Goa Politics: महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, भ्रम आणि वास्तव

Goa Opinion: पुढील भवितव्याचा विचार करून मगो नेत्यांनी धर्मांध हिंदुत्ववादी संघटनांशी असलेले संबंध तोडले पाहिजेत व गोव्यातील बहुजन समाजाच्या सर्वांगीण हितासाठी द्रमुकप्रमाणे आत्मसन्मान चळवळ उभारली पाहिजे.
Bhausaheb Bandodkar, MGP Goa
Bhausaheb Bandodkar, MGP GoaDainik Gomantak
Published on
Updated on

दत्ता दामोदर नायक

महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने मराठी ही गोव्याची भाषा व कोकणी ही मराठीची बोली आणि गोव्याचे महाराष्ट्रात विलीनीकरण व्हावे, अशा भूमिका घेतलेल्या होत्या. तरी हा पक्ष मराठीधार्जिणा व महाराष्ट्रवादी होता असे समजणे हा एक भ्रम आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा गोव्याच्या स्वातंत्र्यानंतर गोव्यातील बहुजन समाजाचे हितरक्षण करणारा प्रागतिक पक्ष होता हे खरे वास्तव आहे.

हिंदूबहुल मतदारसंघांत हा पक्ष निवडून येत असला तरी भाऊसाहेब बांदोडकर, शशिकलाताई काकोडकर, काशिनाथ जल्मी, रमाकांत खलप या मगो नेत्यांनी भारतीय जनता पक्षाप्रमाणे धार्मिक मूलतत्त्ववादाची कास धरली नाही. अल्पसंख्याकांचा विद्वेष केला नाही.

१९६३मध्ये झालेल्या गोव्याच्या विधानसभेत उभे राहिलेले काँग्रेसचे व युनायटेड गोवन्स पक्षाचे बहुसंख्य उमेदवार हिंदू किंवा ख्रिश्चन सारस्वत होते. काँग्रेस व युगो पक्ष सत्तेवर आला असता तर जॅक सिक्वेरा किंवा पुरुषोत्तम काकोडकर यांनी गोव्यात मुंडकार कायदा व कूळकायदा अमलात आणला नसता. पांडुरंग मुळगावकर व माधव बीर हे दोन नेते सोडल्यास काँग्रेसचे बहुतेक नेते ब्राह्मणी मनोवृत्तीचे होते.

गोवा विधानसभेच्या पहिल्यावहिल्या निवडणुकीत मगो पक्षाच्या बहुजन समाजातून आलेल्या उमेदवारांनी काँग्रेस व युगो पक्षाचा पराभव केला हा काव्यगत न्याय (पोएटिक जस्टिस) होता. बांदोडकरांची ओपिनियन पोलातली राजकीय भूमिका चुकलेली असली तरी त्यांनी ओपिनियन पोलचा निर्णय स्वीकारला व विधानसभेत बहुमत असूनही मराठी ही गोव्याची राजभाषा केली नाही. बांदोडकरांवर उठसूठ टीका करणाऱ्यांनी हे विसरता कामा नये.

भाऊसाहेब बांदोडकरांनी आपल्या कारकिर्दीत प्राथमिक शिक्षणाचे लोकशाहीकरण, कला अकादमीची स्थापना, साळावली धरण, बोंडला अभयारण्य, आय.डी.सी. व ई.डी.सी. या औद्योगिक विकासाला आवश्यक असलेल्या सरकारी आस्थापनांची स्थापना, जुवारी अ‍ॅग्रो, एम.आर.एफ., सिबा गायगी हे औद्योगिक प्रकल्प, संजीवनी साखर कारखाना असे अनेक लोकोपयोगी प्रकल्प राबवले. यातला सहकारी साखर कारखाना काढण्याचा निर्णय चुकला, तरी अन्य सर्व निर्णय गोव्याच्या दीर्घकालीन हिताचे होते.

बाणावली या ख्रिश्चनबहुल मतदारसंघात मगो पक्षाचे उमेदवार लुता फेर्रांव यांचा विजय ही मगो पक्षाच्या इतिहासातील फार महत्त्वाची घटना होती.

भाऊसाहेब बांदोडकरांनंतर मुख्यमंत्री झालेल्या शशिकलाताई काकोडकरांनी बाणावली विजयातले राजकीय इंगित ओळखून हिंदू व ख्रिश्चन मुंडकार व कुळांचा हित पाहणारा, हिंदू - ख्रिश्चन बहुजनांना आत्मसन्मान देणारा प्रागतिक राजकीय पक्ष अशी मगो पक्षाची प्रतिमा जाणीवपूर्वक उभी करायला हवी होती. मराठी व महाराष्ट्रवादाचे पालुपद टाळून गोव्याची लोकभाषा कोकणीचा रास्तपणे स्वीकार केला पाहिजे होता व तामिळनाडूतल्या द्रमुक पक्षाप्रमाणे बहुजनवादी स्थानिक पक्ष उभारायला हवा होता.

शशिकलाताईंनी हे केले नाही ही त्यांची घोडचूक होती. मगो पक्षात डॉ. काशिनाथ जल्मी, अ‍ॅड. अमृत कासार, अ‍ॅड. रमाकांत खलप असे कर्तृत्ववान नेते होते. या नेत्यांना सांभाळून घेतले पाहिजे होते. तामिळनाडूतील राजकारणाचा कित्ता गिरवून मगो पक्षाची उभारणी केली असती तर मगो पक्ष आजही सत्तारूढ झाला असता.

पुढे ढवळीकर बंधूच्या हाती मगो पक्षाची सूत्रे आली. ढवळीकर बंधूपुढे आजही पर्याय आहे. तो एक तर पक्षावर एका कुटुंबाची हुकूमत ठेवून एक, दोन आमदार निवडून आणण्यापुरती व भाजप आघाडीत सामील होऊन सत्तेची फळे चाखायची हा मर्यादित हेतू किंवा मगो पक्षाला सर्वसमावेशक स्थानिक पक्ष बनवून भारतीय जनता पक्षाला आव्हान द्यायचे हा आहे.

Bhausaheb Bandodkar, MGP Goa
MGP Goa: फोंडा पालिका अविश्‍वास ठरावात 'मगो' पक्षाचा हात नाही; अनंत नाईकांचे परखड मत

गोमंतकीय मतदार भाजप पक्षाच्या शिथिल व भ्रष्टाचारी कारभाराला कंटाळले आहेत. नवसंजीवनी मिळालेल्या मगो पक्षापुढे ही सुवर्णसंधी आहे. मगो, गोवा फॉरवर्ड, आर.जी. व काँग्रेस ही आघाडी पुढील निवडणुकीत सत्तेवर येऊ शकते. त्यावेळी मगो नेते सुदिन ढवळीकर हे रास्तपणे मुख्यमंत्रिपदावर अधिकार सांगू शकतात. या पार्श्वभूमीवर भाऊसाहेब बांदोडकर किंवा मगो पक्षावर एकांगी टीका करण्यापेक्षा मगो पक्षाच्या नेतृत्वापुढे सकारात्मक पर्याय ठेवला पाहिजे.

आज मगो पक्ष ही भाजपची ‘बी’ टीम बनलेली आहे. भाजप पक्षापेक्षा वेगळा राजकीय अजेंडा मगो पक्षापुढे नाही. पुढील भवितव्याचा विचार करून मगो नेत्यांनी धर्मांध हिंदुत्ववादी संघटनांशी असलेलेे संबंध तोडले पाहिजेत व गोव्यातील बहुजन समाजाच्या सर्वांगीण हितासाठी द्रमुकप्रमाणे आत्मसन्मान चळवळ (Self-Respect Movement) उभारली पाहिजे.

Bhausaheb Bandodkar, MGP Goa
Goa Opinion: ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’चा पाठलाग करण्याव्यतिरिक्त पोलिसांकडे चांगले काम शिल्लकच नाही का??

बांदोडकरांनी द्रमुक नेत्यांप्रमाणे ब्राह्मण ज्ञातीचा द्वेष केला नाही. खुद्द ढवळीकर बंधू ज्ञातीने ब्राह्मण आहेत पण सुदिन आणि दीपक ढवळीकरांची राजकीय प्रतिमा ब्राह्मणी नाही. बहुजन समाजाला हे नेते जवळचे वाटतात. त्यामुळेच मडकई, प्रियोळ यांसारख्या बहुजनबहुल मतदारसंघातून ते निवडून येतात हे राजकीय वास्तव आहे.

महाराष्ट्रवादी पक्षासंबंधीची चर्चा गोव्याच्या राजकीय व्यासपीठाच्या मधोमध आली आहे. या चर्चेला विधायक वळण देणे ही काळाची गरज आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com