गोवा अतिशय लहान असल्याने इथे राजकीय कटूता किंवा विभक्तता तेवढी तीव्र दिसत नाही. याचेच एक उदाहरण सावईवेरेच्या प्रसिद्ध अनंत देवस्थानच्या कालोत्सवात दिसून आले. एकेकाळी घनिष्ट मित्र असलेले राजेश फळदेसाई आणि विजय सरदेसाई सख्याहरीला एका चहाच्या टपरीवर चहा आणि भज्यांचा आस्वाद घेताना पहायला मिळाले. राजेश वेरेकर हे देव अनंताचे महाजन तर विजय सरदेसाईंच्या घराण्याचे मूळ सावईवेरे त्यामुळे ते त्यांचे ग्राम दैवत. राजेश वेरेकर आणि विजय सरदेसाई एकत्र चहा टपरीवर भज्यांचा आस्वाद घेतानाचे दृष्य पाहून जुन्या मित्रांचे सख्य लोकांना नव्याने पहायला मिळाले. ∙∙∙
सध्या गोव्यात वेगवेगळी नवीन प्रकरणे उघडकीस आल्यानंतर कॅश फॉर जॉब घोटाळा प्रकरणाचा लोकांना विसर पडू लागला आहे, असे वाटते. वास्तविक लोकांचे लक्ष दुसरीकडे जावे यासाठी पोलिस मुद्दामहून अशी प्रकरणे उघडकीस आणत आहेत, असा आरोप विरोधक करत आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता या एकाच प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्याचे ठरविले आहे, असे सांगितले जाते. लोकांचे लक्ष दुसरीकडे जाऊ नये यासाठी म्हणे काँगेस आणि ‘आप’ पक्षाने आपल्यामधील कुरबुरींनाही काही काळासाठी स्थगिती देण्याचे ठरविले आहे, असे बोलले जात आहे. विखुरलेले विरोधक अशारितीने एकत्र येणार याची कुणाला खात्री आहे, का हो? ∙∙∙
गोवा विधानसभेत सध्या ३ महिला आमदार आहेत. मात्र, यात सगळ्यात ‘ॲक्टीव्ह’ म्हणून डॉ. दिव्या राणेंकडे पाहिले जाते. फक्त महिला आमदारांमध्येच नाही तर पूर्ण ४० आमदारांतही पर्येच्या भाजप आमदार डॉ.दिव्या राणेंचा खूप वरचा क्रमांक आहे. सोमवारी डॉ. राणेंच्या मतदारसंघात खुद्द मुख्यमंत्र्यांच्या हजेरीत अनेक विकासकामांचा शुभारंभ झाला. या कार्यक्रमाला लोकांचीही तुफान गर्दी पहायला मिळाली. डॉ. राणे या विकासकामांच्या बाबतीत अत्यंत बारकाईने ‘फॉलोअप’ घेऊन ते काम पूर्णत्वास नेतात, असे आता फक्त लोकच नाही तर प्रशासनातील अधिकारीही सांगताना दिसतात. एकंदर पाहता पहिल्याच खेपेला आमदार म्हणून निवडून येऊनही डॉ. दिव्या राणेंच्या कामांचा धडाका पाहता त्यांचा रथ सुसाट आहे, एवढं नक्की. ∙∙∙
महसूल मंत्री तथा बाबूश मोन्सेरात हे अपवादानेच कोणाच्या वाढदिवसाला घरी जाऊन शुभेच्छा देत असत. अन्यथा ते समाजमाध्यमात आपल्या अकाऊंटवरून संबंधिताचे छायाचित्र टाकून शुभेच्छा देतात. अलिकडे ते नेत्यांच्या वाढदिवसाला हजेरी लावू लागले आहेत. त्यांच्यात झालेला बदल अनेकांना आश्चर्यकारक वाटत आहे. कदाचित भाजपमध्ये आल्यामुळे हा बदल झाला असल्याचे बोलले जात आहेत. आमदार गणेश गावकर यांच्या वाढदिवसाला त्यांनी त्यांच्या घरी जाऊन शुभेच्छा दिल्या. पक्षाचा आमदार आहे, म्हटल्यानंतर त्यात नवल नाही. मात्र, आता ते काही महत्त्वाच्या कार्यकर्त्यांचे वाढदिवसही लक्षात ठेवतात आणि त्यांना शुभेच्छा देऊ लागले आहेत. काहीजणांना तर फोनवरून यापूर्वी कधीच बाबूश यांनी शुभेच्छा दिल्याचे आठवतही नाही, पण आता त्यांनी शुभेच्छा देण्याचा सुरू केलेला हा उपक्रम कशासाठी आहे, हे अनेकजणांना नक्कीच उमगलेले असणार.∙∙∙
राज्यात सध्या रेती काढण्यावर बंदी असली तरी बिनधास्तपणे रेती काढली जात आहे. ही रेती रात्रीच्यावेळी काढून रात्रीच वाहतूक केली जाते, आणि रेती माफिया बक्कळ पैसे कमवत आहेत. अर्थातच याला सरकारी यंत्रणा सहकार्य करीत असल्याने एकापरीने बेकायदेशीर व्यवसायाला उत्तेजनच मिळत आहे. मोलेतील नदीच्या किनारी रेतीचे ढिगारे काढून ठेवल्यानंतर ही बाब उघडकीस आली खरी, पण दोन दिवसातच हे रेतीचे ढिगारे गायब झाले. आता हे रेतीचे ढिगारे कसे काय गायब झाले, त्याची खमंग चर्चा या परिसरात होताना दिसत आहे. सरकारी यंत्रणेला हाताशी धरल्याशिवाय हे काम शक्य नाही, असाही सूर या चर्चेत व्यक्त होताना दिसला. ∙∙∙
काणकोण तालुक्यांतील आमोणे या आदिवासीबहुल भागांत नुकताच लोकोत्सव दिमाखात पार पडला. सर्वांनी त्याची तोंड भरून स्तुती केली व तशी ती करणे स्वाभाविकही आहे. कारण गेली २४ वर्षे त्याचे आयोजन होत असून त्या सर्वांचे कर्तेकरविते आहेत ते त्याभागाचे आमदार तथा गोवा विधानसभेचे सभापती रमेश तवडकर. दरवर्षी या लोकोत्सवात देशभरातील प्रमुख व्यक्ती उपस्थिती लावतात. यंदा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी त्याला उपस्थित रहातील, असे जाहीर केले होते. पण प्रत्यक्षात ते न आल्याने पश्चिम बगलरस्त्याचे उद्घाटनही अडले. असे सांगतात की, सदर रस्ता सदोष झाला असून अभियांत्रिकी त्रुटी आहेत. त्यामुळे अनेकांनी त्याबाबत म्हणे तक्रारी केल्या होत्या, हा ठेकेदार वजनदार आहे म्हणे. नसती आफत नको, म्हणून तर नितीनजींनी गोवा भेटच टाळली नसेल ना, अशी चर्चा ‘साबांखा’त आहे. ∙∙∙
वकिली क्षेत्रातील एका आमदाराशी संबंधित असलेला ‘मॉर्फ’ केलेल्या व्हिडिओसंदर्भात राज्यात खळबळ उडाली आहे. कोणीही उघडपणे बोलत नाहीत, मात्र काहीजण गटागटाने चर्चा करताना दिसतात. त्यातील सत्य काय यासंदर्भात प्रत्येकजण तर्कवितर्क लढवत आहेत. पोलिसांनी संशयिताला अटक केलीय, मात्र संशयित हा या आमदाराच्या चांगल्या ओळखीचा आहे. या आमदाराला संशयिताने ‘मॉर्फ व्हिडिओ’ व्हायरल करून फसवले आहे की, आमदारच त्यात फसलेत, हाही प्रश्न अनुत्तरीत राहतो. हा आमदार गाफील कसा काय राहू शकतो. हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणचा आहे, याचा शोध घेतल्यास सत्य बाहेर येऊ शकते. मात्र, पोलिसही सखोल तपासाच्या प्रयत्नात नाहीत. संशयित कोठडीत असताना व्हिडिओ व्हायरल झाल्याने त्यामागे अन्य कोणी आहे का, असाही संशय घेतला जात आहे. ∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.