पणजी: ओईएल कोलंबो हे कंटेनर जहाज शनिवारी मुरगाव बंदरात दाखल झाले. त्यामुळे अचानक बंद झालेली कंटेनर फिडर सेवा पुन्हा सुरू होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जहाज शिपिंग एजंट संसारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडने एमपीटी येथे एमएससी लाइनच्या कंटेनरसाठी या जहाजाला पाचारण केले आहे. हे जहाज रविवारी पहाटे बंदरातून परतीच्या मार्गाला लागेल. एमएससी लाइन्स कंपनीसाठी कंटेनर जहाज आले आहे आणि एमपीटीतून त्यांचे कंटेनर घेऊन जाईल. हे जहाज आत्तापर्यंत एमएससी कंटेनरसाठी कार्यरत आहे. अजून एक जहाज ऑपरेटर कंटेनर फिडर सेवा सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. परंतु त्यासाठी काही अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही योजना यशस्वी झाली तर पंधरा दिवसांतून एकदा ही सेवा सुरू राहील.
या जहाजाच्या द्विमासिक कॉलचे नियोजन सप्टेंबरच्या अखेरनंतर केले जाऊ शकते. जहाजाने 120 आयात कंटेनर आणि 60 निर्यात कंटेनर हाताळले आहेत. गोव्यातील एमएससी लाईन्सची ही पहिली शुभारंभी सेवा आहे. संसारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेड एमपीटी येथे जहाज हाताळत आहे.
एमपीटी येथे कार्यरत असलेली 30 वर्षे जुनी कंटेनर फिडर सेवा 3ऑगस्ट रोजी अचानक बंद करण्यात आली होती. त्यानंतर मोठ्या संख्येने भागधारक आणि औद्योगिक संघटनांनी केंद्रीय नौकावहन, वाणिज्य आणि वित्त मंत्रालय आणि राज्य शिपिंग मंत्री यांना निवेदन सादर केले होते. केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना कंटेनर फीडर सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, यासाठी विनंती केली होती. एमपीटीने नंतर ट्रेड नोटिसा जारी केल्या होत्या आणि एमपीटीमध्ये सेवा सुरू करण्यास इच्छुक असलेल्या जहाज चालकांसाठी व्यापार सवलत आणि विविध बंदर संबंधित शुल्क माफ करण्याची घोषणा केली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.