पणजी: गोव्यात नाताळ आणि नवीन वर्षाच्या स्वागताची जय्यत तयारी सुरु असतानाच अंमली पदार्थ तस्करांनी डोके वर काढले. मात्र, कलंगुट पोलिसांनी सतर्कता दाखवत अंमली पदार्थांच्या तस्करीचा एक मोठा प्रयत्न हाणून पाडला. मंगळवारी, 23 डिसेंबर 2025 रोजी कलंगुट पोलिसांनी केलेल्या एका धडाकेबाज कारवाईत 4 लाख 50 हजार रुपये किमतीचे अंमली पदार्थ जप्त केले असून हळदोण येथील एका तरुणाला अटक केली.
मिळालेल्या माहितीनुसार, कलंगुट (Calangute) पोलीस ठाण्याला त्यांच्या खास सूत्रांकडून एक अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली. एक तरुण आपल्या ग्राहकांना अंमली पदार्थांची डिलिव्हरी देण्यासाठी कलंगुटमधील 'लिटल गोवा' रेस्टॉरंटच्या परिसरात येणार असल्याची ती माहिती होती. ही माहिती मिळताच पोलिसांनी वेळ न घालवता तातडीने कारवाई करण्याचे चक्र फिरवले.
पोलीस उपनिरीक्षक (PSI) राजाराम बागकर यांच्या नेतृत्वाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात पोलीस कॉन्स्टेबल अंशुल घाडी, संदीप गावस, सिद्धांत लामगावकर, गौरांग सुर्लेकर आणि गीतेश गावस यांचा समावेश होता. पोलिसांनी सापळा रचला आणि संशयास्पद हालचाली करणाऱ्या विष्णू हरमलकर (वय 36 वर्षे) याला ताब्यात घेतले.
पंचांच्या उपस्थितीत त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे तपकिरी रंगाची एक क्रिस्टल पावडर आढळली. ही पावडर 'मेथाम्फेटामाइन' नावाचे धोकादायक अंमली पदार्थ असल्याचे पोलिसांना संशय आहे. जप्त करण्यात आलेल्या या अंमली पदार्थाचे एकूण वजन 45.3 ग्रॅम असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत त्याची किंमत साधारणपणे 4,50,000 रुपये इतकी आहे.
याप्रकरणी पीएसआय राजाराम बागकर यांनी दिलेल्या तक्रारीवरुन, पीएसआय विश्वजीत ढवळीकर यांनी एनडीपीएस कायदा, 1985 च्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला. कलंगुट पोलीस ठाण्याचे निरीक्षक परेश नाईक यांच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. तसेच, ही संपूर्ण कारवाई पर्वरीचे उपअधीक्षक विश्वेश कर्पे आणि उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरिश्चंद्र मडकईकर यांच्या देखरेखीखाली पार पडली.
ख्रिसमसच्या (Christmas) सुट्ट्यांसाठी पर्यटकांची गर्दी वाढत असताना पोलिसांनी केलेली ही कारवाई अंमली पदार्थ विक्रेत्यांसाठी मोठा इशारा मानली जात आहे. या कारवाईमुळे स्थानिक रहिवासी आणि पर्यटकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.