पणजी : विधानसभा निवडणुकीत 2022 साली 22 आमदार निवडून आणू, अशी घोषणा भाजपने केली होती. या निवडणुकीत भाजपला इतरांनी केलेल्या सहकार्यामुळे 22 साली 25 आमदार करता आले आणि तिसऱ्यांदा सत्ता मिळवता आली. मात्र, आता विरोधातील अनेक आमदार भाजपच्या संपर्कात असून पक्षाने परवानगी दिली तर 2022 मध्येच 25 वरून आमदारांची संख्या 30 होईल, असे विधान भाजपचे गोवा प्रभारी सी.टी. रवी यांनी केले.
पणजीत शनिवारी झालेल्या भाजपच्या पहिल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत गोवा प्रभारी सी.टी. रवी बोलत होते. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, पंचायत मंत्री माविन गुदिन्हो, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्यासह राज्य कार्यकारिणी सदस्य, विधानसभा मंडळ गटाध्यक्ष आणि मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सी.टी. रवी म्हणाले, पक्षाने विधानसभेवेळी ठेवलेले उद्दिष्ट पार केले. नीती, नियत आणि नेता यांमुळे देशभरातील जनतेने भाजपला मोठा पाठिंबा दिला आहे. राज्यातही त्याची पुनरावृत्ती होऊन ॲण्टी इन्कंबन्सी असतानाही पक्षाला तिसऱ्यांदा सत्ता मिळाली. आता प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे राज्य कारभार सुरू आहे. असे असताना विरोधी गटातील काही आमदार आमच्या संपर्कात आहेत. मात्र, त्यांना पक्षात प्रवेश देण्याला केंद्रीय नेतृत्वाने अद्याप होकार दिलेला नाही. केंद्राने होकार दिल्यास 2022 मध्येच भाजपसह समर्थक आमदारांची संख्या 25 वरून 30 होईल.
यावेळी प्रदेशाध्यक्ष तानावडे यांनी सेवा, सुशासन, गरीबकल्याण, बुथ सशक्तीकरण आणि संसद प्रवास या नियोजनानुसार पक्षाच्या बांधणीबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी, राज्यात तिसऱ्यांदा सत्ता स्थापनेसाठी केंद्रीय नेत्यांपासून बुथस्तरीय कार्यकर्त्यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगत सरकार आणि संघटन एकत्रित येऊन काम केल्यास विरोधक कितीही फसव्या घोषणा करू देत, लोक त्याला बळी पडत नाहीत, हे या निवडणुकांनी स्पष्ट केल्याचे सांगितले.
पंचायत निवडणुकांवर लक्ष केंद्रीत
राज्यात विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर भाजपने आता पंचायत आणि लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले आहे. राज्यातल्या बहुतांश पंचायतींवर आणि लोकसभेच्या दोन्ही जागांवर भाजप उमेदवारांचा विजय होईल, यासाठी आम्ही तयारी सुरू केल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.
ओबीसींवर अन्याय होऊ देणार नाही
या बैठकीत पंचायत निवडणुका पुढे ढकलल्याविषयी सविस्तर कारणमीमांसा पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी केली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार सध्या निवडणुका घ्यायच्या असतील, तर त्या ओबीसी आरक्षणाशिवाय घ्याव्या लागतील. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ओबीसींवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ नये, यासाठी या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याचे गुदिन्हो यांनी सांगितले.
पंतप्रधान, गृहमंत्र्यांचे मानले आभार
या कार्यकारिणीत सरचिटणीस नरेंद्र सावईकर यांनी विविध प्रकारचे राजकीय ठराव मांडले. त्याला मंत्री विश्वजीत राणे आणि सुभाष शिरोडकर यांनी अनुमोदन दिले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाला तिसऱ्यांदा यश मिळवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्यासोबत सी.टी. रवी, देवेंद्र फडणवीस, जे. किसन रेड्डी, दर्शना जर्दोश यांनी घेतलेल्या परिश्रमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करून आभार मानण्यात आले.
सामान्य जनतेला मिळणार न्याय
विधानसभा निवडणुकीत जनतेने दिलेला भरघोस पाठिंबा हा केवळ भाजपच चांगले प्रशासन देऊ शकतो, हे स्पष्ट करणारा आहे. त्यामुळे ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयास’ या धोरणानुसार आणि अंत्योदय तत्त्वानुसार राज्य सरकार काम करेल आणि सामान्यातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल, असा ठराव यावेळी मंजूर करण्यात आला.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.