mavin  Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील बोकाळलेला भ्रष्टाचार व मंत्र्यांचा हस्तक्षेप

बोकाळलेला भ्रष्टाचार किती खोलवर गेला आहे हे स्पष्ट होतेच, शिवाय या कामात आता भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केलेल्या मंत्र्यांनाच यात उतरावे लागत असल्याने ही प्रशासनाची की मंत्र्यांची नामुष्की आहे अशी चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

बोकाळलेला भ्रष्टाचार व मंत्र्यांचा हस्तक्षेप

सरकार दरबारचे सर्वसामान्यांचे कोणतेही प्रश्‍न सोडविण्यासाठी मध्यस्थांचे हात ओले करावे लागतात हा अनुभव आहे. मात्र, घरांना नंबर देण्याची योजना सरकारने जाहीर केल्याने पंच आणि पंचायत सचिव यासाठी हजारो रुपये उकळत असल्याच्या अनेक तक्रारी दस्तुरखुद्द मंत्र्यांकडेही येत असल्याने अखेर पंचायत मंत्री माविन गुदिन्हो यांनी या कामासाठी पंच आणि पंचायत सचिवांनी पैसे मागितल्यास सरळ आपल्याकडे या किंवा पोलिसात (Goa Police) तक्रार करा असे जाहीर आवाहन केले आहे. यावर समाजात बोकाळलेला भ्रष्टाचार किती खोलवर गेला आहे हे स्पष्ट होतेच, शिवाय या कामात आता भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी कार्यरत राहण्याचे आवाहन केलेल्या मंत्र्यांनाच यात उतरावे लागत असल्याने ही प्रशासनाची की मंत्र्यांची नामुष्की आहे अशी चर्चा सुरू आहे. ∙∙∙

दयेशच्या सक्रियतेचे रहस्य

यापूर्वी भाजपच्या कार्यक्रमात सामील होण्यास फारसा रस न दाखविणारे केपेचे माजी नगराध्यक्ष दयेश नाईक हे विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपच्या कार्यक्रमात भलतेच सक्रिय झाले आहेत असे दिसून येते. सध्या जो भाजपचा (Goa BJP) सामाजिक न्याय पखवड्याच्यावेळी आंबेडकर जयंती कार्यक्रम आयोजित केला, त्यावेळी केपेच्या नगराध्यक्ष सुचिता शिरवईकर आणि दयेश नाईक हेच सक्रिय होते. याचा शोध घेतल्यास असे कळून आले की त्यामागे खुर्चीचे राजकारण असल्याची माहिती मिळाली. असे म्हणतात दयेश सध्या बाबू कवळेकरांवर दडपण आणून सुचिताच्या जागी दीपाली नाईक यांना नगराध्यक्ष म्हणून त्या पदावर आणू पाहता,. तर सुचिताला आपली खुर्ची कायम राखायची आहे. त्यासाठीच ही अति सक्रियता असे सांगितले जाते. दयेशचे मनसुबे फळास येतील का? ∙∙∙

बिले वेळेवर हवीत

नवे सार्वजनिक बांधकाममंत्री काब्रालबाब यांनी पाण्याची बिले ऑनलाइन भरण्याची व्यवस्था करण्याची घोषणा केली आहे. वरकरणी पाहता घोषणा चांगली वाटते व तिची अंमलबजावणी होताच सर्व समस्या चुटकीसरशी सुटतील असाच कुणाचाही ग्रह होईल, पण मुद्दा बिल भरण्याचा नाही, तर बिल आकारण्याचा व ती वेळेवर जारी करण्याचा आहे. दरमहा ती दिली तर ती भरण्यात कुणाची तक्रार नसते, पण आठ नऊ महिन्यांची एकदम दिली जातात व त्यातून सर्व समस्या निर्माण होतात. काब्रालबाब वीजमंत्री असताना, त्या बिलांचाही असाच घोळ झाला होता. आता तरी या व्यवस्थेत बदल होणार का? ∙∙∙

अनिवासी वाघ

पट्टेरी वाघ राज्यात असल्याच्या खाणाखुणा वेळोवेळी वन खात्याला सापडलेल्या असताना नवीन वनमंत्री विश्वजीत राणे (Vishwajeet Rane) यांनी गोव्यातील वाघ निवासी नसून ते स्थलांतरीत असल्याचे विधान केल्याने राज्यातील पर्यावरणवादी व निसर्गप्रेमींच्या भुवया उंचावल्या आहेत. वाघ व पाणी यांचा जवळचा सबंध आहे. पाणी असेल, गवत असेल आणि ज्या भागात गवत आहे त्या भागात हरणासारखे शाकाहारी प्राणी असतील त्याच भागात भक्ष्य सापडत असल्याने वाघाचा अधिवास असेल हा वैश्विक सिद्धांत आहे म्हणजेच वाघ नाहीच ते परप्रांतीय आहेत असे म्हणणे वैश्विक सिद्धांत नाकारण्यासारखे आहे. म्हणजे धरायला गेलो तर चावते सोडले तर पळते अशी स्थिती वनमंत्र्यांची तर झाली नाही ना? ∙∙∙

(Corruption is on the rise in Goa)

पाणी बिलाचे धक्के...

माजी वीजमंत्री नीलेश काब्राल यांनी वीज खात्यात विविध प्रकारचे बदल केले होते. त्यात वीज बिले ऑनलाइन करण्याचा प्रस्ताव होता. मात्र, तो प्रस्तावच राहिला. आता काब्राल यांचे खाते बदलले आणि ते सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री झाले. या खात्यात त्यांनी पाणी बिले डीडी अथक धनादेशाद्वारे चालणार नाहीत, तर ती ऑनलाइनच भरावी लागतील असा फतवा काढला आहे. यापूर्वीच खात्याच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांची गैरसोय लक्षात घेऊन ऑनलाइन पाणी बिले भरण्याची सोय केली आहे, परंतु त्यात अधिक सुसूत्रता येण्यासाठी मंत्री नीलेश काब्राल यांनी पावले उचलली आहेत. ती स्वागतार्ह आहेतच, पण ही बिले ऑनलाइन भरण्यासाठी मोबाईल रेंज आणि कॉम्प्युटरची गरज असते. ग्रामीण भागात या दोन्ही सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या ऑनलाइन होण्याला ग्रामीण भागातून विरोध होत आहे. सामान्य माणूस हे करू शकणार नाही हे मंत्री महोदयांच्या लक्षात येत नाही, की केवळ बदलाचा डांगोरा पिटण्यासाठी असे आदेश निघतात हे सर्वसामान्यांना समजण्यापलीकडे आहे अशी चर्चा सध्या पिकली आहे. त्यापेक्षा मंत्री महोदयांनी जुनी आणि नवी पद्धत चालू ठेवल्यास कोणाचीही गैरसोय होणार नाही. ∙∙∙

वाघांचे स्थलांतर... मंत्र्यांचे अज्ञान

देशभरातील अभयारण्यांना सतत भेटी दिल्याचे सांगत आपल्या इतका जंगलांचा अभ्यास कोणाचाच नाही असा दावा ठोकत वनमंत्र्यांनी गोव्यात वाघच नाहीत असे सांगून टाकले आहे. मात्र, गोव्यातील वाघदेवता, लोकसंस्कृती, लोकसाहित्यातील वाघ इथे प्राचीन काळापासून नांदत आहे. हे विसरता येणार नाही. गेल्या 20 - 22 वर्षांपासून तर वन खात्याच्यावतीने लावण्यात येणाऱ्या ट्रॅप कॅमेऱ्यामध्ये वाघाची छबी सतत मिळते आहे. 2009 व 2019 साली सत्तरी तालुक्यात मारलेले वाघ बाहेरचेच होते का? हा प्रश्‍न पर्यावरणप्रेमींकडून विचारला जात आहे. या विषयावर नेटकऱ्यांनी मंत्र्यांना चांगलेच फैलावर घेतले आहे. समाज माध्यमांवर त्यांनी यासंदर्भात अनेक प्रश्‍न विचारून मंत्र्यांना जाब विचारला आहे. मंत्री महोदय वाघाच्या दर्शनासाठी देशासह आफ्रिकेच्या जंगलात जातात आणि छायाचित्रणाची हौसही पूर्ण करतात. मग स्वतःचे वन खाते राज्यात वाघ असल्याचे सांगत असतानाही ते राज्यात वाघच नाहीत, त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाचीही गरज नाही असे सांगण्यामागे त्यांचा कोणता अर्थपूर्ण हेतू लपला आहे हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. यालाही समाज माध्यमावर वाचा फोडण्यात येत आहे. ∙∙∙

कुळ मुंडकारांचा कनवाळा

तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप सरकारने कुळ मुंडकारांचे प्रश्न तातडीने सोडविले जातील असे जाहीर केले आहे. काही दिवसांपूर्वी महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी कार्यालयाचा ताबा घेतल्यानंतर हा प्रश्न सहा महिन्यांत सोडविला जाईल असे सांगितले. त्याला आज मुख्यमंत्र्यांनी जोड देत पहिल्या टप्प्यात दहा हजार कुळांचे प्रश्न निकाली काढण्याचे जाहीर केले आहे. हा प्रश्न गोवा मुक्तीपासून आहे. गेली दहा वर्षे भाजपची सत्ता आहे. या दहा वर्षांत कुळ मुंडकारांच्या प्रश्नांकडे का दुर्लक्ष केले आणि आताच कुळ मुंडकारांचा कनवाळा का आला आहे हे समजण्यापलीकडचे आहे. लोकसभेच्या निवडणुका जवळ आले असल्या, तरी अद्यापही वेळ आहे. मात्र, सरकारची घोषणाबाजी सुरू झाली आहे. हे वर्षानुवर्षे भिजत पडलेल्या कुळ मुंडकारांच्या प्रश्नाबद्दल जाहीर केलेल्या घोषणांवरून स्पष्ट झाले आहे. ∙∙∙

सत्कार कसले करता...

हल्ली राजकारणी निवडून आले रे आले की लगेच त्यांचे सत्कार सोहळे सुरू होतात. असे काय दिवे लावले म्हणून त्यांचा सत्कार करावा. यावर एकजण हळूच म्हणतो आम्ही काही त्यांच्यासाठी काम केले नाही, पण निदान सत्कार केला, तर कायमस्वरूपी लक्षात राहतो हेच काय ते कारण असल्याचे स्पष्ट करीत सत्काराला कितीसा खर्च येतो. दीडशे रुपयांची शॉल आणि पन्नास रुपयाची फुले. इतका स्वस्त झाला राजकारणी लोकांचा सत्कार. निवडून येऊन लोकाभिमुख कामे केली, तर एकवेळ समजून घेता येईल, पण निवडून आला म्हणून सत्कार सोहळा आयोजित करणे हे आता गोव्यात फॅड बनले आहे. सत्कार करून घेण्याइतकी शुद्ध चारित्र्याची राजकारणी व्यक्ती मिळणे दुरापास्त झाली आहे. राजकारणी लोकांनी अशा सत्कार सोहळ्यापासून लांब राहणेच योग्य ठरेल. ∙∙∙

निविदा जारी केली पण...

या दिवसात विविध भागांतील रस्त्याचे प्रश्न ऐरणीवर येत आहेत. कदाचित सुदिनरावांना हे खाते मिळाले नाही हे तर त्यामागील कारण नसावे ना याचा मागोवा भाजपकडून घेतला जात आहे, पण मुद्दा तो नाही. काणकोणमधील जनतेने निवडणुकीनंतर बाळ्ळी-काणकोण महामार्गाच्या भयंकर अवस्थेचा मुद्दा भलताच लावून धरला व तो विषय गाजलाही होता. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी खडबडून जागे झाले व हा रस्ता दुरुस्तीच्या काही कोटीच्या निविदा एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात जारी केल्या. संबंधितांनी त्याची समाज माध्यमावरून भरपूर प्रसिद्धीही त्यांनी केली. मात्र, हे काम सुरू कधी होईल व पूर्ण कधी केले जाईल ते त्यांनी नमूद केले नाही, हीच तर खरी गोम आहे. हा सस्पेन्स संपणार कधी? ∙∙∙

सासष्टीत भाजप निश्चिंत?

अनपेक्षितपणे सत्तारुढ झालेल्या भाजपने आता जून अखेर होणाऱ्या पंचायत व दोन वर्षांनंतरच्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. उत्तर गोव्याबाबत त्यांना चिंता नव्हती व आता म.गो. ला जवळ करून त्यांनी दक्षिण गोव्यातील मार्गही सुकर केला आहे. म.गो. मुळे मडकईत प्रचंड मताधिक्याची त्यांना खात्री आहे व त्यामुळे सासष्टीवर विसंबून न राहण्याचा त्यांचा पवित्रा दिसतो. मंत्रिमंडळात सासष्टीला स्थान नसण्याचे ते एक कारण मानले जाते. न केलेले हे मिशन सालसेत भाजपला फळणार का? ∙∙∙

रॉयचा धमाका

रवी नाईकांचे दुसरे पुत्र रॉय तसे भलतेच फॉर्मात आल्यासारखे दिसायला लागले आहेत. थोरले बंधु रितेश यांना नगराध्यक्ष करण्यात रॉयचा मोलाचा वाटा होता असे बोलले जात आहे. काही नगरसेवकांना फोन करून म्हणे त्यांनी रितेशच्या बाजूने राहण्याची विनंती केली होती. आता पंचायत निवडणुकीतही रॉयने लक्ष घातल्याचे समजले आहे. ते काही पंचांना फोन करून रवी नाईकांचे समर्थक दाजी नाईक यांना सरपंचाच्या निवडणुकीत साथ देण्याची विनंती करत आहेत असे बोलले जात आहे. पंचायतीच्या निवडणुकीला फक्त दीड महिना राहिल्यामुळे आता या सरपंचपदात विशेष अर्थ नसला तरी रॉयच्या प्रयत्नांना दाद द्यावीच लागेल. त्याचा हा धमाका पाहून रॉयची ही आगामी निवडणुकीची तयारी तर नव्हे ना अशी सध्या फोंड्यात चर्चा सुरू आहे. ∙∙∙

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत?

गोवा विधानसभेचे नवे विरोधी पक्षनेते म्हणून मायकल लोबो यांची निवड होऊन बरेच दिवस झाले. काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय नेते पी. चिदंबरम, गोवा प्रभारी दिनेश गुंडूराव यांनी प्रत्यक्ष गोव्यात येऊन विरोधी पक्षनेतेपदाचा पदभारही लोबो यांच्याकडे सुपूर्द केला. यासाठी मोठा गाजावाजा करणारा कार्यक्रम पणजीत झाला. मात्र, ट्विटरच्या ऑफिशिअल साइटवर विरोधी पक्षनेतेपदी अद्यापही दिगंबर कामतच आहेत. कामत यांनीच आपले पद कायम ठेवले आहे. त्यामुळे कायमस्वरूपी ट्विटरचा संदर्भ वापरणाऱ्यांना सध्या तरी कामतच विरोधी पक्षनेते आहेत असे वाटते. बघूया कामतसाहेब कधी या नव्या सोशल मीडियावर अपडेट होतात ते. ∙∙∙

नाव मोठे लक्षण...

मडगाव रेल्वे स्टेशन हे कोकण रेल्वे मार्गावरील महत्त्वाचे जंक्शन आहे. त्यासाठीच हा मार्ग खुला झाल्यावर सरकारने या स्टेशनच्या परिसराचा कायापालट करण्याची योजना आखून त्याची अंमलबजावणी केली. त्या अंतर्गत रावणफोंड ते राजेंद्रप्रसाद स्टेडियमपर्यंत मुख्य रस्त्याच्या दुतर्फा अत्याधुनिक धर्तीचे पदपथ जीसूडातर्फे उभारले, पण आता ते दुर्लक्षित आहेत. रेल्वे स्टेशन बाजूने तर पुरुषभर उंचीचे गवत वाढून सुकले आहे, तर काही भागात स्थलांतरितांचे तंबू ताणले आहेत. त्यामुळे हे पदपथ हेची फळ काय मम तपाला म्हणत असावेत? ∙∙∙

पंचायत निवडणुकीत सावित्री पॅनल

हरले तरी सहजासहजी हार न मानणाऱ्यांमध्ये सावित्री कवळेकर यांचा समावेश होतो. २०१७ च्या निवडणुकीत त्यांचा सांगेत पराभव झाला तरी त्यांनी हार न मानता परत निवडणूक लढविलीच. तिथेही त्यांना पराभव स्कीकारावा लागला तरी अजून त्या सांगेत सक्रिय आहेत. आता पंचायत निवडणुकीत त्या म्हणे स्वतःचे पॅनल उतरविण्याच्या तयारीत असल्याचे समजते. दुसऱ्या बाजूने सुभाषही आपले पॅनल उतरविण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे सांगेच्या मैदानात पुन्हा एकदा सावित्री आणि सुभाष यांच्यात सामना रंगणार असे वाटते. यावेळी कोण बाजी मारणार? ∙∙∙

बहुजनांच्या कार्यक्रमाला आमदारांची दांडी

गेल्या विधानसभा निवडणुकीत निवडून आलेल्या बहुजन समाजातील आमदारांचा सत्कार सोहळा फोंड्यात आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांच्या हस्ते हा सत्कार सोहळा होता आणि त्याला मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचीही उपस्थिती होती, पण विशेष म्हणजे या कार्यक्रमाला बहुजन समाजातील अर्ध्या आमदारांनी दांडी मारली. सभागृहही पूर्ण भरले नव्हते. खुद्द सत्कारमूर्ती सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी ही खंत व्यक्त केली. एरव्ही निवडणुकीवेळेला बहुजनच बहुजनांच्या विरोधात लढून पाडण्यासाठी जोरदार प्रयत्न करतो, मग आणखी हा कार्यक्रम कशाला, त्याचबरोबर हा कार्यक्रम म्हणजे बहुजनांचा नव्हे, तर भाजप समर्थकांचा असल्याच्या प्रतिक्रियाही काहीजणांनी व्यक्त केल्या. त्यामुळेच कदाचित सत्ताधारी सोडाच, पण विरोधातील आमदार कार्यक्रमस्थळी फिरकलेच नसावेत. ∙∙∙

फोंड्यात वीज खात्याची कमान

काल फोंड्यात विजेच्या गडगडाटासह पाऊस आला आणि अगदी ठरल्याप्रमाणे वीज गुल्ल झाली. नंतर पाऊस गेला तरी बराच वेळ वीज आलीच नाही. आता वीज खात्याची सूत्रे सुदिन ढवळीकरांच्या हाती आल्यामुळे वीज खात्याच्या कारभारात काही सुधारणा होईल या अपेक्षेने वावरणाऱ्या ग्राहकांच्या पदरी निराशाच पडली. सुदिननी आताच वीज खात्याचा कारभार हाती घेतल्यामुळे लगेच चमत्काराची अपेक्षा करता येत नाही. हे जरी खरे असले तरी सुरवात काही चांगली झाली नाही असे लोक बोलत होते. आताच जर असे तर ऐन पावसाळ्यात काय अशीही चर्चा सुरू होती. ढवळीकर साहेब तुम्हीच आता पावा असाच सूर या फोंड्याच्या वीज खात्याची कमान पाहून लोकांच्या तोंडातून उमटताना दिसत होता. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

Margao: मडगाव नागरी आरोग्य केंद्राचे नाईलाजाने स्थलांतर! इमारतीची परिस्थिती भीतीदायक; जिल्हा इस्पितळातून राहणार कार्यरत

Goa Land Dispute Case: जमिनीच्या वादातून खूनाचा प्रयत्न, पोलिसांकडून दोघांना अटक; वाचा नेमकं प्रकरण?

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT