पणजी: काँग्रेसने अद्याप युतीबाबत फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. युतीत सहभागी होण्यास इच्छुक असलेल्या गोवा फॉरवर्ड आणि रिव्हॉल्युशनरी गोवन्स (आरजीपी) या पक्षांच्या नेत्यांनीही काँग्रेसला आधीच बांधून घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यास पुढाकार घेतलेला नाही. त्यामुळे काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि आरजीपी या तीन पक्षांतील युतीसंदर्भात गोंधळाचे वातावरण आहे.
काँग्रेसने युतीवर शिक्कामोर्तब न करताच मंगळवारी अकरा उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आरजीपीचे अध्यक्ष मनोज परब भडकले आहेत. ‘‘तिन्ही पक्षांच्या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आली होती. युतीवर शिक्कामोर्तब झाल्यानंतरच उमेदवार जाहीर करण्याचा निर्णय आपल्या काँग्रेससोबतच्या बैठकीत झालेला होता.
तरीही काँग्रेसने आम्हाला अंधारात ठेवून उमेदवार जाहीर केल्यामुळे आश्चर्याचा धक्का बसला. या घडामोडींसंदर्भात आरजीपीच्या कोअर समितीची बैठक बुधवारी सायंकाळी होणार आहे. त्यात चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाईल’’, असे मनोज परब यांनी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.
‘‘२०२२ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीपासून गोवा फॉरवर्डची काँग्रेससोबत युती आहे. लोकसभा निवडणुकीतही आम्ही काँग्रेसला पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे आमची काँग्रेससोबत युती राहील’’, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष तथा आमदार विजय सरदेसाई म्हणाले.
गोवा फॉरवर्डच्या उमेदवारांची घोषणा गुरुवारी दत्त जयंतीच्या मुहुर्तावर करण्याची मागणी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. त्यामुळे आम्ही गुरुवारी आमच्या पक्षाचे उमेदवार जाहीर करणार आहोत, असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.
काँग्रेसने सोमवारी रात्री उशिरापर्यंत बैठक घेऊन जिल्हा पंचायत निवडणुकीसंदर्भातील व्यूहरचना आखली. त्यात त्यांनी गोवा फॉरवर्डसोबत युती करण्याचे निश्चित केले आहे. सोबतच आरजीपीसोबतही युती करण्याचे ठरवले आहे.
गेल्या जि.पं. निवडणुकीत काँग्रेसने ज्या जागा जिंकल्या होत्या, त्या जागा युतीतील पक्षांना सोडल्या जाणार नाहीत. शिवाय गत विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ज्या जागा जिंकल्या होत्या, तेथेही समझोता होणार नाही. परंतु, विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या मतदारसंघांतील अशा काही जागा आहेत, त्या काँग्रेस आरजीपीला सोडण्यास तयार आहे. तरीही तडजोड होत नसल्यास आरजीपीशी काही मतदारसंघांत मित्रत्वाच्या लढती होऊ देण्यास मान्यता देण्यात आली आहे.
विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि आमदार एल्टन डिकॉस्टा यांना याबाबत आरजीपीशी चर्चा करण्यास सांगण्यात आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.
‘‘जिल्हा पंचायत निवडणुकीत केवळ भाजपला पराभूत करण्यासाठीच आपण काँग्रेस आणि गोवा फॉरवर्ड या पक्षांशी युती करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार चर्चा होऊन जागा वाटपही अंतिम टप्प्यात आलेले होते. अशा अवस्थेत काँग्रेसने आम्हाला विश्वासात न घेता उमेदवार जाहीर केल्याने आरजीपीच्या कार्यकर्त्यांत कमालीची निराशा पसरली आहे. त्यामुळेच बुधवारी सायंकाळच्या बैठकीत अंतिम निर्णय घेऊन लगेचच उमेदवारांची घोषणा करण्यात येईल’’, असेही मनोज परब यांनी सांगितले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.