पणजी: गुजरात आणि हिमाचल प्रदेशमधील विधानसभा निवडणुका नुकत्याच जाहीर झाल्या आहेत. या निवडणुका दोन टप्प्यांत होणार असून त्यांचा निकाल 8 डिसेंबरला लागणार आहे. त्यामुळे गोव्यातील मंत्रिमंडळाची फेररचना आणखी काही दिवस लांबणीवर पडणार आहे.
(Cabinet reshuffle in Goa now postponed)
भाजपच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसमधील 8 आमदारांचा गट भाजप सरकारमध्ये सामील झाला असून यापैकी काही आमदारांना लवकरच मंत्रिमंडळात जागा मिळेल तसेच काहीजणांना महामंडळे मिळतील, अशी आशा होती.
मात्र, दीड महिना उलटून गेला तरी या आठजणांपैकी एकालाही काहीच पद मिळाले नसल्याने ते निराश झाले आहेत. हे सर्वजण एकमेकांना भेटून उद्वेग व्यक्त करत आहेत. त्यांना देण्यात आलेल्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यानेही काहीजणांनी नाराजी व्यक्त केली आहे.
भाजप पक्षश्रेष्ठींचे लक्ष गुजरात व हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीकडे लागले आहे. 2024 ची लोकसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून या दोन्ही राज्यांत भाजपला या निवडणुका कोणत्याही स्थितीत जिंकायच्या आहेत. त्यामुळे पक्षश्रेष्ठी पुढील दीड महिना या निवडणुकांमध्ये व्यस्त असतील.
साहजिकच त्यांना गोव्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नसल्याने गोव्यातील मंत्रिमंडळ फेररचना ही निवडणूक होईपर्यंत लांबणीवर पडणार आहे.
काही आमदारांना महामंडळाचे लॉलीपॉप
या काळात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे भाजपमध्ये सामील झालेल्या आठ आमदारांपैकी काहीजणांना महामंडळांचे वाटप करू शकतात. मात्र, राज्याच्या मंत्रिमंडळात फेरबदल करून या नव्या आमदारांना सामील करून घेणे शक्य नाही, अशी माहिती भाजपच्या सूत्रांनी दिली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.