (मोरजी) आणि साथींचा कार्यक्रम होईल. ७.३० वा. विनय महाेले आणि वेदा नेरूरकर (मुंबई) यांचा सूर ईश्वर अभंग, भक्तीगीत, नाट्यसंगीताचा कार्यक्रम होईल.
२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वा. गोवा बाल भवनतर्फे रंगारंग कार्यक्रम होईल. ३ रोजी संध्याकाळी ६ वा. कला व संस्कृती संचालनालयातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम, ७.३० वा. वैष्णवी जोशी व साथींचा सांस्कृतिक नृत्याचा कार्यक्रम होईल.
4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ६ वा. ‘स्वर चैतन्याचे’ हा सुभाष पवार आणि नम्रता जोशी यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल. रात्री ८ वा. मंदिरा तिरोडकर जोशी आणि साथींच्या भरतनाट्यम कार्यक्रमाने जत्रोत्सवाचा समारोप होईल.
मनोरंजनाची मेजवानी
जत्रोत्सवाच्या निमित्ताने बुधवारी हजारो भाविकांनी श्रींचे दर्शन घेतले. देवस्थानाबाहेर सकाळपासून भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. यावेळी राजकीय पक्षांचे नेते, लोकप्रतिनिधी, सरकारी अधिकारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी देवस्थानात येऊन देवदर्शन घेतले. यंदा जत्रोत्सवातील फेरीमध्ये ६५० दुकाने थाटली आहेत. याशिवाय जायंट व्हील यासारखे मनोरंजनात्मक खेळ लोकांचे आकर्षण ठरले आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.