

मडगाव: भगवान बिरसा मुंडा यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त आयोजिलेल्या जनजातीय गौरव अभियानाची , शनिवारी सांगता होणार आहे. यानिमित्त मडगावात भव्य दुचाकी रॅलीचे आयोजन केले असून यामध्ये तब्बल १० हजार दुचाकीस्वार सहभागी होणार आहेत.
रॅलीची सांगता मडगावच्या एसजीपीडीए मैदानात होणार असून यानिमित्त सुमारे २५ हजार युवक एकत्र येतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ३१ ऑक्टोबर रोजी गावडोंगरी-काणकोण येथे झालेल्या जनजातीय सांस्कृतिक मेळाव्यातून या अभियानाची सुरुवात झाली होती.
त्यानंतर काणकोण, सावर्डे, केपे, कुडचडे, जुने गोवे, तिसवाडी, साखळी, मडगाव, धारबांदोडा, फोंडा, आमोणे अशा वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम सुरू होते. या प्रत्येक कार्यक्रमाला लोकांची प्रचंड गर्दी होती. काल काणकोण येथे झालेल्या शोभायात्रेत हजारो कार्यकर्त्यांनी भाग घेतला होता. माजी केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री डॉ. भारती पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या या शोभायात्रेत सुमारे ४ हजार महिलांनी भाग घेतला होता.
मंत्री रमेश तवडकर यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होणार आहे. हजारोंच्या संख्येने एखाद्या रॅलीत युवकांचा सहभाग असणे, ही गोव्यातील पहिलीच वेळ असेल. बाराही तालुक्यांमधून युवक मिरवणुकांसह मडगावात दाखल हाेतील. शनिवारी दुपारी ३ वाजता एसजीपीडीए मैदानावर या युवकांचे भव्य महासंमेलनहोणार आहे.
उद्याचा मेळावा हा अभूतपूर्व असेल. गोव्यात पहिल्यांदाच हजारो युवकांचा सहभाग असलेली दुचाकींची भव्य रॅली काढण्यात येणार आहे. तरुणांचा उत्साह पाहून मी आनंदीत आहे. राज्यात वेगवेगळ्या भागांतून ही रॅली सुरू हाेणार असून मडगावात सांगता होईल.
- रमेश तवडकर, आदिवासी कल्याण मंत्री.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.