Digambar Kamat |Goa BJP vs Congress
Digambar Kamat |Goa BJP vs Congress Dainik Gomantak
गोवा

काँग्रेसमध्ये फुटीची वावटळ; दिनेश गुंडू राव तातडीने गोव्यात

दैनिक गोमन्तक

मडगाव : सध्या काँग्रेस पक्षावर नाराज असलेले मडगावचे आमदार आणि माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे आठ आमदार फुटून भाजपमध्ये जाण्याच्या नेटाच्या हालचाली सुरू झाल्याचे खात्रीपूर्वक वृत्त आहे.

मात्र, याची कुणकुण काँग्रेस पक्षश्रेष्ठींना लागल्यावर त्यांनीही ही फूट टाळण्यासाठी सर्व ताकदीने प्रयत्न सुरू केले आहेत. गोव्याचे काँग्रेस प्रभारी दिनेश गुंडू राव हे ‘मिशन डिफ्युज’ करण्यासाठी तातडीने गोव्यात दाखल आहेत.

खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिगंबर कामत यांच्यासह मायकल लोबो, दिलायला लोबो, केदार नाईक, कार्लुस अल्वारिस आणि राजेश फळदेसाई अशा सहा आमदारांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय पक्का केला असून आणखी दोन आमदारांना आपल्या बाजूने ओढून काँग्रेस विधिमंडळ गटच भाजपमध्ये पुन्हा एकदा विलीन करण्याचा त्यांचा डाव होता.

मात्र, याची कुणकुण काँग्रेस श्रेष्ठींना लागल्यावर त्यांनीही आता ही फूट टाळण्यासाठी प्रयत्न सुरू केले असल्याचे समजते. राव यांनी दिगंबर कामत सोडल्यास अन्य दहाही आमदारांबरोबर पणजीत बैठक घेऊन सर्व आमदार एकत्र असल्याचे सांगण्याचा प्रयत्नही केला. मात्र, काँग्रेस पक्षात अजूनही फुटीची वावटळ घोंघावत असल्याचेही सांगण्यात आले.

दिगंबर कामत यांनी दिल्लीत जाऊन भाजपच्या नेत्यांशी बैठक घेतल्यानंतर ही वावटळ अधिक सक्रिय झाली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कामत यांनी आपल्याला जवळ असलेल्या काही काँग्रेस आमदारांना फोनही केला.

त्यामुळेच ही बातमी फुटली आणि काँग्रेस श्रेष्ठींनी आपले दूत गोव्यात पाठविले. आलेक्स सिक्वेरा, एल्टन डिकॉस्ता, रुडॉल्फ फर्नांडिस, संकल्प आमोणकर या चारपैकी दोन आमदारांना आपल्याकडे वळवून दोन तृतीयांश आमदार घेऊन काँग्रेसचा विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याचा प्रयत्न केला जात होता, अशी माहिती मिळाली आहे.

‘ते’ म्हणतात.. आम्ही नाहीच!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, युरी आलेमाव यांनी या फुटीच्या नाट्यात सहभागी होण्यास पूर्णपणे नकार दिल्याने केपेचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांना आपल्या गोटात ओढण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनीही फारशी दाद दिली नाही, अशी माहिती प्राप्त झाली आहे.

काँग्रेसचे प्रतोद कार्लुस अल्वारिस यांना याबाबत विचारले असता, माझा काँग्रेस पक्ष सोडण्याचा अजिबात विचार नाही. मला माझ्या मतदारांशी प्रतारणा करायची नाही, असे त्यांनी सांगितले.

मी दिल्ली नव्हे, कोलकात्याला गेलो : दिगंबर कामत

याविषयी दिगंबर कामत यांच्याशी संपर्क साधला असता, असे काहीच घडले नसल्याचे त्यांनी नेहमीच्या स्टाईलमध्ये सांगितले. तुम्ही दिल्लीला गेला होता का, असे विचारले असता, मी दिल्लीला गेलो नव्हतो तर स्वीमिंग असोसिएशनच्या एका बैठकीला हजर राहण्यासाठी कोलकात्याला गेलो होतो, असे त्यांनी सांगितल्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

...असा होता भाजप श्रेष्ठींचा प्लॅन

काँग्रेसचे दोन तृतीयांश आमदार फोडून त्यांचा विधिमंडळ गट भाजपमध्ये विलीन करण्याचा भाजप पक्षश्रेष्ठींचा प्लॅन असून विधानसभा अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच तो तडीस लावून काँग्रेसची पुन्हा एकदा नाचक्की करणे हा त्यांचा मानस आहे. असे झाल्यास विश्वजीत राणे यांनाही काबूत आणणे शक्य होणार आहे, असे सांगण्यात येते.

दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात व्यस्त राहू नका! :

केवळ दुसऱ्यांचे पक्ष फोडण्याच्या कामात व्यस्त राहू नका. बहुमत तयार केले म्हणजे चांगले सरकार होत नाही. स्वार्थासाठी पक्ष सोडलेल्यांना लोकांनी घरी बसवले आहे, असा टोला गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी ‍हाणला.

कामतांना राज्यसभा!

दिगंबर कामत यांना प्रदेशाध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते पदासाठी डालवल्यानंतर हे नाराज झाले होते. तेव्‍हापासून ते काँग्रेसला डच्चू देणार असल्याची चर्चा सुरू होती. आजच्या बैठकीलाही कामत अनुपस्थित राहिल्याने या चर्चेला वाव मिळाला. निवडणुकीपूर्वी पक्षाचा प्रत्येक कार्यक्रम, मोर्चा, आंदोलनाला उपस्थित राहणारे कामत आता पूर्वीप्रमाणे सक्रिय नाहीत. पुढच्या वर्षी राज्यासभेसाठी निवडणूक होणार असून, भाजपकडून कामत यांना संधी मिळणार असल्याची चर्चा बऱ्याच काळापासून रंगली आहे.

आमदारांचे दोन गट

सध्या विधानसभेत काँग्रेसचे ११ आमदार आहेत. परंतु त्यात देखील दोन गट असल्याचे सूत्रांकडून समजते. पहिला गट हा दिगंबर कामत आणि मायकल लोबो यांचा आहे. यात दिलायला लोबो, केदार नाईक, ॲड. कार्लुस अल्वारिस, राजेश फळदेसाई यांचा समावेश आहे. तर, दुसऱ्या गटात संकल्प आमोणकर, आलेक्स सिक्वेरा, युरी आलेमाव, रुडाल्फ फर्नांडिस आणि एल्टन डिकॉस्टा यांचा समावेश आहे. परंतु, दोन तृतीयांश आकडेवारीसाठी आठ आमदारांची गरज असून काही आमदार अजूनही गट बदलण्याची शक्यता आहे.

भाजपकडून दिशाभूल

राज्यातील विषय सोडवण्यात सरकार अपयशी ठरले असून मूळ मुद्यांवरून जनतेचे लक्ष विचलीत करण्यासाठी या अफवा भाजपकडून पसरण्यात येत आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार एकसंघ आहे. विधानसभा अधिवेशनात काँग्रेसचे आमदार सरकारला विविध विषयांवरून घेरणार आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. दिशाभूल करून लोकांना अंधारात ठेवण्यासाठी हा खटाटोप सुरू आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT