Vishwajeet Rane: ‘गोव्यात पुढील 16 महिन्यांत कॅन्सर इस्पितळ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी ‘टाटा मेमोरियल’सोबत यापूर्वीच करार करण्यात आला असून, त्यांच्या सल्ल्यानुसार इस्पितळाची रूपरेषा आखण्यात येत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी आज दिली. ते जागतिक कर्करोग दिनानिमित्त गोमेकॉत आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी राणे पुढे म्हणाले, ‘जागतिक कर्करोग दिनाच्या निमित्ताने ‘फेसगो’ कंपनीतर्फे बनवलेली स्तन कर्करोगाची लस आज गोमेकॉत रुग्णांना देण्यास प्रारंभ करण्यात आला. प्रति लस किंमत 4.20 लाख आहे.
आज पहिल्या महिला लाभार्थीला ही लस मोफत देण्यात आली. त्यामुळे स्तन कर्करोगावर मोफत लस देणारे गोवा हे पहिले राज्य ठरले आहे’, असेही आरोग्यमंत्री राणे यांनी जाहीर केले. राणे यांनी पुढे सांगितले की, येत्या 16 महिन्यांत गोव्यात कर्करोग हॉस्पिटल होणार असून त्याचा कंत्राटदारही ठरला आहे.
फक्त या प्रकल्पाच्या डिझाईनमध्ये टाटा मेमोरियलने सुचविल्याप्रमाणे काही फेरबदल करायचे आहेत. ते केले जातील.
यावेळी आरोग्यमंत्र्यांनी गोमेकॉच्या कर्करोग ओपीडीमध्ये भेट दिली आणि तेथील रुग्णांची चौकशी केली. तसेच तेथील साधनसुविधांचीही पाहणी केली.
विश्वजीत राणे म्हणाले...
राज्यातील महिलांमध्ये स्तन कर्करोगाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर एक लाख महिलांची ‘स्क्रिनिंग’ तपासणी पूर्ण केली आहे.
एक लाख महिलांपैकी अडीच हजार महिलांमध्ये कर्करोगसदृश गाठी आढळल्या असून कर्करोगावरील इंजेक्शन मोफत देण्याचा निर्णय.
कर्करोगाला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य खात्याने पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने सातत्याने प्रयत्न सुरू असून, त्याला मूर्त स्वरूपही लाभत आहे. गोव्यात कॅन्सर इस्पितळ होणे, ही फार मोठी उपलब्धी असेल. येथे देश-विदेशातील तज्ज्ञ डॉक्टर रुग्णांना सेवा देतील.- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.