सासष्टी: भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती मडगावात अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुचाकी रॅलीत हजारोंच्या संख्येने युवकांनी सहभाग घेतला. दुपारी २ वाजता विविध केंद्रांवरून निघालेली ही रॅली सुमारे साडेचार वाजता मडगावात दाखल झाली आणि त्यानंतर भव्य सभेत रूपांतर झाले.
यावेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सांगितले की, राज्य सरकारने सादर केलेल्या १० हजार वनहक्क प्रकरणांपैकी ५ हजार दावे निकाली काढण्यात आले आहेत. उर्वरित अर्जदारांचे दावे पुढील एका वर्षात निकाली काढले जातील. फर्मागुढी येथे आदिवासी संग्रहालय उभारले जाणार असून आधुनिक आदिवासी ग्राम स्थापन करून आदिवासी संस्कृती, परंपरा, जंगलाशी निगडित व्यवसायांची महत्त्वपूर्ण माहिती उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
भगवान बिरसा मुंडा यांचे कार्य आम्ही फक्त जयंतीपुरते आठवू नये, तर त्यांच्या धैर्यशील विचारांना जीवनात कायमस्वरूपी जागा द्यावी. बिरसा मुंडा हे आदिवासी अस्मितेचे प्रतीक आहे. त्यांचे विचार जीवनात रुजवा, असे आवाहन आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी केले.
आदर्श युवा संघ आणि बलराम शिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज आमोणे-काणकोण येथे जनजातीय गौरव वर्षानिमित्त भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त बलराम शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भव्य रॅली काढली. आदिवासी अस्मितेचे प्रतीक असलेल्या बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्याचा गौरव करण्यासाठी यावेळी स्थानिक पातळीवरून मोठ्या प्रमाणात सहभाग लाभला.
यावेळी मंत्री रमेश तवडकर यांच्यासह बलराम शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापिका तथा पैंगीणच्या सरपंच सविता तवडकर, आदर्श युवा संघाचे अध्यक्ष चंद्रकांत वेळीप, काणकोण भाजप मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर, मंडळाचे नेते अशोक गावकर, मुख्याध्यापक अशोक गावकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. बलराम शिक्षण संस्थेचे शिक्षक, विद्यार्थी आणि गावातील ग्रामस्थही या सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी झाले.
मंत्री तवडकर म्हणाले, की बलराम शिक्षण संस्था आदिवासी समाजाच्या मुलांना केवळ शिक्षण देत नाही, तर त्यांच्यामध्ये संस्कार, संस्कृतीची जाणीव आणि समाजसेवेची भावना रुजवते. संस्था ज्या उत्कटतेने बिरसा मुंडा यांच्या विचारांचा प्रसार करते, ते खरोखरच प्रशंसनीय आहे. सूत्रसंचालन संजय गावकर यांनी केले, तर आभार चंद्रकांत वेळीप यांनी मानले.
राज्याच्या अर्थसंकल्पात आदिवासी समाजासाठी १० टक्के तरतूद असून १८ ते १९ विविध योजना कार्यरत आहेत. भगवान बिरसा मुंडा यांची शिकवण ‘जल, जीवन आणि जंगल’ या तत्त्वांवर आधारित आहे. आदिवासी समाजाला त्यांच्या जमिनीचा हक्क मिळणे हीच बिरसा मुंडा यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
भगवान बिरसा मुंडा यांची १५०वी जयंती मडगावात आज अभूतपूर्व उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. आदिवासी कल्याणमंत्री रमेश तवडकर यांनी स्वागतपर भाषणात बिरसा मुंडा यांनी आदिवासी समाजाला वैचारिक बळ दिल्याचे सांगितले.
युवकांनी व्यसनमुक्त, देशभक्त आणि समर्पित वृत्तीने कार्य करणे ही काळाची गरज आहे. गोव्यात आदिवासी युवकांची मजबूत फौज निर्माण करण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले.
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक आणि सभापती गणेश गावकर यांनीही मनोगत व्यक्त केले. राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री दिगंबर कामत, समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, माजी खासदार विनय तेंडुलकर, एनआरआय कमिशनर नरेंद्र सावईकर, आमदार उल्हास तुयेकर, दाजी साळकर, माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर, नगराध्यक्ष दामोदर शिरोडकर यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.
व्यासपीठावरील बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कर्नाटक विधान परिषदेचे आमदार शांताराम बुदना सिद्दी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. दरम्यान, गोव्यातील साखळी, पणजी, फोंडा, सांगे, सावर्डे, कुडचडे, केपे, सासष्टी, काणकोण आणि मडगाव येथील दुचाकीस्वारांनी रॅलीत सहभाग घेतला होता.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.