गतवर्षी राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने या प्रकरणात आपण ज्या तिघांची नावे घेतली, त्यांच्यासोबत केलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आपण ज्या मोबाईलमध्ये केले होते, तो मोबाईल आपल्याला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा डिचोली पोलिसांनी जप्त केल्याचे ‘गोमन्तक’ला रविवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. डिचोली पोलिसांनी हा मोबाईल नंतर म्हार्दोळ पोलिसांना दिला. त्यानंतर म्हार्दोळ पोलिस तो मोबाईल पूजाला दिल्याचे म्हणत आहेत. परंतु, तो आपल्याला मिळालेला नाही, असेही पूजाने सांगितले. याबाबत सोमवारी म्हार्दोळचे पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तो मोबाईल पुराव्यांच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्रकरण घडून वर्ष उलटले तरी कोट्यवधींच्या भ्रष्टाचारात अडकलेल्या ‘मोबाईल’चा तपास अजून लॅबकडून झालेलाच नाही का? असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे.∙∙∙
युरी आलेमाव यांनी पहिली निवडणूक सांगेतून राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढवली; पण त्यात त्यांना यश आले नाही. काहीजण म्हणतात की, त्यावेळी एकाच कुटुंबातील अनेकांना दिलेली उमेदवारी त्यांना नडली; पण काही का असेना, नंतर कुंकळ्ळीतून कॉंग्रेसच्या तिकिटावर लढवलेली निवडणूक त्यांना लकी ठरली; कारण ते निवडून आले व थेट विरोधी पक्षनेते बनले व त्या पदाला त्यांनी न्यायही दिला, असे त्यांचे समर्थक म्हणतात. याच युरीबाबांचा वाढदिवस परवा थाटात साजरा झाला. वास्तविक शनिवारी बिहार निवडणूक निकालात कॉंग्रेसला नामुष्की पत्करावी लागली होती; पण त्याचे कोणतेच सावट या वाढदिवसावर दिसले नाही. उलट गोव्यातील झाडून सारे विरोधी नेते (आप वगळता) उपस्थित असल्याने वाढदिवसातून जनतेमध्ये विरोधी ऐक्याचा संदेश जरूर गेला, असे वातावरण तयार झाले. ∙∙∙
कला अकादमीने आयोजित केलेली ५०वी कोकणी नाट्यस्पर्धा नुकतीच आटोपली. स्पर्धा ५०व्या वर्षात पदार्पण करत असली तरी ‘स्वतंत्र नाट्यसंहिता’ हे या स्पर्धेचे नाजूक जागेवरचे दुखणे आहे, हे मात्र ती सिद्ध करूनच गेली. यंदा या स्पर्धेत स्वतंत्र नाट्यसंहितेचे पहिले पारितोषिक कोणालाही दिले गेले नाही आणि विशेष म्हणजे ज्या संहितेला ते यंदा मिळेल, असे स्पर्धेत उत्कृष्टपणे सादर झालेले ते नाटक पाहून अनेक रसिक-प्रेक्षकांना वाटले होते, ती संहिताच इंग्रजी नाटकावरून (त्यातील मूळ दृश्यांबरोबरच) चोरली गेली आहे, हे शेवटच्या क्षणी उघड झाले. त्यामुळे हे नाटकच शेवटी स्पर्धेबाहेर फेकले गेले. स्वतंत्र लेखक म्हणून ‘सर्वायव्ह’ होण्यासाठी आटापिटा करणारा हा लेखक अशाप्रकारे आपल्याबरोबर नाटकालाही घेऊन बुडाला. यापूर्वीदेखील या लेखकाने अशी चौर्यकर्मे केली आहेत, अशी चर्चा होतीच; पण स्पर्धेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षात मात्र त्याच्या कर्माने त्याला दगा दिला.∙∙∙
गतवर्षी राज्यात गाजलेल्या ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरणातील मुख्य आरोपी पूजा नाईक हिने या प्रकरणात आपण ज्या तिघांची नावे घेतली, त्यांच्यासोबत केलेल्या संभाषणाचे रेकॉर्डिंग आपण ज्या मोबाईलमध्ये केले होते, तो मोबाईल आपल्याला पहिल्यांदा अटक झाली तेव्हा डिचोली पोलिसांनी जप्त केल्याचे ‘गोमन्तक’ला रविवारी दिलेल्या मुलाखतीत सांगितले. डिचोली पोलिसांनी हा मोबाईल नंतर म्हार्दोळ पोलिसांना दिला. त्यानंतर म्हार्दोळ पोलिस तो मोबाईल पूजाला दिल्याचे म्हणत आहेत. परंतु, तो आपल्याला मिळालेला नाही, असेही पूजाने सांगितले. याबाबत सोमवारी म्हार्दोळचे पोलिस निरीक्षक योगेश सावंत यांच्याशी संपर्क साधल्यानंतर आम्ही तो मोबाईल पुराव्यांच्या तपासासाठी फॉरेन्सिक लॅबला दिल्याचे सांगितले. त्यामुळे प्रकरण घडून वर्ष उलटले तरी कोट्यवधींच्या भ्रष्टाचारात अडकलेल्या ‘मोबाईल’चा तपास अजून लॅबकडून झालेलाच नाही का? असा प्रश्न अनेकांसमोर उभा राहण्याची शक्यता आहे.∙∙∙
एरव्ही सरकारी कारभाराचा पंचनामा करण्यास मागे-पुढे न पाहणारे कळंगुटचे आमदार मायकल लोबो आता बदलले आहेत. गोवा साधनसुविधा विकास महामंडळाच्या अध्यक्षपदाची खुर्ची मिळाल्यानंतर त्यांच्या स्वभावात झालेला बदल स्पष्टपणे जाणवत आहेत. पोलिसांनी पूजा नाईक आरोप प्रकरणात अद्याप प्राथमिक तपास पूर्ण केलेला नाही. असे असतानाही लोबो यांनी कोणीतरी सरकारला बदनाम करण्यासाठी हा खटाटोप केल्याचा शोध लावला आहे. लोबोंनी आता आपली यंत्रणा कामाला लावून याच्या मागे कोण आहे, हे जाहीर केल्यास उत्तमच, अशी प्रतिक्रिया लोबोंच्या विधानानंतर ऐकू आली. ∙∙∙
येत्या १३ डिसेंबरला होणाऱ्या जिल्हा पंचायत निवडणुकीत काँग्रेस, गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’ या तीन पक्षांत युती होईल, असा ठाम विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव व्यक्त करीत आहेत. परंतु, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी मात्र युतीबाबत अजूनही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत. या निवडणुकीस अवघे २६ दिवस राहिलेले आहेत. त्यातच गोवा फॉरवर्ड आणि ‘आरजी’ने आपल्या मनानुसार काही मतदारसंघांतील उमेदवारांचा प्रचारही सुरू केलेला आहे. त्यामुळे या तीन पक्षांची युती होणार की या केवळ चर्चाच ठरणार? असा प्रश्न या पक्षांचे कार्यकर्तेच आता एकमेकांना विचारू लागले आहेत.∙∙∙
सध्या विरोधक सत्ताधाऱ्यांविरोधात एकजुटीचा नारा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर, रविवारी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांच्या वाढदिनी विरोधकांनी आपली एकी दाखविली. यावेळी व्यासपीठावर विरोधकांच्या पहिल्या पंक्तीत ‘आरजी’चे मनोज परब बसले होते. सुरुवातीला ‘आरजी’ला काँग्रेसची ॲलर्जी होती. मात्र, जसजसे २०२७ विधानसभा निवडणुकीचे दिवस जवळ येत आहेत, तसतसा ‘आरजी’चा राजकीय पवित्रा व सूर बदलत आहे. ‘आरजी’देखील विरोधकांच्या सुरात सूर मिसळत आहे. सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आवाज उठविला पाहिजे, असे म्हणत आहे. तसेच काँग्रेस पक्षासोबत ‘आरजी’ सध्या व्यासपीठावर दिसत आहे. त्यामुळे ‘आरजी’ने खरोखर गोयकारांच्या प्रेमापोटी आपला पवित्रा बदलला की सक्रिय राजकारणात स्वतःचे अस्तित्व टिकविण्याची ही धडपड? असे लोक विचारू लागले आहेत.∙∙∙
येत्या डिसेंबर महिन्यात होऊ घातलेल्या जिल्हा पंचायत निवडणुकीबाबत आम आदमी पक्षाने आपले १४ उमेदवार जाहीर केले. गोवा फॉरवर्डनेही पैंगीण मतदारसंघातून प्रशांत नाईक हे निवडणूक लढवतील, असे जाहीर करताना अन्य मतदारसंघांतील आपले उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने आपले उमेदवार अजूनतरी जाहीर केले नसले तरी निवडणुकीच्या दृष्टीने त्यांनी जोरात तयारी सुरू केली आहे. त्यांचे उमेदवारही जवळ जवळ नक्की झालेले आहेत. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षात मात्र अगदीच सामसूम दिसत आहे. काँग्रेस पक्षाने जिल्हा पंचायत निवडणूक सिरियसली घेतलेली नाही का? की अन्य पक्षांशी युती करण्यासाठी त्यांनी आपले उमेदवार अजून जाहीर केलेले नाहीत?∙∙∙
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.