पणजी: बिट्स पिलानी येथील दहा महिन्यांत पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू होणे, ही घटना संताप आणणारी आहे. परंतु नुकत्याच ऋषी नायरच्या शवविच्छेदनामध्ये अमलीपदार्थ आढळल्याने संस्था आणि सरकारचे अपयश उघड होत आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
पाटकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सर्व शवविच्छेदन आणि टॉक्सिकोलॉजी अहवालांचे तात्काळ सार्वजनिक करावेत, वसतिगृह सुरक्षा, बिट्स पिलानी प्रशासनाची जबाबदारीतील त्रुटी, राज्यातील उच्च शिक्षण संस्थांचे सुरक्षा आणि मानसिक आरोग्य ऑडिट करावे.
त्याचबरोबर राज्य सरकार आणि बिट्स पिलानी व्यवस्थापन १५ दिवसांत कारवाई करण्यात अपयशी ठरल्यास काँग्रेस पालक, विद्यार्थी आणि जनतेसह राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल. बिट्स पिलानी ही देशातील नामवंत शैक्षणिक संस्था आहे आणि त्या संस्थेच्या परिसरात अमली पदार्थ कसे प्रवेश करू शकले? कोणती देखरेख यंत्रणा होती? काही कालावधीत तरुणांचा झालेल्या मृत्यूकडे दुर्लक्ष का केले जात होते? या प्रश्नांची त्वरित उत्तरे संबंधित यंत्रणेकडून मिळणे आवश्यक आहेत.
बिट्स पिलानी कॅम्पसमधील ऋषी नायर या विद्यार्थ्याचा मृत्यू मादक पदार्थांच्या सेवनामुळे झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. यानंतर कॅम्पसमध्ये ड्रग्सची उपलब्धता, त्याचा पुरवठा मार्ग आणि विद्यार्थ्यांचे बाहेरील संपर्क या बाबींवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
झुआरीनगर परिसरात काही विद्यार्थी सायंकाळी जातात, तिथे त्यांचे नेमके कोणाशी संबंध आहेत, काय चालते, याची माहिती व्यवस्थापनासह पोलिसांनाही नाही, अशी चर्चा रंगली आहे. स्विगी डिलिव्हरी बॉईंकडे संशय वळला असला तरी इतर पुरवठादारांचा तपास होणे आवश्यक असल्याची मागणी पालक आणि स्थानिकांकडून होत आहे.
कुशाग्र जैनच्या मृत्यूनंतरही संशय व्यक्त झाला होता, मात्र त्याकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही, अशी टीका आता केली जात आहे. काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष नितीन चोपडेकर यांनी दोषींना गय करता कामा नये, असे सांगत या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी केली आहे.
ऋषी नायरला ड्रग्स कुठून मिळाले? सीसीटीव्ही फुटेज तपासून त्या दिवशी त्याच्या खोलीत कोण आले होते याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सरकारी चौकशी समितीने कॅम्पसला भेट देऊन व्यवस्थापनाकडून माहिती घेतली असून मादक पदार्थ, मद्यपान, रॅगिंग, लैंगिक छळ यांना थारा नाही, असे सांगण्यात आले. परंतु प्रत्यक्षात ड्रग्स सहज उपलब्ध असल्याचे समोर आल्याने चिंता व्यक्त होत आहे. पोलिसांनी तपासाला गती देऊन मृत्यूचे खरे जगासमोर आणावे, अशी मागणी होत आहे.
बिट्स पिलानीमधील ऋषी नायर या विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी सखोल चौकशी करावी, अशी मागणी ‘आप’चे आमदार क्रूझ सिल्वा यांनी दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांच्याकडे केली आहे. सिल्वा यांनी ‘आप’च्या कार्यकर्त्यांसमवेत वर्मा यांना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
आतापर्यंत बिट्स पिलानीमध्ये पाच विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. नायर याच्या मृतदेहाच्या शवचिकित्सा अहवालात ड्रग्स सापडले आहेत. ही गंभीर घटना आहे. सखोल चौकशीची गरज असल्याचे सिल्वा म्हणाले.
बिट्स पिलानीचा विद्यार्थी ऋषी नायर याच्या मृत्यूप्रकरणी आम्ही तपासकामाला सुरुवात केली असून, पोलिस सर्व बाबींवर नजर ठेवून असल्याचे दक्षिण गोवा पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले. मृत ऋषीच्या शरीरात ड्रग्सचा अंश सापडला आहे, ते त्याने कधी घेतले की त्याला कुणी दिले याचा पोलिस शोध घेत असल्याची माहितीही वर्मा यांनी दिली.
शैक्षणिक संस्थेबाहेर आमचे पोलिस नजर ठेवून असतात, बीट पोलिसांना त्याबाबात सूचना दिली आहे. जे दुकानात असल्या वस्तू विकतात त्यांच्यावर निश्चित कारवाई होईल तसेच जे शैक्षिणक संस्थेबाहेर संशयास्पदरीत्या फिरतात त्यांच्यावरही पोलिस नजर ठेवून आहेत. अशा लोकांवर कारवाई केली जाईल, असे वर्मा यांनी सांगितले.
बिट्स पिलानीतील ऋषी नायरच्या शवविच्छेदनात अमलीपदार्थांचे अंश आढळल्याने आम आदमी पक्षाने राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. याप्रकरणामुळे राज्यातील कायदा व सुव्यवस्था ढासळल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष ॲड. अमित पालेकर यांनी केला आहे.
बिट्स पिलानीतील संस्थेच्या परिसरात नायर या विद्यार्थ्याचा पाचवा मृत्यू झाला ही संतापजनक बाब आहे. यापूर्वी मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी याप्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमण्याचे जाहीर केले होते, त्या समित्यांचे काय केले आणि काय झाले, असा सवाल पालेकर यांनी केला.
ते पुढे म्हणाले, ऋषी नायरकडे अमली पदार्थ कसे पोहोचले, कोणी त्याला दिले, हे सर्व प्रश्न उपस्थित होत आहेत. यापूर्वी अमलीपदार्थ किनारी भागात मिळत होते, पण आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचले आहे, ही चिंतेची बाब आहे.
सांताक्रूझसारख्या मतदारसंघात अमलीपदार्थ विक्री करणाऱ्यांनी व्यवसाय बंद केले होते, परंतु त्यांना म्हणे पोलिसांनी पुन्हा ते व्यवसाय सुरू करा अन्यथा बनावट गुन्ह्यात अडकवले जाईल, अशी धमकी दिल्याची माहिती समोर येते, असे सांगत पालेकर म्हणाले, पणजीसारख्या शहरात व महाविद्यालयात अमलीपदार्थ पोहोचले जाते, हे पोलिसांचे आणि गुन्हे शाखेचे अपयश आहे. गोव्यात औषधालये एवढ्या वाढल्या आहेत, डॉक्टरांनी लिहून दिलेल्या चिठ्ठीव्यतिरिक्तही औषधे सहजपणे मिळतात. त्यामुळे औषधलयांची तपासणीही होणे आवश्यक आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.