मडगाव: सांकवाळ येथील बिट्स पिलानी कॅम्पस पूर्णत: ड्रग्सच्या आहारी गेला आहे, अशा प्रकारचे आरोप यापूर्वी केले जात होते. या आरोपात तथ्य असावे, असे आता सात दिवसांपूर्वी या कॅम्पसमध्ये मृत पावलेल्या ऋषी नायर या २० वर्षीय विद्यार्थ्याच्या मृत्यूमुळे स्पष्ट झाले आहे.
ऋषी नायर याच्या उलटीची रेंडाक्स चाचणी केली असता, त्यात मेथापेटामाईन, एम्फेटामाईन आणि एमडीएमए या तीन सिंथेटिक्स ड्रग्सचे अंश सापडल्याने या प्रकरणाला आता कलाटणी मिळाली आहे.
ऋषी नायर याचा मृत्यू ४ सप्टेंबर रोजी झाला हाेता. झाेपेत असताना उलटी केल्यामुळे आणि ती उलटी फुफ्फुसात गेल्याने तो मृत पावला होता, असा प्राथमिक निष्कर्ष शवचिकित्सा अहवालात काढण्यात आला होता. त्यानंतर त्याच्या उलटीची गोवा मेडिकल कॉलेजमध्ये रेंडॉक्स चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयातून ही धक्कादायक बाब पुढे आली आहे.
या चाचणीचा जो अहवाल आला आहे, त्यात एकूण पाच प्रकारचे ड्रग्स त्याच्या पोटात सापडल्याचे म्हटले आहे. त्यापैकी एकाचे नाव ‘झोल्पीडॅम’ असे असून झाेपेच्या गोळ्यांमध्ये असे औषध सापडते. दुसरे ड्रग्स हा ‘एसेटामिनोफॅन’ असे असून याचे अंश ताप किंवा अंगदुखीच्या गोळ्यांमध्ये सापडतात. मात्र, अन्य तीन जे ड्रग्स सापडले आहेत, ते बंदी असलेले ‘सिंथेटिक्स ड्रग्स’ असून ते ऋषीपर्यंत पोचले कसे, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
ऋषी नायर हा मूळ बंगळुरू येथील युवक बिट्सच्या हैदराबाद कॅम्पसमध्ये शिकत होता. मात्र, तिथे त्याच्या मैत्रिणीने आत्महत्या केल्याने तो तणावाखाली होता. त्यामुळे त्याला ‘बिटस’च्या गोवा कॅम्पसमध्ये हलविण्यात आले हाेते. त्याच्यावर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते.
ऋषी याच्या उत्तरीय तपासणीतून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्याला आलेल्या उलटीची रेंडॉक्स चाचणी केली असता, या चाचणीत मेथापेटामाईन, एम्फेटामाईन आणि एमडीएमए या ड्रग्सचे अंश सापडल्याने या मृत्यूचे गूढ आणखी वाढले आहे. त्यामुळे बिटस् पिलानीच्या कॅम्पसमध्ये ड्रग्स कसे पोचते, हाही प्रश्न आता विचारला जात आहे.
दक्षिण गाेव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांना यासंदर्भात विचारले असता, रेंडॉक्स चाचणी केल्यानंतर त्याच्या शरीरात ड्रग्सचे अंश सापडल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, हे ड्रग्स खरेच त्याच्यापर्यंत पोचले का, की त्याच्यावर जो औषधोपचार होत होता, त्यातून हे ड्रग्स त्याच्या शरीरात गेले का याचा तपास करीत आहोत, असे त्यांनी सांगितले.
ऋषी नायर याच्या शरीरात सिंथेटिक्स ड्रग्स सापडल्यामुळे या मृत्यू प्रकरणाचा तपास आता वेगवेगळ्या कोनातून केला जात आहे. हा अहवाल आमच्या हाती आल्यानंतर बिटसच्या प्रक़ल्पात आम्ही पोलिस तैनात केले आहेत. शिवाय इतर विद्यार्थ्यांच्याही जबान्या आम्ही नाेंदवून घेणार आहोत, असे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा म्हणाले.
मागील महिन्यात क्राईम ब्रँचने वास्को येथे छापा टाकून एका स्विगी बॉयला गांजासह पकडले होते. त्यामुळे वास्कोतील स्विगी बॉईजकडून ड्रग्सची तस्करी होते, असा निष्कर्ष काढण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर बिटस्मध्ये येणारे ड्रग्स या स्विगी बॉईजच्याच माध्यमातून येतात का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
या कॅम्पसमध्ये इतर कुणालाही येण्यास बंदी असताना हे स्विगी बाॅईज सहजपणे आतमध्ये जात होते. यापूर्वी २०२४ मध्ये अशा स्विगी बॉईजकडून नको असलेल्या वस्तू पार्सलमधून येतात, अशी तक्रार बिटस पिलानीच्या सुरक्षा रक्षकांनी केली होती. त्यामुळे आता हे स्विगी बॉईज संशयाच्या घेऱ्यात सापडले आहेत.
बिट्स पिलानीच्या विद्यार्थ्यांना कॅम्पसमध्ये जाऊन ड्रग्स पुरवल्याची अशीच एक घटना गतवर्षी (२०२४) उघडकीस आली होती. शिवाय त्या प्रकरणात गुंतलेल्या एका विद्यार्थ्याला कायमचे निलंबितही करण्यात आले होते, अशी माहिती बिट्स पिलानीच्या सूत्रांनी गुरुवारी ‘गोमन्तक’ला दिली.
१ ऋषी नायरच्या उलटीची जी रेंडाॅक्स चाचणी झाली, त्यात मेथापेटामाईन, एम्फेटामाईन आणि एमडीएमए हे तिन्ही ड्रग्स पावडर किंवा पेय (लिक्वीड) स्वरूपातून घेतले जातात.
२या अहवालात असे म्हटले आहे की, हे तिन्ही ड्रग्स जर पेय स्वरूपात पोटात गेले तर त्याद्वारे उलटी येऊ शकते.
३ऋषी नायर याच्यावर जे उपचार सुरू होते, ते झोपेच्या गोळ्या देऊन केले जात होते.
४या गोळ्या घेतल्यामुळे त्याला गाढ झोप लागली असावी आणि बाकीच्या अन्य तीन ड्रग्समुळे त्याला उलटी आली असावी.
५तो गाढ झोपेत असल्यामुळे ही उलटी बाहेर न पडता श्वसन नलिकेद्वारे फुफ्फुसात गेली असावी आणि श्वास कोंडून तो मृत झाला असावा.
६ असे जरी असले तरी मृत्यूचे अंतिम कारण इतर चाचण्यांवरून ठरविण्यात येणार असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अन्य काही चाचण्यांनंतरच ऋषीच्या मृत्यूचा ठाम निष्कर्ष काढला जाईल.
ऋषी नायरच्या शरीरात जे ड्रग्स सापडले, ते त्याने बाहेरून आणले, की त्याच्यावर जो औषधोपचार सुरू होता, त्याचा ओव्हरडोस झाला आणि या औषधाच्या अतिरिक्त सेवनामुळे त्याच्या शरीरात या प्रतिबंधित ड्रग्सचे अंश सापडले, याचा तपास आम्ही करत आहोत. त्यामुळे अजूनही आम्ही मृत्यूच्या अंतिम कारणापर्यंत पाेहोचलेलो नाहीत.टिकम सिंग वर्मा, दक्षिण गाेवा पोलिस अधीक्षक.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.