Indigo Flight Emergency: देशाच्या राजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तींनी मेडिकल इमर्जन्सीच्या क्षणी तत्परता दाखवत एखाद्याचा जीव वाचवल्याची घटना खूप प्रेरणादायी ठरते. अशीच एक हृदयस्पर्शी घटना नुकतीच समोर आली, जिथे गोवा, दमण-दीव आणि दादरा नगर हवेलीच्या सह-प्रभारी एआयसीसी सचिव आणि कर्नाटकच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी विमानात एका अमेरिकन महिलेला वेळेत कार्डियोपल्मोनरी रिससिटेशन (CPR) देऊन तिचे प्राण वाचवले.
डॉ. अंजली निंबाळकर या काँग्रेसने रामलीला मैदान, दिल्ली येथे आयोजित केलेल्या 'व्होट चोरी' रॅलीत सहभागी होण्यासाठी इंडिगोच्या विमानातून दिल्लीसाठी प्रवास करत होत्या. विमानात प्रवासी खचाखच भरलेले होते. त्याचवेळी, कॅलिफोर्नियाची रहिवासी असलेली 34 वर्षीय जेनी ही महिला प्रवासी तिच्या बहिणीसोबत दिल्लीला एका लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होती. विमान टेक-ऑफ झाल्यावर काही वेळातच जेनीला अचानक अस्वस्थता जाणवू लागली. पाहता-पाहता जेनी बेशुद्ध पडली. या घटनेने विमानात अचानक खळबळ उडाली आणि मदतीसाठी घोषणा करण्यात आली.
या इमर्जन्सीच्या क्षणी डॉ. अंजली निंबालकर यांनी क्षणाचाही विलंब न लावता तातडीने जेनीकडे धाव घेतली. त्यांनी जेनीच्या लक्षणांचे त्वरित निरीक्षण केले. जेनीचे ओठ थंड पडले होते, हाताच्या मुठी बंद होत्या आणि चेहरा पिवळा दिसत होता. ही लक्षणे हृदयविकाराच्या झटक्यासारखी असल्याचे डॉ. अंजली यांना जाणवले. कोणतीही रिस्क न घेता त्यांनी लगेच जेनीच्या बहिणीकडून तिची वैद्यकीय पार्श्वभूमी विचारुन घेतली आणि क्षणाचाही विलंब न लावता CPR देण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि जेनीला शुद्ध आली.
जेनीला शुद्ध आल्यानंतर डॉ. अंजली त्यांच्या जागेवर जाऊन बसल्या. परंतु, साधारण अर्ध्या तासाच्या आत जेनी पुन्हा एकदा बेशुद्ध पडली. डॉ. अंजली यांनी पुन्हा तिच्याकडे धाव घेतली आणि तिला दुसऱ्यांदा शुद्धीवर आणले. या दुसऱ्या प्रसंगानंतर जेनीने डॉक्टरांचा हात घट्ट पकडला आणि भावनिक होऊन त्यांना "मला सोडून जाऊ नका (Don’t leave me)" असे म्हणाली. या हृदयस्पर्शी क्षणानंतर विमानाचे लँडिंग होईपर्यंत डॉ. अंजली निंबाळकर तिच्या बाजूलाच बसून तिला दिलासा देत राहिल्या. विमान दिल्लीत उतरताच जेनीला त्वरित रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल करण्यात आले.
डॉ. अंजली निंबाळकर यांच्या समयसूचकतेबद्दल कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी 'एक्स' (X) वर पोस्ट करुन त्यांचे जाहीर कौतुक केले. मुख्यमंत्री सिद्धारमैया यांनी म्हटले की, "गोवा-नवी दिल्ली विमानात खानपूरच्या माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दाखवलेली समयसूचकता आणि करुणा पाहून मला अत्यंत अभिमान वाटला. हवाई प्रवासादरम्यान एका अमेरिकन महिलेला मेडिकल इमर्जन्सीचा सामना करावा लागला, तेव्हा डॉ. अंजली यांनी त्वरित हस्तक्षेप करुन वेळेवर CPR देऊन एक अमूल्य जीव वाचवला."
पुढे त्यांनी नमूद केले की, "सर्वात प्रेरणादायक बाब ही आहे की, वैद्यकीय पेशापासून दूर होऊन राजकारणात सक्रियपणे सहभागी असूनही त्यांच्यातील डॉक्टर क्षणाचाही संकोच न करता मदतीसाठी धावला. हे निस्वार्थ कार्य केवळ त्यांच्या व्यावसायिक कौशल्याचेच नव्हे, तर मानवता, सेवा आणि सहमानवाप्रती असलेल्या जबाबदारीच्या भावनेचे प्रतीक आहे."
डॉ. अंजली निंबाळकर यांचा जन्म 22 ऑगस्ट 1976 रोजी झाला. त्या 2018 ते 2023 पर्यंत कर्नाटक विधानसभेत खानपूरमधून आमदार होत्या आणि त्या विधानसभेत निवडलेल्या 10 डॉक्टरांपैकी एक होत्या. त्या पेशाने स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यांनी 1998 मध्ये मुंबईतील लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेजमधून एमबीबीएस आणि 2010 मध्ये नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्कूल ऑफ मेडिसिनमधून प्रसूती व स्त्रीरोगशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे पती हेमंत निंबाळकर हे भारतीय पोलिस सेवेतील (IPS) अधिकारी आहेत. डॉ. अंजली यांनी 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर उत्तरा कन्नड मतदारसंघातून निवडणूक लढवली होती, पण त्या विजयी होऊ शकल्या नाहीत. त्यांच्या या कार्यामुळे त्यांचे राजकारण आणि वैद्यकीय क्षेत्रातील समर्पण अधोरेखित झाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.