चावडी: गुळे-काणकोण येथे दोन्ही हातांत कोयते घेऊन कुटुंबीय, ग्रामस्थ तसेच पोलिसांनाही धमकावत दहशत निर्माण करणाऱ्या समीर चव्हाण (२२) याला काणकोण पोलिसांनी बुधवारी सकाळी सापळा रचून अखेर ताब्यात घेतले. मंगळवारी रात्री पोलिसांना गुंगारा देत जवळच्या शेतातून जंगलाच्या दिशेने पलायन केलेल्या या तरुणाचा पोलिसांकडून कसून शोध घेण्यात येत होता.
मंगळवारी रात्री सुमारे ७.३० वाजण्याच्या सुमारास कुटुंबातील अंतर्गत वादातून समीर याने दोन्ही हातांत कोयते घेऊन कुटुंबीयांवर धाव घेतली. त्याच्या या आक्रमक वर्तनामुळे परिसरात घबराट पसरली. मध्यस्थी करण्यासाठी पुढे आलेल्या ग्रामस्थांनाही त्याने कोयते दाखवून धमकावले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांवरही त्याने कोयते उगारून हल्ल्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला असता, तो जवळच्या शेतातून जंगलाच्या दिशेने पसार झाला.
त्यानंतर पोलिसांनी परिसरात शोधमोहीम सुरू केली होती. अखेर बुधवारी सकाळी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित तरुणाची मानसिक स्थिती बिघडल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून, वैद्यकीय तपासणी व उपचारांसाठी त्याला पणजी येथील रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
कुटुंबाला गावातून हटविण्याची मागणी
या घटनेमुळे गुळे गावात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित कुटुंबातील वारंवार होणाऱ्या वादांमुळे ग्रामस्थ त्रस्त असल्याचे सांगण्यात आले. यासंदर्भात ग्रामस्थांनी यापूर्वीही तक्रारी केल्या होत्या. सुमारे तीन महिन्यांपूर्वी संबंधित कुटुंबाला त्या ठिकाणाहून हटविण्याचा ठराव पंचायतीने मंजूर करून पुढील कारवाईसाठी पोलिसांकडे पाठविला होता. मात्र, त्यावर अद्याप ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप पंच गणेश गावकर यांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.