Pub House In Goa: भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षाच्या रायबंदर येथील एम.के. पब हाऊसमध्ये जुने गोवे पोलिसांनी वेश्या व्यवसायप्रकरणी कारवाई करून हे पब हाऊस सील केले. याप्रकरणी तिघा दलालांना अटक केली आहे. नेपाळमधील तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना गोव्यात वेश्या व्यवसायाला जुंपले जात होते.
संंशयितांकडून होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून काही नेपाळी तरुणींनी येथून पळ काढला. त्यातील एका तरुणीने एनजीओच्या संपर्कात येऊन पोलिसांत तक्रार दिल्यावर या प्रकरणाचा पर्दाफाश झाला. विशेष म्हणजे, हे पब हाऊस भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षाने भाडेपट्टीवर बंगळुरू येथील एका तरुणाला दिले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित नेपाळी तरुणीने दिलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली. रायबंदर रस्त्याच्या बाजूला असलेल्या ‘होबळेज रिव्हर लाँज हॉटेल’च्या बाजूला नव्याने बांधकाम केलेले एम.के. पब हाऊस आहे.
त्याचे मालक भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल होबळे हे आहेत. त्यांनी ते बंगळुरूस्थित महेश भास्कर हेगडे (३८) याच्याशी करार करून भाडेपट्टीवर व्यवसायासाठी दिले होते. त्याची पत्नी कश्मिरा हेगडे ऊर्फ रिधम लामा (२४) ही नेपाळी आहे.
कश्मिरा ऊर्फ रिधम ही नेपाळमधून तरुणींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांना गोव्यात आणत होती आणि त्यांना एम.के. पब हाऊसमध्ये ठेवत होती. हेगडे हे जोडपेही तेथेच राहात होते. या तरुणींना जबरदस्तीने डान्स बारमध्ये ढकलण्यात आले होते. ग्राहकाला एखादी तरुणी आवडल्यास तिला जबरदस्तीने जाण्यास हे जोडपे भाग पाडत होते.
माझा ‘त्या’ प्रकरणाशी संबंध नाही : होबळे
या प्रकाराविषयी अनिल होबळे यांनी सांगितले की, ते माझे हॉटेल असले तरी मी ते कराराने महेश हेगडे यांना चालवण्यास दिले आहे. त्यामुळे तेथे झालेल्या कोणत्याही प्रकाराचा माझ्याशी काहीच संबंध नाही. अंतर्गत वादातून ही तक्रार झाली आहे. मोबाईलवरून हा वाद झाला असावा. त्यातून हेगडेविरोधात सतावणुकीची तक्रार दिली, अशी माहिती मला मिळाली आहे. याशिवाय त्या प्रकरणाची मला आणखी काहीच माहिती नाही.
उर्वरित तीन तरुणींची सुटका
पोलिसांनी कारवाई केली, त्यावेळी संशयित हेगडे जोडपे आणि एक नेपाळी महिला दलाल दीपा दिलबहादूर शाय ठाकुरी (२४) तेथे उपस्थित होती. त्या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्या ठिकाणी असलेल्या इतर तीन पीडित नेपाळी तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी संशयितांना न्यायालयात हजर केले असता, त्यांना पोलिस कोठडीचा रिमांड घेऊन पोलिस अधिक माहिती मिळवत आहेत.
सहा तरुणींना धरले होते वेठीस
या पब हाऊसमध्ये नेपाळहून आणलेल्या सहा तरुणींना अक्षरश: वेठीस धरले होते. अखेर नेहमीच्या या अत्याचाराला कंटाळून एम. के. पब हाऊसमध्ये असलेल्या सहापैकी तीन तरुणी तेथून पसार होण्यात यशस्वी झाल्या. त्यातील एका तरुणीने तिच्यावर झालेल्या अत्याचारांची माहिती एका एनजीओला दिल्यानंतर जुने गोवे पोलिसांनी तिची तक्रार दाखल करून घेतली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारावर त्वरित हालचाली करून सोमवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही कारवाई केली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.