येत्या विधानसभेसाठी (Goa Assembly Election) काँग्रेस (Congress) आणि गोवा फॉरवर्ड पक्षाची (GFP) युती जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेसचे पक्ष नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत विजय सरदेसाई यांनी आज युतीची घोषणा केली. यावेळी गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार विनोद पालयेकर, प्रसाद गावकर उपस्थित होते.
राज्यात काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्यात युती होणार अशी चर्चा होती, अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले ते दिल्लीत. खुद्द राहुल गांधींनी या युतीला हिरवा कंदील दाखविला आहे. काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड यांच्या युतीवर जरी शिक्कामोर्तब झालेला असला, तरी जागा वाटपाबद्दल अजून काहीच ठरलेले नाही, अशी माहिती आहे. दोन्ही पक्षाचे नेते एकत्रित बसून यावर निर्णय घेतील, असे सांगण्यात आले. दुसरीकडे, दिल्लीतील आजच्या घडामोडींमुळे राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. यासंदर्भात विजय सरदेसाई दै. ‘गोमन्तक’शी बोलताना म्हणाले, राहुल गांधींचे पणजोबा पं. जवाहरलाल नेहरू यांनी गोव्यात सैन्य पाठवून गोव्याला पोर्तुगीजापासून मुक्ती दिली होती. आता आम्ही या टीम गोवाच्या मदतीने गोवेकरांना भाजपपासून मुक्ती देऊ. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, की सर्वांनी एकत्रितपणे भाजपविरोधी रणनीती आखण्याचे ठरले आहे.
जुझे फिलिप आज दिल्लीला
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षात युतीबाबत उद्या बुधवारी अंतिम स्वरूप मिळणार असून त्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जुझे फिलिप डिसोझा यांना दिल्लीत बोलावून घेतले आहे. मी उद्या सकाळी दिल्लीला रवाना होणार असे डिसोझा यांनी सांगितले.
‘गोमन्तक’ने दिले होते वृत्त
गोवा फॉरवर्ड, काँग्रेस व राष्ट्रवादी यांच्यात युतीसंदर्भात आज नवी दिल्लीत बैठक होणार याचे संकेत आजच ‘गोमन्तक’ने दिले होते. आज दुपारी गोवा फॉरवर्डला बरोबर घेऊन पुढील निवडणूक लढविण्यासाठी राहुल गांधी यांनी मान्यता दिली. सायंकाळी उशिरापर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या युतीसंदर्भात बोलणी चालू होती.
गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई व विनोद पालयेकर तसेच अपक्ष आमदार प्रसाद गावकर यांच्याशी फलदायी चर्चा झाली. गोव्यात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी काँग्रेस पक्षाला पूर्ण पाठिंबा देण्याचे ठरविले आहे. त्यांच्या पाठिंब्यासाठी मला आनंद होत आहे.
- राहुल गांधी, काँग्रेस नेते
माझे सहकारी प्रसाद गावकर आणि विनोद पालयेकर यांच्यासह राहुल गांधी यांची आज भेट घेतली. भाजप सरकारला घरी पाठविण्यासाठी गोवेकरांच्यावतीने एकत्रित लढण्याचा निर्णय घेण्यात आला.
- विजय सरदेसाई, आमदार
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.