Khari Kujbuj Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; कंडक्टरला स्वप्न ‘कदंबा’च्या ‘डीटीओ’ पदाचे!

Khari Kujbuj Political Satire: प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी राज्यातील बाराशे भाविकांना घेऊन गेलेली रेल्वे परत कधी येते, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Sameer Panditrao

कंडक्टरला स्वप्न ‘कदंबा’च्या ‘डीटीओ’ पदाचे!

काही वर्षांपूर्वी कदंब महामंडळात सावंत नामक व्यक्तीला कंडक्टरची नोकरी मिळण्यात ‘सु’यश आले. पण सावंत तसे हुशार. त्यांनी कधी बसमध्ये जाऊन तिकीट मारले नाही की, शिट्टी फुंकली नाही. सावंतनी तत्कालीन जीएम घाटेंचा विश्वास संपादन केला. पण कंडक्टरपद सोडून मुख्यालयात शिपाईपद स्वीकारले यामागे सावंतांचा महत्वाकांक्षीपणा होता. नंतर घाटेंनी त्याची नेमणूक कारकूनपदी केली, पुढे अनेकांना प्रसाद देत तीन स्टारची नोकरी मिळवली. कदंबात ‘डीटीओ’ पद (डिव्हिजनल ट्रॉफिक ऑफिसर ड्युटी) बरीच वर्षे रिक्त आहे. अधूनमधून सावंतांनी या ‘डीटीओ’ पदाचा ताबा घेतल्याने त्यांना या खुर्चीचा मोह झालाय, अशी चर्चा आहे. आपली ‘डीटीओ’ पदाची वाट मोकळी व्हावी म्हणून सध्या मडगाव कदंब डेपोतून पर्वरी येथे कदंब डेपोत तात्पुरत्या ‘डीटीओ’ पदावर आलेल्या व्यक्तीला रिक्त असलेले उप वाहतूक व्यवस्थापकपद दाखवून आपले ‘डीटीओ’ पद निश्‍चित करण्याचे सावंतांनी प्रयत्न सुरू ठेवलेत. एरवी एकेक पायरी चढत सावंतांनी आपले लक्ष्य साध्य केलेय.आता बघू ‘डीटीओ’ पदापर्यंत सावंत यांना ‘सु’यश येते का ते. ∙∙∙

‘ती’ रेल्वे कधी येणार?

प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यासाठी राज्यातील बाराशे भाविकांना घेऊन गेलेली रेल्वे परत कधी येते, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. तेथे सोय होते की गैरसोय याचे अनुभव ऐकून पुढील फेरीचे नियोजन करावे लागणार आहे. सरकारने प्रयागराजच्या अलिकडे अडीच किलोमीटरपर्यंतच जबाबदारी घेतली असली तरी प्रत्यक्षात कुंभमेळ्याच्या ठिकाणी गैरसोय होत असल्यास पुढील फेरीच्यावेळी काय मदत करता येईल, याचा विचार करण्यासाठी गेलेली रेल्वे परत कधी येणार याची प्रतीक्षा आहे. रेल्वेत खानपानाची व्यवस्था सरकारने केली आहे. त्याचा अनुभव कसा होता ते जाणून घेण्यासही सरकारचे अधिकारी उत्सुक आहेत. थोडक्यात काय कुंभमेळ्याचा अनुभव जाणून घेण्यासाठी सारेच आतुर झाले आहेत. ∙∙∙

बाबूश काय कारवाई करणार?

पणजी मनपा मार्केटमध्ये काही दिवसांपूर्वी महसूल मंत्री तथा आमदार बाबूश मोन्सेरात यांनी आयुक्त क्लेन मेदेरा, मनपा मार्केट समिती अध्यक्ष बेंतो लॉरीन व अधिकाऱ्यांना घेऊन भेट दिली. त्याचबरोबर तेथील समस्याही जाणून घेतल्या. अनेक दुकानदार सोपोच्या जागेत साहित्य विक्रीचा साठा करून ठेवत असल्याने म्हणे त्यावर कारवाई केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे काहीजणांच्या नावे चार-पाच सोपो असल्याचेही म्हणे आता मोन्सेरात यांच्या लक्षात आणून दिले गेले. त्यामुळे कित्येक वर्षांपासून महापालिकेची सत्ता सांभाळणाऱ्या बाबूश मोन्सेरात यांना मार्केटमध्ये काय चालले हे माहीत नसावे, याबद्दल विक्रेते आश्चर्य व्यक्त करताहेत. मार्केटमधील दुकानगाळे आपल्या बगलबच्च्यांनी एका रात्रीत दमदाटी करून कसे ताब्यात घेतले, याची माहिती अधिकाऱ्यांनी त्यांच्या कानी घातली असेल का, याचीही चर्चा आता सुरू झाली आहे. ∙∙∙

रवींचा ‘शिमगोत्सव’

फोंड्याचे पात्रांव सगळ्यात जास्त कुठल्या उत्सवात रंगत असतात तर ते म्हणजे शिमगोत्सवात. ते मुख्यमंत्री असताना १९९१ साली त्यांनीच हा उत्सव राज्यपातळीवर नेला होता. त्यामुळे या उत्सवाबद्दल त्यांना भलताच जिव्हाळा. म्हणूनच तर या उत्सवाची सुरुवातही फोंड्यापासूनच होते. रवी बाबांचा उत्साह तर त्यावेळी अगदी बघण्यासारखा असतो. हा उत्सव साजरा करण्याकरता त्यांनी अंत्रुज शिमगोत्सव समितीही स्थापन केली आहे. मध्यंतरी रवी आमदार नसताना राजकारण होऊन या उत्सवाचे आयोजन रवी विरोधी गटाकडे गेले होते. त्यावेळी रवी बरेच दुखावल्यासारखे झाले होते. पण आता हे आयोजन परत अंत्रुज समितीकडे आल्यामुळे रवींचा उत्साह दुणावल्यासारखा झाला आहे. त्यामुळेच असेल पण समितीचा हॉल असूनसुद्धा शिमगोत्सवाच्या बैठका त्यांनी आपल्या कार्यालयात घ्यायला सुरुवात केली आहे. आता बोला.. ∙∙∙

दामूंची नजर

विधानसभा अधिवेशनाआधी झालेल्या आमदार मंत्र्यांच्या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी विधिमंडळ कामकाजाविषयी सूचना केल्या होत्या. त्याची अंमलबजावणी होते की नाही, यासाठी त्यांनी खास नजर ठेवली होती. शुक्रवारी सकाळी सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांना सोबत घेऊन दामू यांनी विधिमंडळ संकुलात फेरफटका मारला. हसत हसत पत्रकारांशी संवाद साधताना बऱ्याच गोष्टी नकळतपणे जाणून घेतल्या. दामू हे दिल्लीला लेखी अहवाल पाठवत असतात. त्याचा धसका अनेकांनी घेतला आहे. शिस्त लावण्यासाठी थोडी मास्तरकी सध्या त्यांना करावी लागत आहे. विधानसभेचे दोन दिवसाचे अधिवेशन असले तरी त्याच्या कामकाजाचा आढावाही त्यांनी घेतला आहे. सार्वजनिकरीत्या त्यांनी याविषयी भाष्य केले आहे. ∙∙∙

‘साबांखा’ची तत्परता

साबांखा हे भारतीय रेल्वेसारखे प्रचंड विस्तार असलेले गोवा सरकारचे खाते. त्याचे विभाग व उपविभाग किती याची माहिती ते सांभाळणा-या मंत्र्यालाच नसते, असे पूर्वी म्हटले जायचे.आता त्या खात्याचा भार खुद्द मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने म्हणे तो मुद्दा उपस्थित नाही. तर अशा या खात्याला भारतीय स्टेट बॅंकेकडे असलेल्या पणजीतील इमारतीचे भाडे गेली पंचवीस वर्षे वाढविलेले नाही हे कळावे याबाबत अनेकांना नवल वाटले कारण.खासगी जागेत असलेली सरकारी कार्यालये एका छताखाली यावीत म्हणून सरकारने आपली संकुले अनेक ठिकाणी उभारली पण तरीही अजून अनेक कार्यालये भाड्याच्या जागेत आहेत. तेवढ्याने भागत नाही तर अनेक खाती नवीन आलीशान जागेत हलविली जात आहेत.खुद्द पणजीत पाटोवरील नव्या आलिशान इमारतीत ती स्थलांतरीत होत आहेत. साबांखा अशा प्रकारांबाबत मात्र गप्प आहे.त्या बद्दल नेटकरी टिप्पणी करताना त्यामागे कोणाला कमिशन तर जात नाही ना असा सवालही करत आहेत. मडगावात नवे जिल्हा संकुल उभारूनही अनेक अशी कार्यालये खासगी इमारतीत भाडे का भरत आहेत. त्या मागे कोणाचे हित आहे असा सवाल हल्लीच सार्वजनिक जीवनात सक्रिय झालेले युवानेते करत आहेत. पण त्यांना उत्तर देण्याच्या फंदात कोणी पडत नाहीत हीच खरी गोम असल्याचे मानले जाते. ∙∙∙

‘दोस्‍त अंकल’च्‍या मुळापर्यंत पाेलिस जातील?

लहान मुलांवर अत्‍याचार करणाऱ्या फ्रेडी पिट्‌सचा नवीन अवतार असण्‍याची शक्‍यता असलेल्‍या पॉल फोन्सेका याला कोलवाळ पाेलिसांनी अटक केली आहे. थिवी रेल्‍वे स्‍थानकावर एका ११ वर्षीय मुलाबरोबर असताना पोलिसांनी त्‍याला पकडले होते. प्राप्त माहितीप्रमाणे, हा संशयित परप्रांतीय मुलांना हेरून त्‍यांना आपल्‍याकडे वश करायचा. या मुलांमध्‍ये तो ‘दोस्‍त अंकल’ म्‍हणून परिचित होता. आणि त्‍याने कित्‍येक मुलांवर असे अत्‍याचार केल्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जाते. फ्रेडी पिट्‌स प्रकरणात पोलिसांनी सुरुवातीला तपास शिथिल केला होता. पण नंतर खोलात जाऊन तपास केल्‍यानंतर या प्रकरणात एक आंतरराष्‍ट्रीय रॅकेट असल्‍याचे उघडकीस आले होते. त्‍यामुळे आता याही प्रकरणाकडे पोलिसांना गंभीरतेने पहावे लागेल. पोलिस या प्रकरणाचा छडा लावू शकतील का?, अशी विचारणा होत आहे. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

Goa LPG Advisory: एलपीजी ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; गोवा सरकारकडून अ‍ॅडवायझरी जारी

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

IND Vs ENG: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये टीम इंडियाने रचला इतिहास, परदेशी भूमीवर केली दमदार कामगिरी; कांगारुंचा मोडला रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT