वास्को: कासावली परिसरात एका शेतात जबड्यासह मानवी कवटी आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच वेर्णा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सदर मानवी कवटी पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात पाठविण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेर्णा पोलिस स्थानकाचे एक पथक शुक्रवार, १६ जानेवारी रोजी रात्री सुमारे सव्वादहा वाजण्याच्या सुमारास नियमित गस्त घालत होते. त्यावेळी टोंटेम कासावली येथील एका शेताच्या बाजूला मानवी कवटीसारखी वस्तू दिसून आली. पोलिसांनी जवळ जाऊन पाहणी केली असता ती जबड्यासह मानवी कवटी असल्याचे स्पष्ट झाले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली.
घटनास्थळी पंचनामा करून परिसराची सखोल तपासणी करण्यात आली. मात्र, त्या ठिकाणी अन्य मानवी अवशेष किंवा ओळख पटविणारे कोणतेही साहित्य आढळून आले नाही. ही कवटी किती जुनी आहे, ती पुरुषाची की महिलेची, तसेच मृत्यूचे कारण काय, याबाबत माहिती मिळण्यासाठी शवविच्छेदन व तज्ज्ञ अहवालाची प्रतीक्षा केली जात आहे.
या प्रकरणी वेर्णा पोलिस स्थानकात नोंद घेण्यात आली असून उपनिरीक्षक राजदत्त आर्सेकर पुढील तपास करीत आहेत. परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात असून, हरवलेल्या व्यक्तींच्या नोंदी तपासण्याचे कामही पोलिसांकडून सुरू आहे. या घटनेमागे घातपात आहे की अन्य काही कारण, हे तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.