Khari Kujbuj Political Satire Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: खरी कुजबुज; कामतांची उडाली झोप!

Khari Kujbuj Political Satire: गेले काही महिने थंड गोळा बनून राहिलेल्या काँग्रेस पक्षात अचानक चैतन्य निर्माण झाल्याची दखल सत्ताधारी भाजपने घेतली आहे.

Sameer Panditrao

कामतांची उडाली झोप!

मडगावमध्ये युवा उद्योजक चिराग नायक काँग्रेस पक्षात आल्यावर त्यांना उमेदवारी मिळाल्यास आपले काय होईल, या चिंतेने दिगंबर कामत यांना निश्चित पछाडले आहे व त्यांची झोप उडाली असल्यास नवल नाही. दिगंबर कामत यांच्याकडे आता धावपळ करण्याची ताकदही नाही. गेल्या विधानसभा निवडणुकीत ते दिसलेलेही आहे. त्यांच्याकडे काँग्रेसने नेतृत्व सोपवले होते; परंतु कामत आपला मतदारसंघ सोडून प्रचारासाठी कुठेच गेले नाहीत, सारे त्यांनी ‘ईश्वर भरोसे’ ठेवले. परिणामी काँग्रेस पक्षाला १३-१४ जागांवर समाधान मानावे लागले. कामत यांच्या या राम भरोसे कार्यशैलीमुळे काँग्रेस पक्षाच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला. आताही मंत्रिपद मिळण्याची ते वाट पाहात आहेत. मंत्रिपदाचा उजेड नसला तर आपले काही खरे नाही याचा अंदाज त्यांना आलाच असेल... आणि अल्पसंख्याक त्यांच्याबरोबर नाहीत हे लोकसभा निवडणुकीत दिसलेलेच आहे! ∙∙∙

राजकीय परिणामांकडे लक्ष

गेले काही महिने थंड गोळा बनून राहिलेल्या काँग्रेस पक्षात अचानक चैतन्य निर्माण झाल्याची दखल सत्ताधारी भाजपने घेतली आहे. कॅप्टन विरियातो फर्नांडिस अचानक क्रियाशील बनले आहेत. उत्तर गोव्यात शिरगावपासून कळंगुट व पेडणे येथे त्यांनी दिलेली भेट ही बातमी बनली. तेथे त्यांनी आमदार मायकल लोबोंना काँग्रेस पक्ष उमेदवारी देणार नाही, ही घोषणा केली. त्यामुळे कळंगुटच्या मतदारांमध्ये स्पष्ट संदेश गेला की काँग्रेस पक्षातील अंतर्गत द्वंद्व संपून विरियातो यांना स्पष्ट नेतृत्व प्राप्त झाले, तर हा पक्ष संघटनात्मकरित्या मजबूत बनू शकतो. त्यात मडगावमध्ये उद्योजक चिराग नायक यांचा प्रवेश झाला. याचा परिणाम केवळ मडगावमध्ये नाही, तर संपूर्ण दक्षिण गोव्यावर झाला आहे. भाजप १५ वर्षे सत्तेवर आहे. त्यामुळे प्रस्थापितविरोधी वातावरण आहे, याचीही चिंता भाजपला आहे. लोक चांगले बोलत नाहीत... ∙∙∙

‘ये तो होना ही था...’

जेव्हा दिगंबर कामत यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तेव्हा अनेक कार्यकर्त्यांनी मडगावात भाजप राखण्यासाठी आपल्या जिवाचा आटापिटा केला. पण जेव्हा परत एकदा कामतबाब भाजपमध्ये परतले, तेव्हा ज्यांनी २० ते २२ वर्षे पक्षाचा किल्ला लढवला त्यांनाच पक्षाने दूर केले. अशीच परिस्थिती मडगावात काँग्रेसची झाली आहे. दिगंबरबाब जेव्हा काँग्रेस सोडून भाजपात आले, तेव्हा गत दोन वर्षांत ज्या सावियो बाबाने काँग्रेसचे अस्तित्व राखण्याचा प्रयत्न केला, त्यालाच विश्र्वासात न घेता चिराग नायकला पक्षात प्रवेश दिला. म्हणजेच २०२७ च्या विधानसभेत मडगावमध्ये चिरागबाब काँग्रेसचे उमेदवार हे स्पष्ट झाले. मग सावियोने चिरागच्या पक्ष प्रवेश कार्यक्रमात गैरहजर राहणे म्हणजे ‘ये तो होना ही था...’ आता सावियोची भूमिका काय असेल याकडे तसेच चिराग सर्व काँग्रेसवाल्यांना एकत्रित ठेवण्यासाठी कोणते पाऊल उचलतात याकडे सर्व मडगावकरांचे लक्ष लागले आहे. ∙∙∙

सज्जे कोसळण्‍यासही दिगंबरच कारणीभूत?

सध्‍या काही राजकारण्‍यांमध्‍ये मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना दोष देण्‍याची स्‍पर्धा चालू झाली आहे की काय असे वाटण्याजोगी स्‍थिती निर्माण झालेली आहे. मागच्‍या दोन दिवसांत मडगावात दोन जीर्ण इमारतींची पडझड झाली आणि या दोन्‍ही इमारतींचे सज्‍जे कोसळण्‍यासाठी दिगंबर कामत हेच जबाबदार अशा तऱ्हेची टीका काही राजकारण्‍यांनी करायला सुरुवात केली. वास्‍तविक मडगावातील जीर्ण इमारतींच्‍या बाबतीत आवश्‍‍यक ती उपाययोजना करण्‍यास प्रशासनाला अपयश आले ही गोष्‍ट खरी असली तरी इमारतीचा सज्‍जा कोसळण्‍यासाठीही दिगंबरच जबाबदार अशी टीका करणे म्‍हणजे जरा अतीच झाले असे वाटत नाही का? ∙∙∙

जुन्या इमारतींमागील गोम

मडगावातील एकेक करून जुन्या इमारती धापा टाकू लागल्या आहेत. त्यामुळे लोकांसाठी त्या धोकादायक ठरत असतानाही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. उलट नेते त्या खासगी असल्याने सरकार काही करू शकत नाही अशी भूमिका घेताना दिसत आहेत. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावलेल्या आहेत, पण काहींचे असे म्हणणे आहे की अनेकांचे त्यात हितसंबंध गुंतलेले आहेत. बहुतेक अशा इमारती मोक्याच्या जागी असल्याने संबंधित मंडळी मुद्दाम कोणतीच कारवाई करत नाही. त्या कोसळण्याच्या स्थितीत दिसू लागल्यावर त्यातील भाडेकरू आपणहून त्या सोडून जातील व नंतर त्यांचे पुनःनिर्माण करून बक्कळ पैसा कमावण्याच्या हेतूने तर ही कारवाई टाळली जात नसावी अशी शंका काहींना आहे. अन्य काहींच्या म्हणण्याप्रमाणे आता तेथे नवे बांधकाम करावयाचे झाले तर सेटबॅक सोडावा लागेल व जमीन वाया जाईल म्हणून विकास टाळला जात आहे. नेमके खरे काय रे भाऊ? ∙∙∙

विजेवरील कारची करामत

करंझाळे येथे विजेवर चालणारी कार दुभाजकाला धडकली. मोठा अपघात शनिवारी झाला. यामुळे विजेवरील कारना वजनच कसे नसते. ती कोणीही चालवू शकतो आदी चर्चेला खाद्य मिळाले आहे. पावसात निसरड्या झालेल्या रस्त्यावर कार घसरणे ही सामान्य घटना असतानाही विजेवरील वाहने भरधाव धावतात असाही शोध चर्चा करणाऱ्यांनी लावला होता. पाऊस नसल्याने अनेकांना शनिवारी सायंकाळी घराबाहेर पडता आले होते. त्यातच डोळ्यासमोर अपघात होताना पाहता आल्याने विजेवरील कार या विषयावरील आपल्या शैलीतील पंचनामा जो तो करताना ऐकू आला. ∙∙∙

Baji Pasalkar History

‘रेड अलर्ट’चा फटका

शनिवारची सायंकाळ. जगभरात गाजत असलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर खरी माहिती ऐकायला मिळणार म्हणून अनेकांनी राष्ट्रीय सुरक्षा मंडळाचे सदस्य तिलक देवशेर यांचे व्याख्यान ऐकण्याची तयारी अनेकांनी केली होती. हवामान खात्याने ‘रेड अलर्ट’ जारी केला आणि त्यांचे व्याख्यान रद्द झाले. प्रत्यक्षात शनिवारी आपले ‘रेड अलर्ट’ला साजेशे रूप पावसाने दाखवलेच नाही. त्यामुळे भारत पाकिस्तान संघर्षामुळे देशप्रेमाचे भरते आलेल्यांच्या उत्साहावर तर विरजण पडले होते ते हवामान खात्यावर संतप्त झाले. ईडीसीनेही स्वयंपूर्ण गोवा या विषयावरील परिषदही पावसाची जोरदार हजेरी गृहीत धरून पुढे ढकलला होता. ∙∙∙

छायाचित्राची अशीही चर्चा

महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांचा वाढदिवस. त्यावेळी अनेकजण उपस्थित होते. कित्येकांनी त्यांना केकही भरवला असणार. असे असले तरी सरकारी सेवेतील अक्षय वायंगणकर यांनी भरवलेला केक मात्र आता चर्चेचा ठरला आहे. त्यालाही कारण तसेच ठरले आहे. मोन्सेरात यांना राजकीयदृष्ट्या ललकारत असलेल्या उत्पल पर्रीकर यांनी शुक्रवारी मतदारयादीत नेपाळी लोकांची नावे घुसडण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना पणजीत हटवण्यात आल्याचा आरोप केला आहे. आता नव्याने नेमलेल्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांत वायंगणकर यांचा समावेश आहे. त्यामुळे ते बाबूश यांना केक भरवत असतानाचे हे छायाचित्र शनिवारी मोठे चर्चेचे ठरले.∙∙∙

मडगावात ‘चिराग चिंगारी’

मडगावातील राजकारणात बदलाचे संकेत दिसत आहेत. काल परवापर्यंत दिगंबरांवर कडक शब्दांत खुलेआम टीका करण्याचे धाडस कोणी करत नव्हते. मात्र, आता ते सर्रास होताना दिसत आहे. परवा काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या चिराग दत्ता नायक यांनी कामतांना थेट आव्हान देत शड्डू ठोकला आहे. वेडीवाकडी वळणे न घेता दिगंबर कामतांवर आता मडगावात थेट टीका होणे हेच बदलाचे संकेत आता मडगावकर अनुभवत आहेत. गेल्या दोन भाषणांत चिराग नायक यांनी दिगंबरांवर नाव घेऊन टीका केली याचा संदेश मडगावभर गेला आहे... जर हा आक्रमकपणा टिकून राहिला तरच दिगंबरांना ते आव्हान ठरू शकते‌. ∙∙∙

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT