Goa Cleanliness Drive in Government Offices
पणजी: मुख्यमंत्र्यांनी सरकारी कार्यालयांसाठी स्वच्छता स्पर्धा जाहीर केल्यानंतर साचून राहिलेल्या फाईल्स हटवणे सुरु झाले आहे. सचिवालयात आज अशा फाईल्स हटवण्याचे काम जोरात करण्यात येत होते. या कार्यालयांची पाहणी करण्यासाठी १९ पथके नेमण्यात आली आहेत.
पंचायत संचालक सिद्धी हळर्णकर यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यभरात पथके स्थापन केली आहेत. गटविकास अधिकारी, सहायक अभियंता व कनिष्ठ अभियंता यांचा या पाहणी समितीत समावेश आहे. कार्यालयातील फर्निचरची मांडणी, एकंदरीत स्वच्छता, दैनंदिन कचऱ्याच्या विल्हेवाटीची व्यवस्था, स्वच्छतागृहांची स्वच्छता, कार्यालय परिसरातील स्वच्छता आदी निकषांवर ५० गुणांची ही स्पर्धा आहे.
५ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ही पथके सरकारी, सरकारी महामंडळे, स्वायत्त संस्था यांच्या कार्यालयांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत. ही पथके १० नोव्हेंबरपूर्वी पंचायत संचालनालयाला आपला अहवाल सादर करतील. त्यातून तालुकावार स्वच्छ कार्यालयाची निवड केली जाणार आहे.
निवड झालेल्या कार्यालयांना मुक्तीदिन सोहळ्यात गौरविण्यात येणार आहे. तसे परिपत्रक पंचायत संचालनालयाने आज जारी केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.