Goa Beach Night Life Dainik Gomantak
गोवा

Calangute Beach: यापुढे 'डान्सबारना' थारा नाही; शांतता राखण्यासाठी 'कळंगुट'वासीयांची एकजूट

गोमन्तक डिजिटल टीम

संतोष गोवेकर

जागतिक पर्यटनस्‍थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्‍या उत्तर गोव्यातील कळंगुट येथील नाईट क्लब तसेच डान्सबार संस्कृती सर्वांसाठीच मोठी डोकेदुखी बनू लागली आहे. यापुढे कुठल्याही परिस्थितीत डान्सबारना थारा द्यायचा नाही असे कळंगुटवासीयांनी ठरवले आहे. तशा आशयाचे निवेदन त्‍यांनी स्थानिक पंचायत तसेच पोलिसांना दिले आहे.

जगप्रसिद्ध कळंगुट किनारा वाढत्‍या गुन्‍हेगारीमुळे आता वरदान नव्हे तर शाप ठरू लागला आहे. याबाबत बोलताना येथील एक सामाजिक कार्यकर्ते नितेश चोडणकर यांनी सांगितले की, कळंगुट हा आमचा गाव एकेकाळी गोव्याचे वैभव समजला जायचा.

राजकीय, सामाजिक तसेच सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेला हा गाव आजकाल येथील नाईट क्लब तसेच डान्सबारसाठी ओळखला जाऊ लागला आहे व हे आमचे दुर्दैव आहे. कांदोळीत वाढलेली परप्रांतीय लोकांची वस्ती तसेच व्यावसायिक क्षेत्रात वाढलेला दिल्लीस्थित लोकांचा जमावडा यासाठी कारणीभूत आहे. कळंगुट पंचायत, स्थानिक आमदार तसेच पोलिस यंत्रणांनी या भागातील गुन्‍हेगारी मोडून काढल्‍यास कळंगुट साफ व सुंदर होईल.

एक ग्रामस्‍थ सुदेश मयेकर यांनी सांगितले की, कळंगुटमध्‍ये सध्या जे घडत आहे, ते याआधी कधीच पाहिले नव्हते. स्थानिकांना परप्रांतीय व्यावसायिक व त्यांचे दलाल मारहाण करत आहेत. महिला एकट्या फिरू शकत नाहीत.

आम्ही कळंगुटमध्‍ये आहोत की अन्य राज्यांत, हा प्रश्‍‍न पडतो. पर्यटनाच्या नावाखाली येणाऱ्या पर्यटकांनी कळंगुटमध्‍ये हैदोस घातला आहे. स्थानिक पोलिसांचे परिस्थितीवर नियंत्रण नाही. पर्यटनाच्या नावाखाली परप्रांतीय मन मानेल तसे वागत आहेत. हे प्रकार कायमचे बंद झाले पाहिजेत. स्थानिक पंचायत अथवा पोलिसांना हे जमत नसेल तर स्थानिक युवक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.

अन्‍य एक ग्रामस्‍थ सूरज नाईक म्‍हणाले की, कळंगुटमध्‍ये नाईट क्लब तसेच डान्सबार संस्कृती नकोच. ही आमची संस्कृती नव्हे.

‘अतिथी देवो भव्’ अशी भावना जपणारे आम्ही कळंगुटकर सध्या गावात चाललेले क्लब आणि डान्सबारच्‍या हैदोसामुळे पुरते हैराण झालो आहोत. रात्रीचे बाहेर पडणे मुश्किलीचे बनले आहे. हे कसले पर्यटन?

परप्रांतीय व्‍यावसायिकांच्‍या कचाट्यात सापडतात पर्यटक; प्रसाद दाभोलकर

कळंगुट जिल्‍हा पंचायत सदस्‍य प्रसाद दाभोलकर यांनी सांगितले की, देशी-विदेशी पर्यटक गोव्यात पोहोचतात ते परप्रांतीय व्यावसायिकांच्या तावडीत सापडतात. एअरपोर्टवरील टॅक्सीवाला असो, अथवा हॉटेल-रिसॉर्टवाला, जो-तो परप्रांतीय. गोव्यात उतरलेल्या पर्यटकांशी त्यांनी कसे बोलावे, कसे वागावे याबाबत नीतिनियम नाहीत. त्यामुळे एअरपोर्टवर उतरताच पर्यटकांना अशा लोकांचा सर्वप्रथम सामना करावा लागतो. बाजार अथवा हॉटेलमध्‍येही तोच प्रकार. दुसरी गोष्‍ट म्‍हणजे स्थानिकांनी आपला धंदा-व्यवसाय परप्रांतीय लोकांच्या हाती देताना येथील ‘अतिथी देवो भव्’ संस्कृती जपण्याची सूचना त्‍यांना करावी.

राजकीय बदल हवाच; प्रेमानंद दिवकर

आजच्या परिस्थितीला राजकारणीच जबाबदार आहेत. सुरवातीलाच अशा प्रकारांना लगाम घातला असता तर आजची परिस्थिती उद्‌भवली नसती. परंतु परप्रांतीय वोट बँकेच्या मागे धावताना स्वत:चे मी पण हरवून बसलेल्या लोकांना कोण समजावणार? पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली केल्याने हा प्रश्‍‍न सुटणार नाही अथवा परिस्थिती बदलणार नाही. जनता जागृत झाली पाहिजे. त्‍यासाठी राजकीय बदल गरजेचा आहे. देशी-विदेशी पर्यटक येथील नैसर्गिक सौंदर्य पाहायला येतात, डान्सबार नव्हेत. नाईट क्लब तसेच डान्‍सबार संस्कृती कायमची नष्ट झाली पाहिजे, असे कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दिवकर यांनी सांगितले,

प्रत्‍येक गोष्‍टीला पंचायत जबाबदार असते असे नाही; जोसेफ सिक्वेरा

एखाद्या स्थानिकाने नाईट क्लब अथवा डान्सबारसाठी परवानगी मागितल्यास पंचायत नाही म्हणू शकत नाही. नाही म्हटल्यास हे लोक पंचायत संचालक अथवा वरिष्ठांकडे जातात व तेथून ना हरकत दाखला आणतात. अशा वेळी पंचायतीने काय करावे? कालांतराने नाईट क्लब तसेच डान्सबारमध्ये भांडणे-तंटा झाल्यास लोक पंचायत मंडळालाच जबाबदार धरतात. आम्ही वेळोवेळी स्थानिक पोलिसांच्या मदतीने गावात शांतता प्रस्‍थापित करण्‍याचा प्रयत्न करत असतो, परंतु दरवेळी ते शक्य होत नाही. त्यामुळे स्थानिक लोकांना रस्त्यावर उतरावे लागते, असे कळंगुटचे सरपंच जोसेफ सिक्वेरा यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: अमित पाटकर यांच्याकडून TCP मंत्री आणि इतरांविरुद्ध तक्रार दाखल!!

Goa Diary: एकेकाळी फेणीसाठी प्रसिद्ध असलेलं हे गाव आज बनलंय पर्यटकांचं केंद्र, कोरोनानंतर हा बदल कसा घडला?

गोव्यातील रस्ता सुरक्षा सप्ताह! 'उपक्रम' की जबाबदारी 'लोकांवर' ढकलण्याचा उद्योग

Goa History: गावड्यांच्या शुद्धीकरणाचे सत्य आणि आदिम सांस्कृतिक जीवनशैली

World Food Day 2024: गोव्याच्या खाद्यसंस्कृतीविषयीच्या या पाच गोष्टी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT