Goa Corona Update: कोविडच्या ‘जेएन.1’ या उपप्रकाराचा संसर्ग झालेले एकूण 21 रुग्ण आतापर्यंत देशात आढळले आहेत. त्यापैकी 19 रुग्ण एकट्या गोव्यातच सापडले असून केरळ व महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी आज दिली.
21 मे पासून देशात एका दिवसात प्रथमच कोविडचे उच्चांकी 614 रुग्ण आढळले आहेत. असे असले तरीही गोमंतकीयांना भिवपाची गरज ना, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज सांगितले.
देशात कोविडची वाढती रुग्णसंख्या पाहून केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी आज देशभरातील आरोग्यमंत्र्यांची आभासी पद्धतीने बैठक घेतली. या बैठकीत राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे, आरोग्य सेवा संचालनालयाचे संचालक, गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर आदी 11 जण सहभागी झाले होते.
या बैठकीनंतर राणे यांनी सांगितले, की राज्यात कोविडचा एकही रुग्ण ऑक्सिजनवर किंवा इस्पितळात नाही. राज्यात असलेल्या 23 कोविड रुग्णांची लक्षणे ही सौम्य स्वरूपाची आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जनतेने घाबरून जाण्याची गरज नाही.
कोविडचा मुकाबला करण्यासाठी राज्यातील आरोग्य यंत्रणेची पूर्ण सज्जता आहे. केंद्र सरकारने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार आरोग्य यंत्रणेने यापूर्वीच कोविडचा सामना करण्यासाठीचा सरावही पूर्ण केला आहे. कोविडचा नवा विषाणू काही राज्यांत आढळून आला असल्याने जिल्हा पातळीवरील इस्पितळात तशा चाचण्या सुरू करण्याची सूचना देण्यात आली आहे.
राज्य सरकार आपल्या पातळीवर जनतेसाठी कोणतीही मार्गदर्शक तत्त्वे सध्या जारी करणार नसून आजच्या बैठकीत केंद्र सरकारनेच याविषयीची मार्गदर्शक तत्त्वे जारी करावीत, असे सुचवले आहे. कारण प्रत्येक राज्य आपल्या परीने मार्गदर्शक तत्त्वे जारी करते आणि त्यातून एका राज्यातून दुसऱ्या राज्यात प्रवास करणाऱ्यांचा गोंधळ उडतो, असा मुद्दा मांडण्यात आला, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
सर्दी झालेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून नजीकच्या इस्पितळात जाऊन कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहनही आरोग्यमंत्र्यांनी केले. केवळ अलगीकरणात राहिल्याने रुग्ण बरे होतात, असा आताचा अनुभव आहे. त्यामुळे कोणीही कोविडमुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. सध्या पर्यटन हंगाम सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार याबाबत विशेष काळजी घेत आहे, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, नव्या वर्षाच्या उंबरठ्यावर जग कोरोनाच्या ‘जेएन.१’ या उपप्रकाराच्या पसरत चाललेल्या संसर्गामुळे पुन्हा धास्तावले आहे. भारतातही त्याचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर, ‘जेएन.१’ हा उपप्रकार चिंतेची बाब असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने (डब्लूएचओ) नमूद केले आहे. अर्थात, काळजी घेण्याची गरज असली तरी सार्वजनिक आरोग्याला धोका कमी असल्याचा दिलासाही ‘डब्लूएचओ’ने दिला आहे.
देशात 21 रुग्णांची नोंद
कोरोनाच्या ‘जेएन.1’ या उपप्रकाराचा संसर्ग झालेले एकूण 21 रुग्ण आतापर्यंत देशात आढळले आहेत. त्यापैकी 19 रुग्ण एकट्या गोव्यात सापडले असून केरळ व महाराष्ट्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली. दरम्यान, मे 2021 पासून देशात एका दिवसात प्रथमच कोरोनाचे उच्चांकी 614 रुग्ण आढळले आहेत. सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 2,311 आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडून आढावा
‘जेएन.१’ च्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीया यांनी बुधवारी देशातील राज्यांमधील आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. त्याचप्रमाणे, राज्यांना दक्षतेच्या सूचनाही दिल्या. केंद्राकडून राज्यांना सर्व ती मदत दिली जात असल्याचे सांगून सावध राहण्याची गरज असली तरी घाबरण्याचे काही कारण नाही, असेही त्यांनी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे. मात्र, मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना चाचण्या करण्याच्या सूचना केंद्रीय आरोग्य सचिवांनी केल्या आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.