Ravi Naik : गोव्यात नारळ व आंब्याचे उत्पादन जास्त प्रमाणात होत आहे. नारळ व आंबे इतर राज्यांमध्ये निर्यात केले जातात. गोमंतकीय शेतकऱ्यांनी नारळ व आंब्यांच्या उत्पादनावर तसेच फुलांच्या उत्पादनावर भर द्यावा, असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. मडगावात रोटरी क्लब व बीपीएस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ‘फ्लोरा फेस्त’ प्रदर्शनाचे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.
नारळ, आंब्यांना मुलभूत आधार किंमत मिळण्यासाठी महामंडळे फायदेशीर ठरतील. सध्या या दोन्ही महामंडळांना परवानगी मिळवण्यासाठीची प्रक्रिया सुरू असून येत्या तीन चार महिन्यांत ही महामंडळे सुरू केली जातील. केंद्र सरकारकडूनही त्यासाठी अनुदान अपेक्षीत आहे, असेही नाईक यांनी सांगितले.
गोव्यात फुलांना भरपूर मागणी आहे. आम्हाला कर्नाटकातून येणाऱ्या फुलांवर अवलंबून रहावे लागते. त्यामुळे गोमंतकीय शेतकऱ्यांनी फुलांच्या उत्पादनावर भर द्यावा. जुने गोवे येथे लवकरच कृषी महाविद्यालयाची स्थापना केली जात आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांना होईल व तरुणांमध्ये कृषी उद्योगाबद्दलची आस्था वाढेल. किसान सन्मान निधी व किसान कृषी कार्डाचाही शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
भारत हा कृषीप्रधान देश आहे. आता देशात कृषी संबंधीची संकल्पना बदलत चालली असून युवक आधुनिक तंत्रज्ञानावर भर देत आहे. त्यामुळे वेगवेगळी कृषी उत्पादने उपलब्ध केली जात असल्याचे मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी सांगितले.
कृषी संचालक नेविल आफोन्सो यांनी कृषी खात्याच्या विविध योजनांची माहिती दिली. शेतकऱ्यांना जमीन सुधारणा ते बाजारपेठ मिळवून देण्यापर्यंत कृषी खात्यातर्फे मदत केली जाते. नवीन तंत्रज्ञानाचा वापर होईल अशाप्रकारच्या योजना कृषी खात्याने तयार केल्या आहेत. शेतकऱ्यांना 50 ते 90 टक्के अनुदान दिले जात आहे. या कार्यक्रमाला नगराध्यक्ष लिंडन परेरा उपस्थित होते. रोटरी क्लबचे अध्यक्ष दीप कारापुरकर यांनी सर्वांचे स्वागत केले.
‘फ्लोरा फेस्त’ प्रदर्शनात 36 दालने
‘फ्लोरा फेस्त’ या तीन दिवसीय प्रदर्शनात 36 दालने होती. फळे, फुले यांची बियाणे, रोपटी तसेच कृषी उत्पादने उपलब्ध करण्यात आली. शिवाय शेतकऱ्यांना कृषी योजनांची व तंत्रज्ञानाची माहिती करून देण्यात आली. गोव्याच्या कृषी खात्यानेही भले मोठे दालन उघडले होते.
मुरगावसाठी वास्कोत होणार कृषी कार्यालय
गोव्यात कृषी उद्योजक तयार करण्यासाठी कृषी खाते प्रयत्नशील असल्याचे कृषी संचालक नेविल आफोन्सो यांनी सांगितले. दक्षिण गोव्यातील मडगाव येथील कृषी खात्याच्या कार्यालयाचे विभाजन केले जाणार असून लवकरच मुरगाव तालुक्यासाठी वेगळे कार्यालय वास्कोत सुरू केले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.