फोंडा, देशात गुन्ह्यांचा तपास करताना शिक्षेचे प्रमाण हे ५७ टक्के असून गोव्यात तर हा दर अतिशय कमी असल्याचे सांगून गुन्हा तपासाचा दर आधी वाढवायला हवा, असेही गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी सांगितले.
कुर्टी - फोंड्यातील राष्ट्रीय फोरेन्सिक सायन्स विद्यापीठातर्फे आयोजित ‘गुन्हा व्यवस्थापन आणि नवीन कायदे’ यासंबंधीच्या विषयावर बोलताना राहुल गुप्ता यांनी गुन्ह्यांचा तपास करताना सर्व घटकांनी एकत्रित आणि सक्षमरीत्या काम केल्यास अशा गुन्ह्यांचा छडा लावणे सोपे होऊ शकते, असे नमूद केले.
एखाद्या गुन्ह्याच्या तपासासाठी त्याच्या मूळापर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. गुन्हा घडल्यास पीडित व्यक्तीचे कुटुंब त्यात होरपळते, म्हणून गुन्ह्याच्या तपासासाठी नवनवीन युक्त्या प्रयुक्त्यांचा वापर तर व्हायलाच हवा,असेही ते म्हणाले. तपास वेगाने व्हावा, नवीन कायद्यांचा पुरेसा लाभही अशा तपासासाठी आता होणार असल्याचा दावा गुप्ता यांनी केला.
कुर्टी - फोंड्यातील नॅशनल फोरेन्सिक विद्यापीठात आज (गुरुवारी) आयोजित या कार्यक्रमाला पोलिस अधीक्षक राहुल गुप्ता यांच्यासमवेत विद्यापीठाचे प्रमुख डॉ. नवीनकुमार चौधरी तसेच पोलिस अधीक्षक सुचिता देसाई आदींसह इतर पोलिस अधिकारी उपस्थित होते.
ऱाहुल गुप्ता यांनी गुन्ह्यांचा तपास आणि यंत्रणा यासंबंधी बोलताना पीडिताला योग्य न्याय देण्यासाठी सर्व घटकांनी एकत्रितरीत्या काम करायला हवे असे नमूद केले. पीडिताला सहानुभुतीची आवश्यकता असते, त्यामुळे प्रसंगी अशा लोकांच्या घरी भेट देण्याचीही गरज गुप्ता यांनी व्यक्त केली.यावेळी गुन्ह्यांचा तपास आणि इतर बाबींवर उपस्थितांत चर्चा झाली.
गुन्ह्याच्या तपासासाठी या कायद्यांचा पुरेपूर वापर होणार आहे. गुन्ह्याच्या तपासाबरोबरच दोषीला तेवढीच कडक शिक्षा होणे आवश्यक असते, त्यामुळे गुन्हेगाराला जरब बसते, त्यासाठी तपासकाम योग्यरितीने व्हावे.
— डॉ. नवीनकुमार चौधरी, फॉरेन्सिक विद्यापीठाचे प्रमुख
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.