Colva Police: महिलेनेही अधिकृत तक्रार दिली असून खात्‍यांतर्गत चौकशी सुरू आहे
Goa Police  Dainik Gomantak
गोवा

Goa Police: केसांना धरून ओढले, बूट चाटायला लावले, लाथांनी मारहाण केली!

गोमन्तक डिजिटल टीम

आल्‍विरा आल्‍मेदा नावाच्‍या एका महिलेला अमानुष मारहाण करून तिला बूट चाटायला लावणाऱ्या कोलवा येथील त्‍या उपनिरीक्षकाचे नाव विभिनव शिरोडकर असे असून त्‍याला त्‍वरित निलंबित करावे, अशी मागणी बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी केली आहे. आज दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांची भेट घेऊन त्‍यांनी सर्व घटनाक्रम कथित केला.

त्‍या महिलेनेही या उपनिरीक्षकाविरोधात अधिकृत तक्रार दिली असून त्याची खात्‍यांतर्गत चौकशी सुरू केली आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक सावंत यांनी दिली. शिरोडकर याने आधी त्‍या महिलेच्या केसांना धरून ओढले, तसेच तिला लाथांनी मारहाण केली. नंतर तिला गुडघ्‍यावर बसवून आपले बूट चाटायला लावले, असे या तक्रारीत म्‍हटले आहे.

मिळालेल्‍या माहितीनुसार, ही मारहाणीची घटना काल झालेली नसून आठ दिवसांपूर्वी झाली होती. त्‍या महिलेच्‍या दाव्‍याप्रमाणे, १९ जून रोजी उतोर्डा जवळ एका ट्रकने तिचा पती चालवत असलेल्‍या कारला धडक दिल्‍यानंतर त्‍यांच्‍यात वादावादी झाली. त्‍यावेळी ट्रकचालकाने कोलवा पोलिसांना फोन करून त्‍यांना जागेवर बोलावून घेतले.

कोलवा पोलिसांचे पथक घटनास्‍थळी पोचल्‍यावर उपनिरीक्षक शिरोडकर यांनी त्‍या महिलेच्‍या पतीला घटनास्‍थळी बोलावून घेतले आणि त्‍याला बेदम मारहाण केली. त्यावेळी रात्रीचे १२ वाजून गेले होते. या मारहाणीत दोघा पोलिसांचा हात होता.

पीडित महिलेच्‍या दाव्‍यानुसार, तिचा पती मधुमेहाचा रुग्‍ण असून पोलिसांच्‍या मारहाणीमुळे तो बेशुद्ध पडला. त्‍यावेळी ती महिला पतीच्‍या जीवाची भीक मागण्‍यासाठी शिरोडकर यांच्‍याकडे येऊन दया-याचना करू लागली; पण तो उपनिरीक्षक रागाने बेभान झाला होता. त्‍याने तिच्‍या गळ्याला पकडून मारहाण करण्‍यास सुरुवात केली.

मारहाणीचा हा प्रकार पहाटे २ वाजेपर्यंत सुरू होता. त्‍यानंतर जिथे अपघात झाला होता, ती जागा वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत येत असल्‍यामुळे वेर्णा पोलिसांना बोलावून घेण्‍यात आले. पोलिसांनी त्‍या पती-पत्‍नीला ताब्‍यात घेऊन वेर्णा पोलिस स्‍थानकावर आणले.

पोलिसांच्‍या मारहाणीमुळे अत्यवस्थ झालेल्‍या तिच्‍या पतीला पहाटे ५ वाजण्‍याच्‍या सुमारास मडगाव इस्‍पितळात आणले. त्‍यावेळी त्‍या महिलेलाही तिथे आणले. मात्र, हॉस्‍पिटलातील डॉक्‍टरांनी फक्‍त पतीचीच तपासणी केली. माझी तपासणी केलीच नाही, असे त्‍या महिलेने तक्रारीत म्‍हटले आहे.

पीडितेची याचना : माझ्या पतीला वाचवा

पीडित महिला ‘माझ्या पतीचे प्राण वाचवा’, अशी याचना त्या उपनिरीक्षकाकडे करीत होती. मात्र, रागाने बेभान झालेल्‍या त्‍या उपनिरीक्षकाने तिलाही बेदम मारहाण केली. एवढेच नव्‍हे, तर तिला गुडघ्‍यावर बसायला सांगून पतीच्‍या प्राणाची भीक हवी असेल, तर माझे बूट चाटून माफी माग, असे सांगितले. अखेर नाईलाजाने पतीच्‍या प्राणासाठी तिने त्‍या उपनिरीक्षकाचे बूट चाटायलाही मागे-पुढे पाहिले नाही.

महिलेला रात्री ताब्यात कसे घेतले?

बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी पाेलिसांच्‍या या कृतीचा निषेध करताना, जर त्‍या दोघांनी गुन्‍हेगारी कृत्‍य केले असते तर पाेलिसांना त्‍यांना अटक करता आली असती. त्‍यांना मारहाण करण्‍याची काय गरज होती, असा सवाल केला. नियमानुसार रात्रीच्‍यावेळी महिलांना ताब्यात घेता येत नाही. असे असतानाही त्‍या महिलेला ताब्‍यात घेऊन रात्रभर वेर्णा पोलिस स्‍थानकात बसवून ठेवले.

कोलवा पोलिस वेर्णात काय करतात?

हा कथित गुन्‍हा वेर्णा पोलिस स्‍थानकाच्‍या हद्दीत घडला असताना कोलवा पोलिस तिथे काय करत होते, याची कसून चाैकशी झाली पाहिजे. कोलवाचे पोलिस उपनिरीक्षक विभिनव शिरोडकर याने त्‍या महिलेला बेदम मारहाण करत बूट चाटायला लावले, याचा तपशील बाणावलीचे आमदार वेंझी व्‍हिएगस यांनी दक्षिण गोव्‍याच्‍या पोलिस अधीक्षक सुनीता सावंत यांच्‍यासमोर मांडला. तसेच या अधिकाऱ्याला त्‍वरित निलंबित करा, अशी मागणी केली.

आवदा व्‍हिएगस, अध्‍यक्ष, बायलांचो एकवोट

एका बाजूने लोकांना न्‍याय मिळावा, यासाठी केंद्र सरकार कायदा बदलते आणि दुसऱ्या बाजूने कायद्याचे रक्षक असलेले पोलिस महिलांना आधार द्यायचा सोडून अमानुष मारहाण करतात. ही प्रवृत्ती अमानुष तर आहेच, शिवाय ही गुंडगिरीही आहे. अशा पोलिसांवर त्‍वरित कारवाई केली तरच महिला आणि बालकांना याेग्‍य तो न्‍याय मिळेल.

पोलिस सूत्र म्‍हणतात...

पोलिसांच्‍या दाव्‍यानुसार, या महिलेचा पती सराईत गुंड असून तो लोकांकडून खंडणी वसूल करायचा. या अपघात प्रकरणातही त्‍याने त्‍या ट्रकवाल्‍याकडून ५० हजार रुपयांची खंडणी मागितली होती. त्‍यामुळेच त्‍या ट्रकवाल्‍याने कोलवा पोलिसांना फोन करून घटनास्‍थळी बोलावून घेतले. यावेळी त्‍या महिलेच्‍या पतीने गोंधळ घालण्‍यास सुरुवात केल्‍याने त्‍याला पोलिसांनी नव्‍हे, तर लोकांनी मारहाण केली. नंतर वेर्णा पोलिसांना बोलावून त्‍या दोघा पती-पत्‍नीला त्‍यांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले, असे सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Todays Live Update: चिखलीत इनडोअर स्टेडियमची भिंत कोसळली

Nilesh Cabral: निलेश काब्राल यांचा थेट CM पदावरच डोळा?; मंत्रिमंडळ फेररचनेच्या पार्श्वभूमीवर मोठे विधान

Goa Rain Update: राज्यात पावसाचा हाहाकार! कुशावती नदीची पातळी वाढली; पारोडा रस्ता दुसऱ्या दिवशीही पाण्याखाली

Mumbai Goa Highway: निवारा शेडविना प्रवाशांचे हाल; पेडणे तालुक्याची समस्या

Goa Red Alert: गोव्यात आज 'रेड' तर उद्या 'ऑरेंज अलर्ट', 2-3 तासात मुसळधार पाऊस; नागरिकांना सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT